इच्छा, काम, क्रोध

मी एक साधनी:
मुळात माणसाच्या मनात एखादा विषय मिळावा, अशी इच्छा कशी निर्माण होते?
माझ्या मनातील सद्गुरु:
सर्व जग तीन गुणांनी बनलेलं आहे.
प्रवृत्ती म्हणजे हवं हा रजोगुण,
निवृत्ती म्हणजे नको हा तमोगुण.
रजोगुणापासून उत्पन्न झालेला काम इच्छा निर्माण करतो.

मी एक साधनी:
हा काम कोठे उत्पन्न होतो?
माझ्या मनातील सद्गुरु:
कामाची म्हणजे इच्छा, अपेक्षा यांची निवासस्थाने इंद्रिये, मन व बुध्दी असतात. हा काम मन-बुध्दी आणि इंद्रियांच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करुन जीवात्म्याला मोहित करतो.
इच्छा जर पूर्ण नाही झाली तर त्याचे क्रोध निर्माण होतो.
हा काम खूप खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. हाच या परमार्थातील वैरी आहे.
या कामामुळे ज्ञान झाकले जाते. जसे धुराने अग्नी, धुळीने आदर्श म्हणजे आरसा व वारेने गर्भ झाकला जातो.
मी-मला-माझे या अहंकारामुळे, परमात्मा हा या दृश्य अदृश्य जगाचा निर्माता-त्राता-संहारक आहे, हे माणूस विसरतो.
माझी इच्छातृप्ती त्याच्यावर अवलंबून आहे, माझ्या कर्माचे फल तोच देणार आहे हे माणसाच्या लक्षात येत नाही.
ज्ञान याचा अर्थ फक्त माहितीचे संकलन करुन घेणे नाही तर, आत्मज्ञान म्हणजे मी देह नाही, आत्मा आहे व परमात्म्याचा अंश आहे, हे निरंतर अनुभवणे.
परमात्मा कायम असतो. तो जात-येत नाही व तो आनंदमय आहे म्हणून माणसालाही आनंदी व्हावेसे वाटते, चिरंतन असावेसे वाटते.
ही इच्छा त्याचा देह पूर्ण करु शकत नाही.

माणसाच्या देहबुध्दीची ती मर्यादा आहे.

॥श्रीराम समर्थ॥