अनुसंधान

अनुसंधान

(संदर्भ -श्रीगोंदवलेकरमहाराज चरित्र - लेखक - श्री. के.वि.बेलसरे)
साधकाने अनुसंधान कसे साधावे
- आपले मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून ठेवावे

- प्रपंचात सर्वांसाठी सर्व करावे पण मनात मात्र ‘मी रामाचा आहे’ ही अखंड जाणीव ठेवावी
- प्रत्येक ठिकाणी ‘भगवंताच्या इच्छेने काय व्हायचे ते होऊ देत’ असे अनुसंधान ठेवावे
- एका भगवंताचे अनुसंधान ठेवावे म्हणजे त्याचे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतात
- भगवंताप्रमाणे आपण देखील प्रपंचात असून बाहेर असावे
- आपल्या देहाकडे साक्षित्वाने पाहाण्यास शिकावे
- व्यापात राहून अनुसंधानात असावे
- भगवंताला अशी प्रार्थना करावी की देवा प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस
- अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा म्हणजे आपण आपल्या ऊर्मींना आवरू शकू
- सद्‌धर्माने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानात राहावे
- अनुसंधानात असताना जे भगवंताच्या आड येते त्याची पर्वा करू नये
- आपल्या व्यवहारात आपल्याला सवड झाली की आपण भगवंताची आठवण करावी
- भगवंताचा चटका तशी त्याच्या अस्तित्त्वाची जाणीव तशी त्याची निष्ठा आपल्याजवळ पाहिजे
- भगवंताचे अनुसंधान हेच आपले ध्येय ठेवावे
- त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी कराव्यात
- जगाचा प्रवाह भगवंताच्या उलट आहे, आपण त्याला बळी पडू नये, आपण प्रवाहाच्या उलट पोहत जावे, यालाच अनुसंधान टिकवणे असे म्हणतात
- मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा. आपले मन नेहमी भगवंताच्या ठिकाणी गुंतवून ठेवावे, उठणे, बसणे, जप करणे, वाचन करणे, गप्पागोष्टी करणे, चेष्टाविनोद करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा - हेच अनुसंधान होय
- आपल्या आजाराचासुद्धा आपण फायदा करून घ्यावा, आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचे अनुसंधान शिकावे
- अनुसंधान जागृत ठेवावे, ते चुकू न द्यावे
- भगवंताची अनुसंधान प्रपंचाला व्यापून ठेवावे
- प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावे
- मनाच्या सर्व वृत्तींमध्ये भगवंताचे स्मरण असावे
- भगवंताचे अनुसंधान सारखे राहायला हवे असेल तर त्याचे नामस्मरण सतत करावे
- भगवंताच्या अनुसंधानामध्ये कोणताही विषय (हवे- नको वासना) येणारच, पण तो हवेपणाने भोगू नये, म्हणजे तो बाधणार नाही
- जगणे हे अनुसंधानासाठी असावे
- आपला देह भगवंताच्या हाती द्यावा म्हणजे त्याच्या अनुसंधानात राहावे मग काही धोका नाही
- भगवंत हा आधार म्हणून आपल्याजवळ आहे असे वाटले पाहिजे
- आपण योग्य भावना ठेवली तर भगवंताचा अंमल आपल्यावर बसतो
- आपल्याला ज्याची आवड असते त्याचे सारखे स्मरण आपोआपच राहाते
- भगवंताचे स्मरण आपल्याला मुद्दाम करावे लागते ते समजून करावे
- अनुसंधानाने आपली वृत्ती भगवंताकार करावी
- प्रामाणिकपणे व निर्लेपपणे प्रपंच करताना भगवंताचे स्मरण करावे म्हणजे अनुसंधान चुकणार नाही
- काय काय सोडावे या विचारात गुंतून वाहावण्यापेक्षा एक भगवंताचे नाम धरण्याचा म्हणजे अनुसंधानाचा अभ्यास करावा
- पैशाला अनुसंधानाच्या आड येऊ देऊ नये
- भगवंताच्या इच्छेने जे घडणार आहे ते घडू द्यावे अशी निष्ठा उत्पन्न होण्यासाठी त्याचे अनुसंधान पाहिजे
- भगवंताच्या कृपेने लाभलेला आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावावा
- प्रयत्न करूनही अनुसंधान साधले नाही तर निराश न होता पुन्हा प्रयत्न करावेत
- आपल्या आतली लढाई चालूच असते, थोडी अस्वस्थता असणारच आहे, त्याचा त्रास सर्वांप्रमाणे आपल्यालाही होतोच, आपण मात्र भगवंताच्या अनुसंधानात असावे
- अनुसंधानाने पोथीला सुरुवात करावी, अनुसंधानानेच पोथीची समाप्ती करावी
- ज्याला काहीतरी करायची सवय आहे त्याने काही काळ मुळीच काहीही करू नये नंतर भगवंताचे अनुसंधान ठेवायला शिकावे
- अनुसंधान कोणत्याही माध्यमातून, कृतीतून करता येते
- कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचे अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचे सार आहे
- सत्कर्म जेवढे मोठे तेवढी विघ्ने फार, भगवंताचे अनुसंधान हे सर्वात मोठे सत्कर्म आहे, म्हणून निश्चयाने त्याचे नाम घेत राहावे
- "भगवंताचे अनुसंधान म्हणजे त्याचे स्मरण" संत असं सांगतात की बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष्य झाले तरी चालेल पण परमात्म्याचे विस्मरण होऊ देऊ नये

॥श्रीराम समर्थ॥