कालचक्र

कालचक्र
---------------
भगवंताच्या अनंत रूपांपैकी काल हे एक रूप आहे. ब्रह्मदेवाचा दिवस - रात्र - दिवस - रात्र, त्यात अनंत ब्रह्मांडांची उत्पत्ती - वृद्धी - विनाश ही चक्र अव्याहत चालू आहे. हे चक्र चालवणारा सर्वव्यापी - सर्वसाक्षी असून आपल्याला दिसत नाही.

भगवंत म्हणतात, “मी सर्व जीवांना यंत्रवत्‌ फ़िरवतो.
माझी माया त्यांच्यामध्ये असलेल्या माझ्या अंशावर मोहाचं आवरण घालते व त्यामुळे ते हे जीव माझं अस्तित्त्व जाणू शकत नाहीत.
त्यांचा अहंकार "मी कर्ता" हा भाव निर्माण करतो.
"हवं - नको" या द्वंद्वात सापडल्यामुळे जीव बरी-वाईट कृत्ये करतात, ज्यांची जबाबदारी त्यांना त्यांच्यावर घ्यावी लागते.
त्या कर्मफ़लांप्रमाणे त्यांना विविध गती प्राप्त होतात व ते अनंत काळ - युगानुयुगे या चक्रात फ़िरत राहातात.
-------------------------------------------
हे कळल्यावर मला काय वाटले?
- हा एकच जन्म. मागचं-पुढचं माहीत नाही. ते कळण्याची गरज नाही. ते कळू शकतही नाही. म्हणून आत्ता जे वाटतय ते करायचं, पुढचं पुढं बघू ही वैचारिक भूमिका आंधळेपणाची, पळपुटेपणाची आणि आपल्या अहिताची आहे.
- केलेल्या प्रत्येक कर्माचे फल जर निश्चित आहे आणि ते भोगावं लागतं तर केलं जाणारं कर्म कशात मोडतं, ते सत्कर्म आहे की दुष्कर्म हे समजून घ्यायलाच हवं. प्रत्येक कर्माच्या फलाविषयी जाणून ते करायचं की नाही करायचं यावर आपण नियंत्रण ठेवायला हवं. याचा अर्थ असा की कोणती कर्मे करावीत व कोणती करु नयेत याचे काही शास्त्र असायला पाहिजे.
- मला मुळात या जन्म-मृत्यू चक्रात राहण्यात रस आहे का? याचा विचार व्हायला हवा.
- कोणत्या वासना अजून शिल्लक आहेत, त्या पुर्‍या होणं गरजेचम आहे का?
- त्या पुर्‍या होऊ शकतील का?
- कोणत्या वासना सद्‌वासना, कोणत्या असद्‌वासना हे समजायला हवे.
- वासना या अनंत आहेत. त्या सर्व पुर्‍या होणं शक्य नाही. अतृप्ती हे त्यांचे वैशिष्ठ्य आहे.
- परमेश्वरप्राप्ती हवी ही एकच सद्‌वासना मला या चक्रातून सोडवू शकते.

॥श्रीराम समर्थ॥