श्रीजगन्नाथपुरी

जानेवारी २०१० - श्रीजगन्नाथरथयात्रा दरवर्षी टी.व्ही वर पाहून विशेषतः श्रीजगन्नाथाचे ते अनुपमेय रुप पाहून, माझ्या मनात त्याला भेटावे, असे कित्येक वर्षे घाटत होते.

उज्जैनला घेतलेल्या श्रीचैतन्यमहाप्रभूंचे चरित्र मी वाचले होते.त्यात मी असे वाचले होते की शेवटची काही वर्षे महाप्रभू पुरीलाच मुक्कामी होते.

medium_chaitanya mahaprabhu.jpg

ते श्रीजगन्नाथाचे दर्शन रोज घेत होते. निर्वाणाचा क्षण जवळ आल्यावर अखेरच्या दिवशी ते देवळात गेले. त्यांनी पुजार्‍याला कल्पना देऊन बाहेर काढले व देवळाचे दार लावून घेतले. श्रीजगन्नाथाची प्रार्थना करताकरता ते जगन्नाथामध्ये विलीन झाले. ते देहाने नाहीसे झाले. ते नंतर कोणालाच दिसले नाहीत. पुजार्‍याने ,"ते देवळात एकांतात गेले होते", एवढेच सांगितले. ज्या जगन्नाथाने आपल्या असीम भक्ताला आपल्यामध्ये कायमचे सामावून घेतले. असा तो गोड मुखमंडल असलेला भगवंत मला पहायचा होता.

सन २०१० च्या जानेवारी महिन्यात गुरुनाथ ट्रॅव्हल्सच्या श्रीगंगासागरयात्रेत पुरीचा समावेश होता. मी पर्वणी साधली.

आधीच गंगासागराचे पूजन-दर्शन करुन परत येत असताना वाटेत गर्दीत मी जीवघेणी गुदमरले होते. त्या धक्क्यातून वाचून परत हावड्याला आल्यावर कलकत्याच्या देवतांची दर्शने आम्ही यात्रिकांनी घेतली. काही ठिकाणी जाण्यास मी नकार दिला उदा. भुयारी रेल्वे, रेल्वे म्युझियम इ. कारण मी माझी सगळी शक्ती श्रीजगन्नाथासाठी व नंतर श्रीशैल्यम्‌च्या मल्लिकार्जुनासाठी एकवटून ठेवली होती.

संध्याकाळी कलकत्याहून पुरीला जाणारी ट्रेन सुटली. आता उद्या जगन्नाथाचे दर्शन होणार अशी अधीर अवस्था माझ्या मनाची झाली होती. आणि काय? त्या रात्री ट्रेनच्या प्रवासात मला जुलाबांनी हैराण केले. पायात गोळे येऊ लागले होते. कुणाला जाग येऊ नये म्हणून मी दिवा न लावता उरकून येत होते. अंधारात औषधे घेत होते. बिसलेरीच्या बाटलीत साखर आणि इलेक्ट्राल घालून पीत होते. लिमलेटच्या गोळ्या चघळत होते. तोंडात रामनामाचा सपाटा होताच.

medium_sea at puri 2.jpg

भल्या पहाटे पुरी स्टेशन आले. समुद्राचा खारट वास नाकात शिरला. अंधारात उतरुन, बसगाडीत बसून, मुक्कामी समुद्रकिनारी असलेल्या हॉटेलमध्ये, आम्ही यात्री दाखल झालो. मी स्नान केले. माझे हातपाय लटपटत होते. मी बरोबर असलेली औषधे घेत होते. इलेक्ट्रालचे पाणी पीत होते. तयार ठेवलेली पूजेची पिशवी मी बरोबर घेतली. पाण्याची बाटली घेतली. संयोजकांच्या सूचनेनुसार मोबाईल, कॅमेरा रुममध्येच ठेवला.

मनात श्रीजगन्नाथाची आळवणी करीत होते - "इतक्या दूर तुझ्या दर्शनाची आस घेऊन आलेय. तुझ्या गावात येऊन दाखल झालीय. तुला अर्पण करायच्या वस्तूंची पिशवी घेतलीय. येवल्याच्या नवीन पैठणीची घडी मोडलीय...(तुझ्या दर्शनाला ती नेसून जायचं हे मनात योजून). मन तुझ्या दर्शनाला आतूर आहे. मला बळ दे. तुझी कृपा असू देत."

मी खाली रिसेप्शनमध्ये आले. खूपच कमी जण जमले होते. नाश्त्याची तयारी चालू होती. या देवळात खूप गर्दी असणार आहे याची कल्पना आम्हाला संयोजकांनी आधीच दिली होती. नास्ता झाला की सर्व निघणार कारण यायला कितीवेळ लागेल हे माहीत नाही असे आम्हाला सांगण्यात आले होते.

गंगासागरला आलेले भाविक पुरीला येऊन जातात. त्यामुळे या काळात इथे प्रचंड गर्दी होतेच. या गर्दीचा अनुभव नुकताच मी घेतल्याने धास्तावले होते. त्यात हातापायात बळ नव्हतं. नास्ता करणं शक्य नव्हतं

"देवा, तुला माझी दया येऊ दे रे. कशी तू माझी परीक्षा बघतोस? इथपर्यंत येऊन तुझे दर्शन झाले नाही तर मी ते कसे सहन करु?..." मी श्रीमन्‌नारायणाचा धावा चालू केला.

इतक्यात काही मंडळी लगबगीने दरवाज्याबाहेर पडताना पाहिली. मी त्याविषयी चौकशी केली तेव्हा ,"एक पंडा त्यांनी ठरवला आहे व तो त्यांचे दर्शन करवतो आहे," हे कळले...मी संधी साधली व पळतपळत त्यांना गाठले. मी पंडाला नमस्कार करुन माझेपण दर्शन करुन देण्याची विनंती केली. त्याने त्याची भरभक्कम दक्षिणा सांगितली..मी ती मान्य केली कारण त्यावाचून माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

आम्ही दोन रिक्षा केल्या. मुक्कामापासून २ मैलावर आत गावात श्रीजगन्नाथाचे मंदिर आहे. गाव लहान आहे. बारीक बोळ आहेत. छोटीछोटी दुकाने आहेत. त्यात भगवंताला अर्पण करण्यासाठी भोग ठेवलेले होते. त्यावर माशा घोंगावत होत्या. स्वच्छतेच्या नावाने आनंद होता.

रिक्षा लांब लावल्या. पंडाने आमचा ताबा घेतला. "पोलिस कसून तपासणी करतात तेव्हा तुमचे दर्शन चुकू नये म्हणुन आधीच तुमच्याकडचे सामान मला दाखवा"’ असे म्हणून त्याने पिशव्या चेक केल्या. आम्ही रांगेत उभे राहिलो. गाईबैलशेळ्या इ. जण मुक्तपणे विहार करीत होते. त्यांच्या शिंगाची धास्ती वाटत होती. यथावकाश आमची स्त्रीपोलिसांकडून तपासणी झाली. आम्ही मंदिराच्या बाहेरच्या आवारात प्रवेश केला.

medium_jagannath temple.jpg

आणि My God! तिथे प्रचंड गर्दी. एवढ्या मोठ्या आवारात पाय ठेवायला सुध्दा जागा नव्हती. तो पंडा म्हणत होता की," म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की, पहाटे पाचला जाऊ या." आम्ही पहाटे ३=३० वा. हॉटेलला आलो होतो. पण आमच्याबरोबरच्या अजून एकांना जुलाब सुरु झाले होते. त्यांचे आवरायला वेळ लागला होता. पण त्यामुळे माझी पर्वणी साधून गेली होती. देवाची कृपा!

ती गर्दी मी पाहिली... आणि मला गंगासागरचं माझं गुदमरणं आठवलं. माझा चेहरा पांढराफटक पडला असावा. त्या पंड्याने आम्हाला धीर दिला. त्याने व त्याच्या सहाय्यकाने आमचा ताबा घेतला. आम्ही ४ जण होतो. एक पुरुष भक्त, त्यांची पत्नी व त्यांची बहिण. मी त्यात परकी पण त्यांच्या बहिणीची रुममेट होते. त्यांनी मला नाईलाजाने स्वीकारलं होतं. मला ते मान्य होतं. पुढे मुख्य पंडा, त्याच्या मागे ते जोडपे, मागे आम्ही दोन बायका, आमच्यामागे पंडाचा सहाय्यक अशी वरात निघाली.

पंडाने आम्हाला काही मौलिक सूचना दिल्या होत्या.
- हात सोडायचा नाही.
- दुसर्‍या कोणाचे ऐकायचे नाही.
- कोणालाही पैसे द्यायचे नाहीत.
- त्याला नजरेमध्ये ठेवायचे. भलत्याच पंडामागे जायचे नाही.
- त्याचे ऐकायचे...कुठे जायचे, कसे जायचे, कोणाची पूजा करायची इ.
- वाटेत असलेल्या प्रत्येक मूर्तीपुढे एक स्थानिक पंडा असतो, तो दक्षिणा मागत असतो..त्याला द्यायची नाही.
- चीजवस्तू सांभाळायच्या इ.
- सर्वात महत्वाचे म्हणजे मौन राखायचे..मनात भगवंताचे भजन म्हणायचे तर सुखाने दर्शन होईल.

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे ।
हे नाथ नारायण वासुदेव ॥

मग, त्याने स्वतः ते भजन गोड आवाजात म्हणायला सुरुवात केली, मागून आम्ही म्हणायला लागलो. मी रंगून गेले. मला त्या भजनाने बळ दिलं, आत्मविश्वास दिला, प्रसन्नता दिली. वाकड्या चेहेर्‍याने मी कसे भगवंताचे दर्शन घेतले असते? तो एवढा प्रसन्नमुद्रेचा आणि ती प्रसन्नता कायम असणारा.

गर्दीत रेटारेटी होत होतीच. गुदमरायला होत होते पण हृदयात प्रसन्नता होती. "तो बोलावतोय..तो वाट पहातोय, तोही दर्शन द्यायलाच उभा आहे." असे वाटू लागले. मी तहानभूक विसरले. माझ्या पायात बळ आले. फक्त त्याचे स्मरण करणाराला त्याचे खरे दर्शन होते. इतरांना फक्त मूर्ती दिसते. माझे भजन होऊ लागले. डोळ्यांत अश्रू येऊ लागले. मंदिराच्या भोवतालचे वातावरण मला पवित्र, मंगलमय वाटू लागले. त्या देवळाची भव्यता, त्यावरची नक्षी, शिल्पे, कळस, त्यावरचे मंगलचिन्हाचे निशाण मला एका वेगळ्या जगात घेऊन गेले. श्रीजगन्नाथाच्या अस्तित्वाचा सुगंधित दरवळ माझ्या जवळ येऊ लागला.

आता आम्ही मंदिरात प्रवेश केला. तिथे थोडीतरी शिस्त होती. प्रचंड पोलिसफौज असूनही ती भक्तांच्या गर्दीला पुरे पडत नव्हती. पंडा म्हणाला की," इथे बारा महिने ३६५ दिवस गर्दी असते. हे चार धामांपैकी एक आहे. शिवाय इथे दर्शन घेतल्यावर यात्रा पूर्ण होतात म्हणून याला पुरी म्हणतात" ..खरच या यात्रेमुळे माझे चार धाम, १२ ज्योतिर्लिंगे, ७ पैकी ५ मोक्षपुर्‍या, इ. पूर्ण होणार होते.

तो पुढे म्हणाला की," तुम्ही इथे आयुष्यात एकदा येता, मी इथे लहानपणापासून आहे...याच गर्दीत वाढलो, काम करतो. धक्काबुक्की सहन करतो. भक्तांसाठी बाकीच्या पंडांशी भांडतो. हे सगळं असंच आहे...जगन्नाथाची इच्छा!"

तो आम्हाला सतत भजनात ठेवायचा प्रयत्न करीत होता. इतर अवांतर गप्पा मारु नका म्हणून विनवीत होता. तो स्वतः भजन म्हणत होता, हात जोडत होता. त्याचे भक्तिमय रुप बघून," हा मला लुबाडणारा पंडा!," अशी त्याची ओळख पळून गेली. मला भगवंताचे दर्शन घडवणारा, त्याची इच्छा म्हणून मला त्याच्यापर्यंत घेऊन जाणारा, त्याचाच एक भक्त असं मी त्याच्याकडे पाहू लागले.

यथावकाश आम्ही गर्भगृहात प्रवेश केला. गर्भगृहात वीजेचे दिवे नाहीत. तिथे नारळतेलाचे दिवे सतत तेवत होते. त्यांनी तेथील उंचवट्यावर उभ्या असलेल्या मूर्ती प्रकाशित होत होत्या. मूर्तीवरचे अलंकार उजळत होते. मंदिर तेलाने चिकट झाले होते. काही पंडांनी तेथे असलेल्या तीन मूर्तींच्या पायाशी उभे राहून दर्शन घेऊ इच्छिणार्‍या भक्तांवर नियंत्रण जमवले होते.

आमच्या पंडाने सांगितले की ’"गडबड करु नका, पुढे जाऊ नका. नाहीतर इतरांबरोबर बाहेर पडणार्‍या गर्दीत सापडाल. इथे उभे राहून निवांत दर्शन घ्या. या दर्शनाला पैसे पडत नाहीत. तुम्हाला इथून कोणीही हाकलणार नाही. मग मी तुमच्या पुजेची व्यवस्था करतो. ती तुम्ही करा." वा!!! अजून काय पाहिजे?

कोपर्‍यात मी उभी राहिले. पुढे उंच असणार्‍या पंडांमुळे व भक्तांमुळे मला देव दिसेनात. मग "इधर आईये मॉंजी", म्हणत त्या पंडाने मला देव दिसतील अशी डावीकडची कोपर्‍याची जागा शोधून दिली. मी तिथल्या भिंतीला पाठ लावून उभी राहिले. समोर वर पाहिले...मला माझा देव दिसला.

medium_balaram-subhadra-jagannatha.jpg

डावीकडे शुभ्रवर्ण, शुभ्रवत्रे ल्यायलेला श्रीबलराम, मध्ये पिवळा वर्ण, पिवळे वस्त्र ल्यायलेली सुभद्रा आणि उजवीकडे कृष्णवर्णाचा मोठ्या डोळ्यांचा, अपरं नाक असलेला मनोहर श्रीजगन्नाथ....काय सांगू??? देहभान हरपलं माझं. मन पिसासारखं झालं, हे रुप पाहण्याकरीता कायकाय मी सोसलं, माझ्य़ा पावलांवर सतत इतरांची पावले पडून हुळहुळेपण झालं होतं तेही कुठल्याकुठं गेलं.

आता फक्त तो नयनमनोहर श्यामसुंदर निष्पाप मधुर सर्वसाक्षी निर्लेप भगवंत आणि त्याला डोळ्यांत साठवणारी मी, एवढेच उरलो. माझ्या डोळ्यांतून अश्रू गळू लागले. हात जोडून मी पापणी न लवता त्याला पाहू लागले. त्याच्या डोळ्यांत मी पाहू लागले. माझ्या अस्तित्वाची तो दखल घेतोय का, ते बघू लागले. एक क्षण आला आणि मला त्याने पाहिलं, असं मला वाटलं..माझं हृदय त्यानं जिंकलं. माझी वृंदावनातल्या गोपींसारखी अवस्था झाली.

medium_shrijagannatha2.jpg

गोपी का या काळ्य़ा रुपावर मोहित झाल्या होत्या हे मला कळलं. त्या साध्या दिसणार्‍या रुपात काहीतरी जादू आहे. तो सर्व बघतो, सर्व ऐकतो, तरीही तो साक्षीपणानं रहातो. त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारची कोमलता आहे, माधुर्य आहे. तो भक्तांच्या हृदयाभोवतालची काळी काजळी जाळतो. त्याला निर्मल बनवतो. तो त्याच्या अखंड सहवासाचं व्यसन/वेड भक्तांना लावतो, हे खरं आहे. तो सोडून कशातही रस वाटत नाही, हे सत्य आहे. एकदा त्यानं स्वीकारलं की कशाचीही भीती वाटत नाही, हे खरं आहे. त्याच्या भक्ताला कधी न संपणारं अवीट गोडीचं समाधान देतो, हे सत्य आहे. त्याच्या दर्शनानं तहानभुक जाते, शरीरदुःख जातं हे खरं आहे. त्याचं मुख सोडून काही बघावसं वाटत नाही हे सत्य आहे. त्याचे पाय सोडावेसे वाटत नाहीत हे खरं आहे.

बरं झालं, आमच्या पंडानं जवळून दर्शनाची घाई केली नाही ते! असं मला वाटून गेलं. खूप जवळ गेल्यावर कळलं की त्याच्या पूजेमध्ये, त्याच्या इतर भक्तांच्या धक्काबुक्कीमध्ये त्याच्याकडे बघायचंच राहतं..मग काय उपयोग. रिकाम्या हातांनी माघारी येऊन नाराज होण्यापेक्षा, हे बरं. मी पंडाचे मनापासून आभार मानले. आम्ही आणलेल्या वस्तू देवाला अर्पण केल्या. तेथील स्थानिक पंडाच्या तबकात काही दक्षिणा ठेवली.

असल्या टिनपाट अर्पणानं त्या जगदीश्वराला काही फरक पडत नाही, हे माझ्या लक्षात आलं. त्याला असल्या भौतिक गोष्टीत रस नाही, त्याला तुमचं हृदय द्यावं लागतं. तो तर जगाचा मालक आहे. या वस्तू त्यानंच निर्माण केल्या आहेत. त्याला आपण वेगळं काय देणार? आपला भाव त्याच्या दृष्टीनं महत्वाचा आहे.

पंडानं आमच्याकडून देवांभोवतालच्या त्या अंधार्‍या बोळीतून आमची प्रदक्षिणा करवली. पंडा सांगत होता की," देवाचे दागिने इथे सुरक्षित राहतात कारण नागरुपात स्वतः भुवनेश्वरनिवासी श्रीमहादेव त्यांचे रक्षण करतो."

आता पंडानं आम्हाला उजवीकडच्या कोपर्‍यात उभं केलं आणि म्हणाला," निवांत दर्शन घ्या! आणि समाधान झालं तरच दक्षिणा मला द्या." अजून एक पर्वणी. मी काय खुषच झाले. ही खरी जगन्नाथाची कृपा. ही इच्छा त्याची. आधीचे दर्शन माझे खुळ म्हणून झाले, हे दर्शन त्याची इच्छा म्हणून झाले. "तोही मला सोडू इच्छित नाही," या अनुभवाचं वर्णन शब्दात करणं खरोखर कठीण आहे. त्यानं मला त्याची वेडी भक्त म्हणून स्वीकारलं यासारखं मोलाचं दुसरं सर्टिफिकेट कोणतंही नाही.

माझी भाववेडी अवस्था पंडाच्या एव्हांना लक्षात आली असावी. त्यानं आम्हा चौघांना त्याच्या सहाय्यकाच्या मदतीनं गर्भगृहाबाहेर काढलं. तो म्हणाला," इथे येणारे भक्त देवाचं दर्शन घेऊन आनंदानं नाच करतात. तुम्ही सुध्दा न लाजता, न संकोचता आनंद व्यक्त करा. मग मी त्यानं सांगितलेल्या भजनाच्या तालावर जणू काही झांज आपल्या हातात आहे असं गृहीत धरुन नाच केला. इतकं बरं वाटलं मला. ते पाहून बाकीच्यांनीही नाच केला. पंडाही join झाला.

medium_jagannath temple complex.jpg

आता पंडानं आमची देवळाच्या बाहेरुन प्रदक्षिणा करवली. इतर पंचायतनाच्या मूर्तींचे दर्शन घडवले. कळसाचे दर्शन घडवले. थोडावेळ आम्ही ओट्यावर बसलो. पंडाला आम्ही दक्षिणा दिली. देवाला अभिषेक करण्यासाठी, इतर दानांसाठी रक्कम दिली, नाव-गोत्र सांगितले..ते त्यानं चोपडीत लिहून घेतले. मी पंडाच्या पावलांवर डोकं टेकलं, त्याची पावलं चेपली ...आज त्याच्यामुळे मला माझा देव दिसला. आमचे समाधान होण्याकरीता त्याने खरंच खूप कष्ट घेतले होते. त्याच्या दक्षिणेचे मला ओझे वाटले नाही. "मी रुमवर प्रसाद पाठवतो" असं तो म्हणाला..रुमनंबर त्यानं लिहून घेतले.

आम्ही भोवताली असलेल्या भोग तयार करणार्‍या व वाटणार्‍या दुकानांपाशी आलो. मालपुवा, रबडी, खीर असे भोग तिथे होते. पंडा नको म्हणत असताना आमच्यापैकी एका यात्रीनं तिथला पदार्थ घेतला. पंडानं आम्हाला सुखरुप रिक्षापाशी आणून सोडलं.

medium_our hotel at puri.jpg

रिक्षानं आम्ही हॉटेलवर आलो. तेव्हा कळालं की इतर यात्री अजूनही आले नाहीत. संयोजक नाराज आहेत. नास्ता संपला आहे. मला त्याचं काही वाटलं नाही. मन समाधानानं गच्च भरलं होतं. मी कपडे बदलले, सामान रुममध्ये ठेवलं, थोडी टेकले. सामानाची आवराआवर केली. रुमच्या बाहेर आले. हॉटेल खूपच स्वच्छ होते, वेली-फुलांनी नटवले होते. आज इथेच मुक्काम होता.

मी खाली आले. खाण्यासाठी काही मिळेल का याची चौकशी करु लागले. गुरुनाथच्या एका जुन्या मला ओळखणार्‍या स्टाफने साबुदाणे वडे व दहीसाखर आणून दिले. शारीरिक पोटही भरले. मी निवांत होते. मला आता कसलीच घाई नव्हती.

जेवायची वेळ झाली तरी लोक दर्शनाहून येईनात. खूप उशीर होऊ लागला मग स्टाफने आम्हाला जेऊन घेण्याची विनंती केली. मी हलका आहार केला. खूप उशीरा इतर मंडळी आली. त्यांच्या बोलण्यावरुन कळलं की खूप धक्काबुक्की झाली. काहींना दुखापती झाल्या. काहींची दर्शने तरीही झाली नाहीत. बरेचजण संध्याकाळी पुन्हा दर्शन घ्यायला गेले.

सुखाने दर्शन दिल्याबद्दल मला देवाचे आभार मानावेसे वाटले.

संध्याकाळी गारवा होता, पोट त्रास देत होतच पण आटोक्यात परिस्थिती होती.
यथावकाश पंडाने सुरेख वेताच्या टोपलीतून प्रसाद पाठवला. मला खायची खूप इच्छा होती पण जुलाबाची भीती वाटत होती. मी तोंडाला दोन भाताची शितं लावली आणि समाधान मानलं.

medium_sea at puri1.jpg

medium_sea at puri 3.jpg

रात्री मी झोप घेतली. दुसर्‍या दिवशी उठून कोनार्क व भुवनेश्वर करायचं होतं.
ते झाल्यावर मी एक छोटी पर्स व पिशवी घेतली, ज्यावर मंदिरातल्या तीनही देवतांच्या प्रतिमा होत्या. त्या पाहून मी पुढची काही वर्षे दर्शनाचं समाधान मानू शकेन असं वाटलं.

॥श्रीराम समर्थ॥