॥श्रीराम जय राम जय जय राम॥

- साधकाचा अर्थ - ‘राम माझा स्वामी आहे, माझा रक्षणकर्ता आहे, माझ्या हृदयात आहे’, ही निष्ठा.
------------------------------------
श्रीराम म्हणजे पुरुषोत्तम, म्हणजेच सगुण आणि निर्गुण परमात्मा.

सगुण परमात्मा म्हणजे नामरूपांनी गजबजलेलं दृश्य विश्व.
निर्गुण परमात्मा म्हणजे त्या विश्वाचे सत्तारूप सूक्ष्म अधिष्ठान.
जयराम म्हणजे जेथेतेथे त्या पुरुषोत्तमाचाच जय आहे. कारण खरा कर्ता तो असल्याने त्याच्या इच्छेने, त्याच्या संकल्पाने सर्व विश्व जगते, हालते व चालते. त्याची शक्ती सर्व घडामोडींमध्ये काम करते.
जयजयराम म्हणजे, परमात्मा आतबाहेर कल्याणमय आहे, त्याची शक्ती जे घडवून आणते, ते पूर्ण कल्याणाचेच असते. म्हणून घडीघडी घडणार्‍या घटनांमध्ये कल्याणाची कल्पना करावी आणि परमात्म्याचा जयजयकार करावा.
--------------------------------------------
हा मंत्र महणजेच नाम. याने सगुणाचे दर्शन होते तसा निर्गुणाचा साक्षात्कारदेखील होतो. सगुणाच्या दर्शनमध्ये आपले आराध्यदैवत आपल्या संगतीला राहाते.
नाम हे साधकाला निर्गुणाचाही साक्षात्कार करून देते त्यावेळी सर्व विश्व एकाच परमात्मस्वरूपाने भरून गेलेले प्रत्यक्ष अनुभवाला येते.
----------------------------------------------
परमात्मा समाधानरूप आहे. [संदर्भ - पृष्ठ ६२०]
समाधान सागरासारखे आहे.
त्यावर जे सहजतरंग येतात, ते स्फुरण म्हणजे शांती.
हा सागर ज्या स्फुरणाने उसळतो, त्या स्फुरणाला आनंद म्हणतात.
आनंदामध्ये विश्व निर्माण करण्याची प्रचंड शक्ती अंतर्भूत असते. तो आनंद सहन करण्यास गुरुकृपा लागते.
--------------------------------
[संदर्भ - श्री गोंदवलेकरमहाराज चरित्र, पृष्ठ ६३९ ते ६४० लेखक - श्री. के.वि.बेलसरे]

॥श्रीराम समर्थ॥