श्रीरामेश्वरदर्शन

सर्व स्नाने झाल्यावर ओलेत्याने कुडकुडत आम्ही देवळाबाहेर आलो. तेथे असलेल्या एकमेव चहाच्या/कॉफीच्या टपरीवर एकच गर्दी झाली.
चहाने जरा तकवा आल्यावर आम्ही रुमवर आलो. रुमवर पुन्हा गोड्या पाण्याने स्नान केले. आता मी साडी नेसले. पूजेचे सामान घेऊन आम्ही खाली लॉबीत आलो. सर्वजण आल्यावर गुरुजींच्या घरी गेलो व तेथे आम्ही चहा नाश्ता केला.
गुरुजींचे घर हॉटेलजवळच होते. ते खूप मोठे मात्र साधेसुधे होते. हॉटेलमध्ये कंपनीच्या स्वयंपाकाला परवानगी नव्हती. गुरुजींनी त्यांच्या घराचा तळमजला उपलब्ध करून दिला होता. सतरंजीवर बसून केळीच्या पानावर नाश्ता झाला.
मग जशी धार्मिक कार्ये ठरली होती त्याप्रमाणे विभागणी झाली. काहींनी श्राध्दे करवली. मी स्त्री असल्याने श्राध्दे करू शकले नाही. इथपर्यंत येऊन श्राध्द न करता आल्यामुळे मला वाईट वाटले. माझे यजमान आले असते व त्यांनी श्राध्दे केली असती तर आमच्या पितरांना बरे वाटले असते..पण यजमान माझ्यासारखे भक्तीमार्गी नसल्याने ते घडू शकले नाही. मी मनातल्या मनात आमच्या पितरांची क्षमा मागितली व त्यांचे स्मरण केले.
डोळे पुसून मी करु शकत असलेल्या धार्मिक कार्यांच्या सिध्दीकरीता सरसावले.
श्रीरामेश्वराच्या व श्रीपार्वतीमातेच्या पूजेचे संकल्प सोडले, सौभाग्यवाय़न दिले (मी घरून ओटीचे सामान नेले होते). याची सर्व व्यवस्था गुरुजींच्या सौभाग्यवतीने केली. तिच्या मदतीला तिच्या मुली होत्या. त्या परकरपोलक्यात होत्या. गोप्रदान दिले (संकल्प व दक्षिणा).
समुद्रातून आणलेल्या सेतूचे पूजन झाले. त्यातील एक भाग घरी ठेवायला दिला गेला व एक भाग काशीला गेल्यावर तेथे श्रीविश्वेशाला अर्पण करायला गुरुजींनी बांधून दिला.
सर्वांचे पूजन झाल्यावर आम्हाला घेऊन गुरुजी पुन्हा मंदिरात जायला निघाले.
साडी आवरत हातातील पर्स व पडशी सांभाळत गर्दीत आम्ही २ किमि. चाललो. पहाटेच ४ किमिहून अधिक चाल झाली होती. पण आता श्रीरामेश्वराच्या दर्शनाची व त्याच्या वर श्रीगंगा अर्पण करण्याची वेळ जवळ आल्याने मी अधिर झाले होते. मनात रामनाम चालूच होते.
पहाटेप्रमाणेच सर्व सोपस्कारातून गेल्यावर आम्ही मोजके काहीजण उंबर्‍याबाहेर उभे राहिलो. मग गुरुजींनी आमच्याजवळच्या गंगाजलाचे एकत्रीकरण केले ते त्यांच्याजवळील कलशात ओतले. त्यात बेलपाने, फुले घातली ते लगबगीने गाभार्‍यात गेले. त्यांनी आमच्यासमोर मंत्रोच्चार करीत श्रीरामेश्वराच्या पिंडीवर गंगाजल समर्पित केले. सर्वांनी श्रीशंकराचा जयजयकार केला. माझ्या डोळ्यांत अश्रू आले.
लहानपणापासून काशी व रामेश्वराचा उल्लेख ऐकलेला होता. रामायणात वर्णिलेल्या या देवाचे दर्शन कधी होईल अशी आस लहानपणापासून बाळगली होती. गुरुनाथ ट्रॅव्हल्सच्या सहाय्याने व अनोळखी यात्रेकरुंच्या सोबतीने परमेश्वराचे दर्शन आज झाले हे खरोखर भाग्याचे.
या देवाचे फोटो कोठेही उपलब्ध नाहीत. बाहेरच मोबाईल, कॅमेरा व इतर वस्तू ठेवण्याचा दंडक असल्याने व येथील कडक शिस्तीमुळे या मंदिराचे व त्यातील देवाचे पावित्र्य राखले गेले आहे.
------------------
आता आम्ही सभामंडपातील एका कोपर्‍यात बसून देवाच्या प्रतिमेवर बिल्वार्चन केले.
नंतर आम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केले.
प्रत्येकासाठी रुद्रसूक्ताचा एकेक पाठ म्हणण्याची व्यवस्था गुरुजींनी केली होती. वेळेअभावी कोणीही लघुरुद्र इ चा अग्रह करू नये असे त्यांनी सुचवले होते.
मग आम्ही श्रीमारुतिरायाने कैलासाहून आणलेल्या आत्मलिंगाचे (हनुमतेश्वराचे) दर्शन घेतले त्याशिवाय ही यात्रा संपन्न होत नाही.
श्रीरामाने लंकेला रावणाचा वध केल्यानंतर ब्राह्मणवधाच्या पापाचे शल्य त्यांच्या मनात होते. श्रीरामराय सीतामाईला घेऊन पुन्हा समुद्राच्या अलिकडच्या किनार्‍याला आले. त्यांच्या मनातील खिन्नता तेथील ॠषीवृंदाने ओळखली. त्यांनी श्रीरामरायांना श्रीमहादेवाच्या लिंगाची स्थापना करण्यास सुचवले. तेव्हा श्रीरामरायाने फक्त एकदा आपला शिष्य श्रीहनुमानाकडे खुणेने पाहिलं. त्या स्वामीभक्ताने आपल्या स्वामीच्या मनातले ओळखले व त्यांचे आशीर्वाद घेऊन मारुतिरायाने कैलासाच्या दिशेने उड्डाण केले. त्यांना वाटेत भरताला भेटून रामरायाचे वृत्तही सांगायचे होते. काही राक्षसांनी विघ्न आणल्याने त्यांना कैलासावर जायला वेळ लागला. तेथे श्रीशंकरांचे दर्शन घेऊन त्यांना विनंति करून त्यांनी आत्मलिंग मिळवायला पुन्हा वेळ लागला.

medium_painting4.jpg

तोपर्यंत प्रतिष्ठापनेचा पुण्यमुहूर्त टळू लागला तेव्हा श्रीरामाच्या आज्ञेने श्रीसीतेने तेथे असलेल्या सेतूने (वाळुने) आपल्या हाताने लिंग स्थापन केले. ऋषीवृंदांच्या वेदोच्चारांत श्रीलिंगाची प्रतिष्ठापना झाली. तेवढ्यात श्रीमारुतिराय आत्मलिंग घेऊन आले व लिंगस्थापना झालेली बघून ते नाराज झाले. तेव्हा श्रीरामाने पुढे होऊन त्यांचे अभिनंदन केले, त्यांच्याकडून पूर्ण वार्ता ऐकली व त्यांच्याजवळील लिंग घेऊन त्याचीही स्थापना केली व म्हणले की या लिंगाचे दर्शन घेतल्याशिवाय श्रीरामेश्वराच्या दर्शनाचे पुण्य मिळणार नाही.

त्या मंदिरात श्रीमारुतिरायाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. तिला मी महाराज महाराज म्हणत प्रदक्षिणा घातली. महाराजांच्या दर्शनाचे सुख मला झाले. त्या मूर्तिच्या चेहेर्‍यावर मला गोड-गोंडस-निष्पाप भावाचे दर्शन झाले.

मागाहून कोणीतरी म्हणाले की हा मारूति किती रागीट आहे..मला आश्चर्यच वाटले....जसा भाव तसे दर्शन..असो.
-----------------

आता गुरुजींनी आम्हा सर्वांना गोळा केले व ते मागेच असलेल्या श्रीपार्वतीमातेच्या मंदिरात घेऊन गेले.
हे मंदिर भव्य आहे व मूर्ती उंचावर आहे त्यामुळे तिचे सहज दर्शन झाले.
श्रीपार्वतीमातेच्या मुर्तीचे शिल्प सौंदर्य,आयुधे, वैभव पहाण्यासारखे आहे.
हे स्थान सतीच्या पीठापैकी असलेल्याने तिला महत्व आहे.
----------------------
मग आम्ही प्रसाद घेतला, मी भस्माची पाकीटे घेतली. हे भस्म अतिशय सुवासिक असते.
पुन्हा २ किमि. चालत मात्र हृदयात खूप आनंद घेऊन आम्ही मंदिराबाहेर आलो.
त्या दिवशी एकूण १२ किमि चाल झाली पण मन आनंदाने काठोकाठ भरलेले होते. जे मला आजही आठवते.

ज्यांची कार्ये राहिली होती ते गुरुजींच्या घरी गेले.
आम्ही रुमवर येऊन विश्रांती घेतली.
भोजनाची वेळ झाल्यावर आम्ही भोजन केले, पुन्हा विश्रांती घेतली.

medium_sunset.jpg

संध्याकाळी समुद्रावर फिरायला गेलो. त्या संध्याकाळच्या वेळी तो समुद्र बघताना मला श्रीरामराय येथून लंकेला कसे गेले असतील, तेथे युध्द करून पुन्हा कसे परत आले असतील याचे मनःचित्र बघावेसे वाटले. वाटलं किती लक्ष वर्ष झाली आहेत या घटनेला..तो काळ किती वेगळा असेल..माणसं नगण्य व जंगले-पशु-पक्षी अधिक.
----------
मग आम्ही हॉटेलवर आलो. विश्रांति घेतली. जवळील पाठशाळेत जाऊन तेथे बटूंसाठी काही दक्षिणा दिली.
भोजन घेतले. ते गुरुजींच्या घरीच होते. भोजन झाल्यावर गुरुजींनी आम्हाला गोळा केले व पालखी बघायला येण्यास सुचवले.

॥श्रीराम समर्थ॥