श्रीमद्भगवद्गीता

श्रीमद्भगवद्गीता

---------------
श्रीमद्भगवद्गीतेचा अभ्यास करुन मला काय मिळाले-समजले?
---------------
१. मानवदेहात येऊन परमात्मा मुमुक्षूंना स्वतःविषयी सांगतोय -
• मी कोण आहे? मी कसा आहे?
• माझ्या अनंत शक्ती कशा आहेत? त्याद्वारा मी काय करतो?
• माझ्या मायेद्वारा मी सृष्टीची उत्पत्ती- वृध्दी व लय कसा करतो?

• माझ्या विभूती कोणत्या?
• जीवात्मा कसा असतो?
• बहुतांश जीवात्मे मला का जाणत नाहीत?
• माझ्या मायेने निर्माण केलेल्या मोहात अडकून ‘मी कर्ता आहे’ असा मिथ्या समज करुन घेऊन आपापल्या प्रवृत्तीनुसार कर्म करतात व पाप-पुण्यफलांच्या योगे बंधनात सापडतात व जन्म-मृत्यूच्या चक्रात फिरत रहातात.
• असे सर्व जीवात्मे दुःख, निराशा, उद्वेग,चिंता, द्वेष, मत्सर, मोह, लोभ, क्रोध, दंभ इ. भोगतात.
• एखादाच जिज्ञासू निघतो, अशा जिज्ञासूंपैकी एखादाच मुमुक्षू निघतो, एखादाच दैवी गुणसंपदा घेऊन जन्माला येतो व मला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यातला एखादाच मला येऊन मिळतो व मायेने निर्माण केलेल्या जन्म-मृत्यूच्या चक्रातून कायमचा सुटतो.
• तो माझ्याशी युक्त होऊन जातो.
• तो परमशांती-परमानंद मिळवतो.
• मी व तो असे द्वैत नष्ट होते. मी व तो एक होऊन जातो.
--------------------------------------------------------------------
२. परमात्म्याविषयी समजल्यावर मी काय करावे?
• परमात्म्याविषयी इतर माणसे काय म्हणतात याचा विचार करु नये.
• माझा कर्ता-नियंता-माता-पिता-बंधू-गुरु-सखा-आप्त-हितचिंतक-दाता-भर्ता एक परमात्मा आहे हे लक्षात ठेवावे.
• मी फक्त परमात्म्याचे सतत ध्यान केले तर त्याची मी प्रिय होईन.
• जेथून मी आले त्या निजपदाशी जाणं हेच माझे निरंतर ध्येय असावे.
• जन्मानुजन्म विविध प्रकारचे भोग घेऊन कंटाळा आल्यावर व त्याद्वारा कर्मबंधनात पडून इतके जन्म-मृत्यू अनुभवल्यानंतर, आता या भोगापलिकडचा परमानंद, मला बाह्यजगात आणि माझ्या इंद्रियांनी मिळणार नाही, हे मी सतत लक्षात घ्यावे.
• माझ्यासारखेच सर्व जीव हे या परमात्म्याचे अंश आहेत आणि त्याच्या मायेच्या आधीन आहेत.
• काही मोजके ब्रह्मज्ञानी सोडले तर सर्वचजण अज्ञानी आहेत. ते माझ्यासारखेच परमात्म्याला जाणत नाहीत. तेही माझ्यासारखेच जन्म-मृत्यूच्या चक्रात परमात्म्याच्या इच्छेनुसार फिरत आहेत.
• मी जोपर्यंत स्वतःला कर्ता मानतेय, हा देह म्हणजेच मी मानतेय, तोपर्यंत शाश्वत सुख-आनंद-शांती मला मिळणार नाही.
• तात्कालिक-परावलंबी करणारी अशाश्वत सुखे ही नंतर दुःखातच रुपांतरीत होतात.
• मी त्रिगुणमय बनवली गेल्यामुळे माझी दृष्टी बाहेर वळणारी आहे. मी त्रिगुणातीत कशी होईन? जेणेकरुन माझ्या व सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या परमात्म्याचे दर्शन मला होईल.
• माझ्यातील तमोगुणप्रधान इच्छा-आवडी-विचार-कृती जाणाव्यात व त्याद्वारा मिळणार्‍या गतीचा विचार करुन, त्या मी सोडून द्याव्यात.
• माझ्यातील रजोगुणप्रधान इच्छा-आवडी-विचार-कृती मी जाणाव्यात व त्याद्वारा मिळणार्‍या गतीचा विचार करुन, त्या सोडून द्याव्यात.
• माझ्यातील सात्विक इच्छा-आवडी-विचार-कृती जाणाव्यात व त्याद्वारा मिळणार्‍या गतीचा विचार करुन, त्या करताना`मी कर्ता' हा भाव नष्ट करुन, फक्त शास्त्रविहित कर्मे कर्तव्यभावनेने करुन, ती मी परमात्म्याला अर्पण करावीत.
• परमात्म्याने सूचित केल्याप्रमाणे मी साधना करीत रहावी.
• फलाचा विचार करु नये.
• परमात्म्याचे सतत स्मरण-भजन-पूजन-चिंतन-ध्यास करत, नित्य शास्त्रविहित कर्मे मी करावीत.
• मुक्तीचाही विचार करु नये.
• परमात्म्याचे प्रेमपूर्वक ध्यान मी करीत रहावे.
• जे फल मिळेल ते ही, त्याचा कृपाप्रसाद म्हणून प्रेमाने सेवन करावे
• त्याच्या प्रिय भक्तांचे स्मरण-पूजन करावे. त्यांच्याशी स्नेहसंबंध ठेवावेत. त्यांचे आचरण पहावे.
• परमपदाचे- निजस्थानाचे सतत ध्यान करता करता देह सोडावा.
• कधी ना कधी, केव्हा ना केव्हा, मी त्याच्यातच विलीन होणार आहे हे लक्षात ठेवावे.
• त्याच्याशी देह-मन-बुद्धी-अंतःकरणाने युक्त म्हणजे भक्त आणि त्याच्यापासून दूर म्हणजे अभक्त हे लक्षात ठेवावे.
• तो सोडून काहीच असतंच नाही. जे आहे असं वाटतं ते तसं भासतं. ही त्याचीच लीला आहे. तो आनंदमय आहे - असतो- राहातो. फक्त त्याचीच सत्ता असते.

श्रीराम समर्थ॥