श्रीमद्भगवद्गीतेत अर्जुनाने भगवंताला विचारलेले प्रश्न

अर्जुनाची जिज्ञासा
(श्रीमद्‌भगवद्गीतेमध्ये उल्लेखिले गेलेले, अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारलेले प्रश्न, विनंती, इच्छा इ.)
(१) विषादयोग - युद्ध करण्या / न करण्याविषयीचे प्रश्न -
१) रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या शत्रुपक्षाकडील योद्ध्यांना मला नीट पाहायचे आहे, त्यामुळे मला कोणाकोणाशी लढायचे आहे ते समजेल. यासाठी माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा कर. (१.२२)
(योद्ध्यांचे वर्णन – दुर्बुद्धी झालेल्या, दुर्योधनाचे प्रिय करू पाहाणारे - १.२३)
२) मी रणांगणावर स्वजन पाहातो आहे. युद्धामध्ये या आप्तांना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही. त्यांना मारून राज्य कसे करायचे? असे राज्य भोगत जगण्याचा काय उपयोग? त्यांना मारून त्रैलोक्याचे राज्यही मिळवायचे नाही तर मग पृथ्वीलोकाची काय कथा? (१.३०, १.३१, १.३२, १.३५)
३) धृतराष्ट्राच्या मुलांना मारून मला काय मिळणार? (१.३६)
४) कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष, स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का करू नये? (१.३९)
५) युद्धात कुलनाश झाला की कुलधर्म नाहीसे होतील, कुलनाशामुळे वर्णसंकर होईल, त्यामुळे पितृकर्म होणार नाही, त्यामुळे आमचे पितर अधोगतीला जातील. (१.४० ते १.४४)
६) असला कुलनाश, राज्य आणि सुखाच्या लोभाने आम्ही का करावा? (१.४५)
७) भीष्म आणि द्रोण हे पूज्य आहेत, त्यांच्याविरुद्ध कसा लढू? (२.४)
८) युद्ध करणे व न करणे या दोनपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे? आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील? धृतराष्ट्रपुत्रांना मारून जगण्यात काय अर्थ आहे? (२.६)
९) कारुण्य व कातरता या दोषांमुळे माझा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे, धर्म-अधर्माच्या बाबतीत माझे चित्त संमूढ झाले आहे, अशी अवस्था असलेला मी तुझा शिष्य, तुला शरण आलो आहे. तेव्हा निश्चितपणे जे कल्याणकारक असेल तेच तू मला सांग. (२.७)
१०) मी जर या सर्वांना मारलं आणि सर्व जगाचे स्वामित्त्व मिळवलं, तरी माझ्या इंद्रियांना सुकवून टाकणारा जो शोक मला होईल तो कशाने दूर होईल? (२.७, २.८)
--------------------------------------------------------------------
(२) सांख्ययोगाविषयीचे प्रश्न
११) जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिरबुद्धी (स्थितप्रज्ञ) माणसाचे लक्षण काय? तो कसे बोलतो, कसा असतो, कसा वागतो? (२.५४)
--------------------------------------------------
(३) कर्मयोगाविषयीचे प्रश्न
१२) जर कर्मापेक्षा ज्ञान तुला श्रेष्ठ वाटते तर मग (आप्तांना ठार मारण्याचे) भयंकर कर्म करण्यास तू मला कां प्रवृत्त करत आहेस? (३.१) तुझ्या मिश्रित (संदिग्ध) वाक्यांमुळे मी गोंधळलो आहे. ज्यामुळे माझे कल्याण होईल अशी एकच निश्चित गोष्ट करण्यास मला सांग. (३.२)
१३) स्वत:ची इच्छा नसतानाही, जबरदस्ती केल्याप्रमाणे हा मनुष्य कोणाच्या प्रेरणेने पापाचरण करतो? (३.३६)
----------------------------------------------------
(४) ज्ञानकर्मसंन्यासयोगाविषयीचे प्रश्न
१४) तुझा (कृष्णाचा) जन्म तर अलिकडच्या काळातला, सूर्याचा जन्म फार पूर्वीचा, तर मग तूच हा योग (अव्यय) सूर्याला प्रथम सांगितला हे मी कसे समजू? (४.४)
--------------------------------------------------------
(५) कर्मसंन्यासयोगाविषयीचे प्रश्न
१५) एकदा कर्माचा संन्यास करावा असे सांगतोस व दुसर्‍या वेळेला कर्मयोगाची प्रशंसा करतोस! कर्म टाकणे व कर्म करणे या दोहोंपैकी माझ्यासाठी जे निश्चित कल्याणकारक असेल असे एक साधन सांग. (५.१)
-----------------------------------------------------------
(६) आत्मसंयमयोगाविषयीचे प्रश्न
१६) हे मधूसूदना, समभावाचा योग तू मला सांगितलास तो माझे मन चंचल असल्यामुले माझ्यामध्ये सतत स्थिर राहील असे मला वाटत नाही. (६.३३) हे कृष्णा, हे मन मोठे चंचल, घुसळून टाकणारे, दृढ व बलवान आहे, त्याचा निग्रह करणे हे वार्‍याला ताब्यात ठेवण्याइतके दुष्कर आहे. असे मन कसे आवरावे? ( ६.३४)
१७) जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे, परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंत:काली योगापासून विचलीत झाले असा साधक योगसिद्धी प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो? ( ६.३७)
१८) भगवद्‌प्राप्तीच्या मार्गात संभ्रमित झालेला व आश्रयरहित असा मनुष्य पांगलेल्या ढगाप्रमाणे दोन्ही बाजूंनी भ्रष्ट होऊन नाश तर पावत नाही ना? (६.३८)
१९) हे श्रीकृष्णा, हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकाल, कारण तुमच्याशिवाय दुसरा कोणीही हा संशय दूर करू शकणार नाही. (६.३९)
-----------------------------------
(७) अक्षरब्रह्मयोगाविषयीचे प्रश्न
२०) हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे, अधिभूत काय आहे, अधिदैव कशाला म्हणतात (८.१), येथे अधियज्ञ कोण आहे, तो या शरीरात कसा आहे, अंत:काळी युक्तचित्ताचे पुरुष तुला कसे जाणतात? (८.२)
----------------------------------
(८) विभूतियोगाविषयीचे प्रश्न
२१) कशा रीतीने सतत चिंतन करून तुला जाणून घेऊ? कोणकोणत्या वस्तूंत तुला मी पाहू? (१०.१७)
२२) तुझ्या विभूती व योग सविस्तर सांग. तुझे अमृतभाषण ऐकताना तृप्तीच होत नाही. (१०.१८)
----------------------------------------
(९) विश्वरूपदर्शनयोगाविषयीचे प्रश्न
२३) हे परमेश्वरा, तू स्वत:चे जे स्वरूप मला सांगितलेसते मी (प्रत्यक्ष) पाहू इच्छितो. (११.३)
२४) जर ते रूप पाहाणे मला शक्य असेल तर ते अव्यय, अविनाशी रूप मला दाखव. (११.४)
२५) हे महाबाहो, तुझे हे अवाढव्य रूप पाहून मी व्याकूळ होऊन गेलो आहे. (११.२३)
२६) हे विष्णो, हे आकाशाला भिडलेले, तेजस्वी, अनेकरंगी, जबडा पसरलेले, तेजस्वी व विशाल नेत्रांचे रूप पाहून माझे मन व्याकूळ होऊन माझा धीर सुटला आहे, शांती नाहीशी झाली आहे. (११.२४)
२७) विक्राळ दाढांनी युक्त असे हे तुझे मुख, प्रलयकाळच्या अग्नीप्रमाने दाहक दिसते आहे, मी दिक्‌मूढ झालो आहे, माझे स्वास्थ्य नाहीसे झाले आहे, हे जगन्निवसा, प्रसन्न हो. (११.२५)
२८) हे देववरा, तुला नमस्कार असो. प्रसन्न हो. हा आदिपुरुष असा तू कोण आहेस हे जाणून घेण्याची मला इच्छा आहे, तुझी ही करणी मला कळत नाही. (११.३१)
२९) तुझा महिमा न समजल्याने, मी तुझ्याशी सलगीने, सख्यत्त्वाने, बरोबरीला येऊन, अमर्यादेने, अजाणता काही चुकीचे बोललो असेन, (११.३१)
३०) क्रीडा, शयन, आसन, भोजन इ. प्रसंगी, एकांती किंवा सर्वांसमक्ष तुझा थट्टेने अपमान केला असेन तर हे अच्युता, मी तुझी क्षमा मागतो. (११.४२)
३१) प्रेमळ पिता जसा पुत्रकल्याणासाठी, प्रेमळ मित्र जसा मित्राच्या भल्यासाठी अपराध सहन करतो, तसे माझे अपराध तू सहन कर. (११.४४)
३२) तुझे पूर्वी कधीही न पाहिलेले रूप पाहून आनंद आणि भय दोन्हींनी माझे मन व्यापले आहे. देवा, प्रसन्न होऊन तुझे देवरूप मला दाखव. (११.४५)
३३) मुकुट, चक्र, गदा घेतलेल्या रूपात तुला पाहू दे. हे सहस्रबाहो, विश्वमूर्ती, तुझ्या चतुर्भुज रूपात मला दर्शन दे. (११.४६)
--------------------------------------------------------
(१०) सगुणभक्तीयोगाविषयीचे प्रश्न
३४) अशा रीतीने सतत योगयुक्त होऊन जे भक्त तुझी सगुण उपासना करतात, तसेच जे तुझ्या अव्यक्त, अक्षरब्रह्मरूपाची उपासना करतात, त्यापैकी उत्तम योगवेत्ते कोण? (१२.१)
-------------------------------------------------------
(११) गुणत्रयविभागयोगाविषयीचे प्रश्न
३५) त्रिगुणांच्या पलिकडे गेलेला कोणत्या लक्षणांनी युक्त असतो? त्याचे आचरण कसे असते? त्रिगुणांच्या पलिकडे तो कसा पोचतो? (१४.२१)
------------------------------------------------------
(१२) श्रद्धात्रयविभागयोगाविषयीचे प्रश्न
३६) शास्त्रविधी योग्य रीतीने न पाळता यजन करणार्‍या श्रद्धावानांची निष्ठा ही सात्विक, राजस की तामस मानावी? (१७.१)
------------------------------------------------
(१३) मोक्षसंन्यासयोगाविषयीचे प्रश्न
३७) हे केशी दैत्याचा वध करणार्‍या हृषीकेशा, संन्यास आणि त्याग यांचे वेगवेगळे तत्त्व समजाऊन सांग. (१८.१)

॥श्रीराम समर्थ॥