त्रिगुणात्मक जगाची निर्मिती

मी एक साधनी:
बहुतांशी अज्ञानी आणि क्वचित एखादा ज्ञानी अशी सरमिसळ असलेली त्रिगुणात्मक जगाची निर्मिती परमात्मा कशी करतो?

माझ्या मनातील सद्गुरु:
वर मूळ व खाली शाखा असा आदि-अंत नाही असा अविनाशी संसार वृक्ष परमात्म्याने त्याच्या मायेने निर्माण केलेला आहे.
वेद ही त्या वृक्षाची पाने आहेत.
या वृक्षाची मुळे म्हणजे आदिपुरुष सगुण ब्रह्म.
या आधारावर खाली अनंत शाखा-उपशाखा असलेला संसार पसरलेला असतो.
याचे मुख्य खोड म्हणजे हिरण्यगर्भरूप ब्रह्मदेव.
त्यातून शाखा-उपशाखा या विविध योनी (देव-मनुष्य-तिर्यक इ.) निघालेल्या आहेत. त्या सत्व-रज-तम गुणांच्या पाण्यावर वाढलेल्या आहेत आणि विषयभोगाची कोवळी पाने त्याला आहेत. या फांद्या वरखाली सर्वत्र पसरलेल्या आहेत.
पिंपळाप्रमाणे असणार्‍या या वृक्षाच्या शाखा-उपशाखांना ममतात्मक मुळं फुटलेली आहेत, ही मुळे मनुष्यलोकात कर्मबंधामुळे निर्माण होतात व ती सर्व लोकांत व्यापून राहिली आहेत.
------------------------------
परमात्म्याचे महत्ब्रह्म ही योनी आहे.
तिच्यामध्ये तो गर्भ स्थापन करतो.
त्यातून सर्व भूतांची उत्पती होते.
तोच महत्ब्रह्मयोनी (माता) आणि तोच बीजप्रद पिता आहे.
त्याच्यातच सर्व योनींमध्ये अनेक मूर्ती (जीव) निर्माण होतात.
प्राण्यांचे विविध प्रकारचे भाव [बुद्धी, ज्ञान, असंमोह, क्षमा, सत्य, दम इंद्रियनिग्रह), शम(शांती), सुख-दु:ख, उत्पत्ती-प्रलय, भय-अभय, अहिंसा, समता, संतोष, तप, दान, यश-अयश परमात्म्यापासून होतात.
-----------------------------
भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की, सात महर्षी, चार सनकादिक कुमार, चौदा मनू हे माझ्या ठिकाणी भाव असलेले असतात..
हे सर्वच माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत. या जगातील सर्व प्रजा त्यांचीच आहे.
अविनाशी परमात्म्यापासून वेद उत्पन्न झाले,
वेदांपासून कर्मसमुदाय उत्पन्न होतो.
विहित कर्मांमुळे यज्ञ घडतो,
यज्ञामुळे पाऊस पडतो,
पावसापासून अन्ननिर्मिती होते,
अन्नापासून सर्व प्राणी निर्माण होतात.
परमात्मा पृथ्वीमध्ये प्रवेश करुन सर्व भूतांचे धारण करतो.
रसरूप चंद्र होऊन सर्व औषधींना पुष्ट करतो.
सर्व प्राण्यांच्या शरीरामध्ये स्थित रहाणारा परमात्मा प्राण आणि अपान यांनी संयुक्त असा वैश्वानर (अग्नी) होऊन चार प्रकारचे अन्न (भक्ष्य, पेय, लेह्य, चोष्य) पचवतो.
परमात्म्यापेक्षा दुसरे परतर नाही, दोर्‍यात मणी ओवावेत तसे हे सर्व परमात्म्यामध्ये गुंफलेले आहेत.
परमात्मा सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये असतो.

त्याच्यापासून स्मृती व ज्ञान होतात.
त्याच्यामुळे बुध्दीतील संशय-विपर्यय इ. दोष जातात (अपोहनम).

॥श्रीराम समर्थ॥