पन्नाशीपासून शंभरीपर्यंतची शांति

५० ते १०० वयाची शांति
[संदर्भ - वयोवस्थाभिध शान्तिसमुच्चयः । - श्री नारायणशास्त्री आंजर्लेकर]
-----------------

पार्श्वभूमी -
भगवंताने माणसाच्या आयुष्यातील पाच प्रमुख घटना आपल्या हातात ठेवल्या आहेत
१) आयुः (माणसाचे आयुष्य)
२) कर्म (त्याचा व्यवसाय)
३) वित्त (त्याला मिळणारे संपत्ती/धन लाभ)
४) अन्न (रोजचे तो खात असलेले अन्न)
५) मरण ( त्याचा मृत्यू)

ब्रह्मदेवाने जी सृष्टी निर्माण केली त्यात फक्त मनुष्याला मोक्षासाठी प्रयत्न करण्याची संधी दिलेली आहे. बाकी कोणत्याही योनीत जन्म घेतला असता (देवयोनीसकट) ही संधी नसते. त्यामुळे मोक्ष मिळवून जन्म-मरणाच्या चक्रातून कायमचं बाहेर पडण्याच्या दृष्टीने मनुष्यजन्माचे महत्व फार आहे.
असलेले आयुष्य परमात्म्याच्या प्राप्तीसाठी माणसाने खर्च करावे व मिळालेल्या संधीचे सोने करावे ही अपेक्षा असते. मात्र आपण याविषयी अनभिज्ञ असतो.

पन्नाशीनंतर प्रपंचाच्या जबाबदार्‍या कमी झाल्यानंतर व वृध्दत्व जवळ आले आहे याची जाणीव होऊ लागल्यानंतर उरलेले आयुष्य परमार्थासाठी उपयोगात आणायचे ठरवले तर तब्येतीनं साथ द्यायला पाहिजे, जवळ पुरेसा धनसंचय असायला पाहिजे, थोडी स्वस्थता असायला पाहिजे.
हे सर्व जमावे, आपली चित्तशुध्दी व्हावी यासाठी आपल्या वेदकालीन ऋषीमुनींनी पन्नाशीपासून दर ५ वर्षांनी शांति करायला सांगितली आहे.

१) वयाच्या ५० व्या वर्षी - वैष्णवी शांति
२) वयाच्या ५५ व्या वर्षी - वारूणी शांति
३) वयाच्या ६० व्या वर्षी - उग्ररथ शांति
४) वयाच्या ६५ व्या वर्षी - मृत्युंजय-महारथी शांति
५) वयाच्या ७० व्या वर्षी - भैमरथी शांति
६) वयाच्या ७५ व्या वर्षी - ऐंद्री शांति
७) वयाच्या ८० व्या वर्षी - चांद्री शांति (सहस्रचंद्रदर्शन)
८) वयाच्या ८५ व्या वर्षी - रौद्री शांति
९) वयाच्या ९० व्या वर्षी - सौरी शांति
१०) वयाच्या ९५ व्या वर्षी - त्र्यंबक शांति
११) वयाच्या १०० व्या वर्षी - महामृत्युंजय शांति

॥श्रीराम समर्थ॥