श्रीरामरायाची मानसपूजा

श्रीरामरायाची मानसपूजा (श्रीमहाराज विरचित)
---------------------
घ्यावी सेवा दीनाची दीनानाथा
उपचारसहित सीताकांता ॥धृ.॥

निर्मियेले नूतन मंदिरासी
ठायीठायी बांधियेले वितानासी
जाळ्या पडदे सोडीले चोहोपासी
अर्पियेले राघव विश्रामासी ॥१॥

रत्नचौकी रामासी बैसविले
उष्ण उदके चरण प्रक्षाळिले
शुध्द नीरे गंडुष (चूळ) करविले
शुभ्र वस्त्रे चरण स्वच्छ केले ॥२॥

कस्तुरीने दशनशुध्दि (दात घासणे) केली
सुशीतळ लळाने भरियेली
झारी कैसी हस्तकी शोभली
रामरूप न्याहाळिता शोभा आली ॥३॥

पंचामृत घेतले निजकरी
मंत्रयुक्त घातले रामावरी
उदकाने धुतले झडकरी
गंधतैले चर्चिला रावणारी ॥४॥

तीर्थोदके घातले शुध्द स्नान
आचमन पादुका सिंहासन
वस्त्रद्वय उत्तम समर्पून
गंधाक्षता वाहिल्या संपूर्ण ॥५॥

पुष्प धूप दीपक आणि अन्न
पंचामृत शर्करा सुओदन (उत्तम भात)
भक्ष्य (अन्न/जेवण) भोज्य घृतयुक्त पक्वान्न
शाखा (भाजी) स्वल्प क्वथिका (कढी/आमटी) घ्या सन्मान ॥६॥

नाना फळें तांबूल दक्षिणा
घृतदीपे अरार्तिके (आरत्या) जाणा
समर्पितो तुम्हांसी रामराणा
दास वंदी सद्‌भावें चरणा ॥७॥

रघुपति राघव राजाराम पतितपावन सीताराम ।
रघुपति राघव राजाराम पतितपावन सीताराम ।
॥ श्रीराम समर्थ ॥