ज्ञानकर्मसंन्यासयोग (अध्याय ४)

मी- एक साधनी:
गीतेच्या चवथ्या अध्यायात सांगितलेला ज्ञानकर्मयोग कसा असतो?
माझ्या मनातील सद्गुरु:
हा अविनाशी योग परमात्म्याने प्रथम सूर्याला सांगितला, त्याने तो आपला पुत्र मनू याला सांगितला, मनूने त्याचा पुत्र राजा ईश्वाकू याला सांगितला. परंपरेने तो राजर्षींनी जाणला. त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग पृथ्वीवर नष्ट झाला होता. हा योग परमात्म्याने श्रीकृष्ण अवतारात अर्जुनाला सांगितला.
हा योग अतिशय उत्तम आहे.
तो रहस्यमय आहे.
तो गुप्त ठेवण्यासारखा आहे.
पूर्वीच्या मुमुक्षूंनी हा जाणून त्याप्रमाणे कर्मे केली.
सध्याच्या मुमुक्षूंनी त्याप्रमाणे करायला हरकत नाही.
---------------------
मी- एक साधनी:
तो कसा आचरावा?
माझ्या मनातील सद्गुरु:
सुरुवातीला कर्माचे, अकर्माचे व विकर्माचे स्वरूप जाणावे.
कारण कर्माची गती गहन आहे.
सर्व यज्ञ मन-इंद्रिये आणि शरीर यांच्या क्रियांतून निर्माण होतात.
हे जाणल्यामुळे मुमुक्षू मुक्त होऊ शकतो.
द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे.
सर्वच्या सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होतात.
मुमुक्षूने तत्वदर्शी ज्ञानी लोकांकडून ज्ञान समजून घ्यावे.
त्यांना प्रणिपात करावा, त्यांची सेवा करावी, त्यांना प्रश्न विचारावेत, ते जो उपदेश करतील तो ऐकावा. हृदयात असलेल्या, अज्ञानाने निर्माण झालेल्या संशयाला ज्ञानाच्या तलवारीने छेदून टाकावे व योगात स्थित व्हावे.
मी- एक साधनी:
महाराज, सद्गुरुचे महत्व, संतसंगती, सद्गुरुचे आज्ञापालन याविषयी तुम्ही जे तुमच्या भक्तांना अनेकवार, विविध उदाहरणे देऊन, स्वतः तसे आचरण करुन आदर्श प्रस्थापित केलात, तसेच श्री भगवंत ज्ञानकर्मयोगात सांगत आहेत असं मला दिसलं.
----------------
महाराज, हे ज्ञानकर्मसंन्यासी कसे असतात? त्यांची आंतरिक स्थिती कशी असते?
माझ्या मनातील सद्गुरु:
भगवंत अर्जुनाला सांगताहेत की, हे योगी माझा जन्म आणि कर्म दिव्य आहेत असे तत्त्वत: जाणतात (ते मलाच येऊन मिळतात).
त्य़ांचे आसक्ती-भय-क्रोध पूर्णपणे नाहीसे झालेले असतात, ते माझ्या अनन्यतेत राहातात, ते माझ्या आश्रयाने राहून माझ्या भावात प्राप्त होतात.
ते कर्मामध्ये अकर्म पाहातात, अकर्मामध्ये कर्म पाहातात, ते सर्वांत बुद्धिमान असतात.
ज्ञानकर्मसंन्यासी हे सर्व कर्मे करणारे योगी असतात.
त्य़ांची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामसंकल्पविरहित असतात, त्यांची सर्व कर्मे ज्ञानाग्नीने दग्ध झालेली असतात, त्यांना ज्ञानी पंडित म्हणतात.
हे सर्व कर्मांमधील आसक्ती पूर्णपणे टाकून देतात, ते सर्व कर्मफलांमधली आसक्ती पूर्णपणे टाकून देतात, ते कशाचाही आधार, अवलंबन न घेता नित्यतृप्त राहातात, ते सर्व कर्मे व्यवस्थित करताना दिसत असूनही काहीच करीत नसतात.(मी करतो- मिळवतो हा भाव संपलेला असतो).
त्यांनी अंत:करण व इंद्रियांसह शरीर जिंकलेले असते, त्यांनी सर्व साठवणुकीचा(परिग्रह) त्याग केलेला असतो, त्यांची कशाहीसंबंधी आशा राहिलेली नसते, ते केवळ शरीरसंबंधी कर्मे करीत असताना त्यांना पाप लागत नाही.
ते इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतात, त्यांना अजिबात मत्सर वाटत नाही, ते द्वंदाच्या पलिकडे गेलेले असतात, सिद्धी-असिद्धीत ते समभाव ठेवतात, ते कर्म करीत असूनही त्यात बांधले जात नाहीत.
त्यांची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झालेली असते (गतसंग), ते मुक्त असतात, त्यांचे चित्त परमात्म्यामध्ये सदैव स्थित असते, ते फक्त यज्ञकर्मे करतात, त्यांची सर्व कर्मे विलीन होऊन जातात.
----------------------------
मी- एक साधनी:
महाराज, श्रीरामरायाच्या नामाला मी माझी जिव्हा विकली आहे असं आपण एकदा भक्तांना सांगितलं होतं. आपण रामाशी अनन्य होता आणि आपल्याला शरण आलेल्यालाही आपण तेच करायला सांगत असायचे. प्रपंच दक्षतेने करावा, आपला व्यवहार चोख असावा, आपण कोणाला गंडवू नये आणि कोणाकडून गंडून घेऊ नये असं भक्तांना आपण सांगितलं होतं. आपली विनवणी-अट एकच होती- शेवटचा श्वास जाईपर्यंत रामनामस्मरण चालू ठेवायचं म्हणजे आपल्या कर्मांच्या फलांचं काय करायचं हे रामराय बघून घेतील. कारण आपण त्यांचं नाम घेत असताना आपल्या नकळत आपण आपली सर्व कर्मे त्यालाच अर्पण करतो. तोच कर्ता आहे असा विश्वास अंतर्यामी आपण ठेवतो.
--------------------------
महाराज, या आपल्यासारख्या ज्ञानकर्मसंन्यासयोग्यांना भगवंत कोणते फल देतात?
माझ्या मनातील सद्गुरु:

भगवंत सांगताहेत की, जे भक्त मला जसे भजतात, मी ही त्यांना तसाच भजतो.
सर्वच मानव आपापल्या पद्धतीने माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात.
जो मला तत्वत: जाणतो (अभिजानाति), त्याला कर्मांचे बंधन होत नाही. (जसे मला नाही.)
ब्रह्मयज्ञ असा असतो- जे अर्पण करायचे- ते ब्रह्म असते, हवन करण्याजोगे हव्य (हवि:)- ते ब्रह्म असते, कर्ता ही ब्रह्मरूप असतो. अग्नी ब्रह्मरूप असतो. त्यामधले हवन ही ब्रह्म असते. ब्रह्मकर्मात स्थिर असणार्‍या योग्याला मिळण्यास योग्य असे फलसुद्धा ब्रह्मच आहे.
भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की, हे तत्त्वज्ञान जाणल्याने तू पुन्हा मोहात पडणार नाहीस. या ज्ञानामुळे तू सर्व प्राणिमात्रांत पूर्णपणे प्रथम आपल्याला आणि नंतर मला (सच्चिदानंद) पाहाशील.
जरी तू इतर सर्व प्राण्यांहूनही अधिक पाप करणारा असलास तरीही तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पापसमुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जाशील. ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी सरपणाला भस्मसात्‌ करतो, त्याप्रमाणे ज्ञानाग्नी सर्व कर्मांना भस्मसात्‌ करतो.
या जगात ज्ञानासारखं पवित्र खरोखर दुसरं काहीही नाही. ते ज्ञान काही काळानं योगसिद्धी झालेला माणूस आपल्यामध्ये प्राप्त करून घेतो. जितेंद्रिय,(साधन) तत्पर आणि श्रद्धावान ज्ञान प्राप्त करून घेतो.
ज्याने कर्मयोगाच्याद्वारा विधीपूर्वक सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली, ज्याने ज्ञानाद्वारा सर्व संशयाला छिन्न केलं, ज्याने अंत:करण वश करून घेतलं(आत्मवन्तम्‌), त्याला कर्मे बांधू शकत नाहीत. ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तात्काळ परमशांती प्राप्त करतो.

॥श्रीराम समर्थ॥