विराधकृत रामस्तुती

विराधकृत रामस्तुती
(अत्री ऋषींच्या आश्रमातून निघून नदी पार करून दंडकवनात येताच विराध राक्षसाशी गाठ, त्याचे मर्दन, विराध – दुर्वासमुनींच्या शापाचे फळ भोगणारा विद्याधर)
दुर्वासमुनींच्या शापातून माझी मुक्तता तुझ्यामुळे झाली.
यापुढे संसारपीडेचा उपशम व्हावा यासाठी तुझ्या चरणकमलांची सतत स्मृती राहू दे.
माझी वाणी केवळ तुझ्याच नामाचे कीर्तन करो.
माझे कान तुझ्याच कथामृताचे प्राशन करोत.
माझे दोन्ही हात तुझ्याच चरणकमलांच्या उपासनेत गुंतून राहोत.
माझे शिर तुझ्या चरणद्वयांना प्रणाम करण्यासाठी नत राहो.
माझे सर्व शरीर तुझ्याच सेवेत नित्य तत्पर राहो.
विशुद्धज्ञान ही तुझीच मूर्ती आहे.
तू स्वस्वरूपी रममाण होणारा आहेस.
तू सर्वांना रमविणारा आणि अघटित घडविणारा आहेस.
मी तुला शरण आलो आहे, तू माझे रक्षण कर.
मी तुझी आज्ञा घेऊन देवलोकांत जाईन.
तुझी माया मला मोहित न करो.