संतसमागम

संतचरित्रे

-------------------------
अगदी लहानपणापासून गेली कित्येक वर्षे मी संतांची चरित्रे वाचते आहे.

लहानपणी शाळेत असताना मोठ्या अक्षरातली संक्षिप्त चरित्रे मी वाचली होती. ते वय लहान असल्याने विविध प्रकारच्या भावना माझ्या मनात उमटल्या होत्या. भक्त धृव, प्रल्हाद यांच्या वयाची मी त्यावेळी असूनही ते आणि मी यांच्यातील मुलभूत फरक मला जाणवला होता. माझी गुरुशोधाची, परमेश्वरप्राप्तीसाठी लागणार्‍या साधनेची तयारी अजून झालेली नाही, हे लक्षात येऊन मी खूप खट्टू झाले होते.

मधला काळ सायन्स कॉलेजमधील व नंतर मेडिकलचे शिक्षण, हॉस्पिटलमध्ये निवासी राहून काम यात गेला. लग्न झालं. मी एम्‌. डी.चं शिक्षण पुरं केलं. आणि काही दिवसातच मोठा मुलगा समन्वय याचा जन्म झाला. त्याला डाऊन्स सिंड्रोम आहे असं कळलं. मग मी वैद्यकीय व्यवसाय सोडून मानसशास्त्र व अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली. अधिक जाणीवपूर्वक वाचन करीत गेले. ती जवळजवळ २० वर्षे मी बौध्दिकदृष्ट्या अधिक चिकित्सक होते.

२००६ मध्ये मात्र सद्‌गुरूंचा अनुग्रह घेतल्यानंतर माझ्या चित्तात पुष्कळ बदल झाला. यानंतरच्या काळात मी खूप वेगळ्या भूमिकेतून संतचरित्रे अभ्यासली. एक साधक म्हणून ती अभ्यासताना मी कोणत्या पातळीवर आहे हे माझ्या लक्षात आलं आणि हे संत कोणत्या पातळीवर असावेत याचा प्राथमिक अंदाज मला आला. मला अजून किती दूर जायचं आहे, किती चित्तशुध्दी व्हायची आहे, किती प्रचंड साधना करायला हवी आहे, याची अस्पष्टशी जाणीव झाली. माझ्या मनातल्या चिकित्सेची जागा संतांविषयीच्या आदरानं, कृतज्ञतेनं, अधिक उत्साहानं घेतली.

काही नेमक्या संतांविषयी मला या वेबसाईटवर लिहावसं वाटलं.
ते यथावकाश लिहिते आहे.
सुरुवातीला फक्त फोटॊ स्कॅन करून दिले आहेत.
नंतर मला या एकेका संतामधलं वेगळेपण आणि सर्वांमधलं साधर्म्य कसं जाणवलं ते लिहिणार आहे.

॥श्रीराम समर्थ॥