प्रयागराज

नामाचे महात्म्य -
प्र + याग (यज्‌ = यज्ञ) = मोठा यज्ञ.
ब्रह्म्याच्या ५ यज्ञवेदीं पैकी प्रयाग ही मध्यवेदी आहे.
-----------------
तीर्थाचे वैशिष्ठ्य -

गंगा (शुभ्र व वेगवान), यमुना (कृष्ण रंगाची व संथ) व सरस्वती (गुप्त) यांचा पवित्र नद्यांचा संगम येथे झाला आहे.

-----------------
पौराणिक संदर्भ -

- प्रजापतीने येथे महायज्ञ केला होता.
- पद्मपुराणात प्रयागराज हा सर्वोत्तम असे म्हणले आहे..
- त्रेतायुगात संगमाच्या काठी असलेल्या भरद्वाज ऋषींच्या आश्रमात जाऊन प्रभू रामचंद्राने दर्शन घेतले होते. वनवासाला निघताना सीतेने येथे असलेल्या वडाची पूजा करून शीलरक्षणासाठी सामर्थ्य मागून घेतले होते.
- द्वापरयुगात वनवासात असताना पांडव काही काळ या वडाखाली राहिले होते. युध्दामध्ये भावांची हत्या झाल्यामुळे दुःखी असलेल्या युधिष्ठिराला मार्कंडेय मुनींनी येथे स्नान करायला सांगितले होते.
- गौतम बुध्दाने इथे वास्तव्य केले होते.
- गंगेच्या काठी असलेला किल्ला अकबराने बांधलेला आहे. प्रयाग हे नाव बदलून अलाहाबाद असे ठेवले.
----------------------------------------
येथे दर वर्षींनी इथे कुंभमेळा भरतो व ६ वर्षांनी अर्धकुंभमेळा भरतो.
----------------------------------
विशेष करण्याचे विधी

- त्रिवेणीत सचैल (कपड्यांसह) स्नान करणे
- तीनही नद्यांची ओटी भरणे
- पडधण - स्नान केलेले कपडॆ दान करणे (तीरावर)
- पितरांना पिंडदान (क्षेत्रोपाध्यांच्या घरी करणे)
- वेणीदान - पुन्हा एकदा लग्न लावून घेऊन बोटीतून प्रवाहाच्या मध्यावर जाऊन सुवासिनी स्त्रिया आपल्या केसाची शेवटची दोन बोटे कापून ती भोवर्‍यात अर्पण करतात. हे केस अगदी हलके असूनही ते पाण्यात बुडतात. आपल्याला सौभाग्यमरण यावं यासाठी सुवासिनी हे करतात.
- काठी असलेल्या निद्रिस्त हनुमानाचे दर्शन
- अक्षयवटाचे दर्शन
- सौभाग्यवायन
- ब्राह्मणभोजन
- गोप्रदान
---------------------------------------------------
माझे अनुभव -

medium_allahabad map.jpg

मी जेजे ग्रंथ वाचले त्यात प्रयागराजाचा उल्लेख नाही असे झाले नाही.
सर्व संतमहात्म्यांनी प्रयागराजात स्नान करुन प्रयागाला पावन केले आहे.
हो! तीर्थ सर्वांना पावन करते, मात्र तीर्थाला संत आपल्या पदस्पर्शाने पावन करतात, इतके संतांचे माहात्म्य आहे.

सन २००७ च्या एप्रिलमध्ये श्रीगुरुनाथ ट्रॅव्हल्सतर्फे मी इतर यात्रेकरुंबरोबर त्रिस्थळी यात्रा केली.

मी माझ्या बरोबर समन्वयला नेले होते. आम्ही अलाहाबाद स्टेशनला रात्री पोचलो. स्टेशन येण्यापूर्वी ट्रेन एका मोठ्या पुलावरून जाते. हीच ती ग्रॅंड ट्रंक रोडला समांतर जाणारी रेल्वेलाईन. (रोड ब्रिटिशांनी बांधला कलकत्यापासून ते पेशावरपर्यंत). तेव्हा त्रिवेणीचं पात्र प्रचंड मोठं वाटलं. त्यात उन्हाळा असल्यानं पाणी कमी आणि रेती जास्त. त्यातच स्थानिक लोकांनी शेती केलेली दिसली. विहिरी खोदलेल्या दिसल्या.

लहानपणापासून प्रयागबद्दल इतके वाचलेले. त्यात महाराजांच्या चरित्रात वारंवार उल्लेख. मला स्टेशन जवळ आल्याने खुपच समाधान झाले आणि उत्कंठा लागून राहिली..त्रिवेणीच्या दर्शनाची.

स्टेशनवर उतरुन सर्व यात्रेकरुंना एकत्र जमवून बसने आम्ही हॉटेलमध्ये येऊन उतरलो. थोड्यावेळानं तेथील गुरुजी आले. त्यांनी येथे काय काय धार्मिक विधी केले जातात, त्यांचे काय महत्व असते इ. सांगितले. रात्री झोपण्यापूर्वी उद्याची तयारी केली.

आम्हाला संयोजकांनी सकाळी लवकर उठून तयार व्हायला सांगितलं होतं. नास्ता उरकून घेतला गेला. यायला बराच उशीर लागणार होता. बरोबर एक पिशवी त्यात सौभाग्यवायनाचे सामान, त्रिवेणीच्या पूजेचे सामान, बदलायचे कपडे ठेवले होते. अंगात कोरे कपडे घातले होते, जे स्नानानंतर तिथे सोडायचे होते. बरोबर प्यायला पाणी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

बसमधून आम्ही प्रयाग गावात गेलो. हे एक टिपीकल उत्तरप्रदेशातलं खेडं आहे. छोटे कच्चे रस्ते, गटारे, कोपर्‍यावर कचराकुंड्या, छोटी घरं.
अशाच एका ब्राह्मणवस्तीत आम्ही आलो. बस दूर उभी राहिली कारण बारीक गल्ल्या होत्या.
येथे सर्व क्षेत्रोपाध्यायांची घरे असावीत असं मला वाटलं.
आम्हाला एका खोलीत सतरंजीवर बसण्यास सांगितलं गेलं.

ज्यांना श्राध्द करायचे होते ते यात्रेकरु दुसरीकडे गेले व तेथील उपाध्यायांकरवी त्यांचे कार्य सुरु झाले.
इतरांपैकी ज्या जोड्या वेणीदान करणार होत्या, त्यांना बोलावलं गेलं व त्यांचा लग्नसमारंभ सुरु झाला.
बाकी जे एकटे आले होते, त्यांच्याकडून संकल्प सोडवून घेतले गेले.

मी त्रिवेणीपूजा, सौभाग्यवायनदान, गोप्रदान, ब्राह्मणभोजन इ. संकल्प करु शकले.
पितरांचे श्राध्द मला करण्याची अनुमती नसल्याने नेहेमीप्रमाणे मला वाईट वाटले. तसेच वेणीदान सौभाग्यवती असूनही यजमान बरोबर न आल्याने करता आले नाही.

त्रिवेणी येथून बरीच लांब होती. ज्यांचं कार्य चालू होतं त्यांना सर्वांना बरोबर घेऊन बसने त्रिवेणीवर जायचं होतं.
वाट पाहून आम्ही बाकीचे कंटाळलो.
तेवढ्यात कोणी म्हणलं की लग्न बघायला या. आम्ही जोड्यांची लग्ने लावलेली पाहिली. वधूंना फुलांनी माळले होते. त्या खुप छान दिसत होत्या.
सर्व कार्ये उरकल्यावर आम्ही बसने त्रिवेणीवर गेलो.

मला वाटले छान घाट असतील. कुठलं काय? इथे पुळणच दिसत होती. म्हणायला पात्र मोठं होतं पण प्रत्यक्ष पाण्याचा प्रवाह फार मोठा नव्हता. इथे घाट कसे नाहीत हरिद्वार व काशीसारखे? असं विचारल्यावर कळालं की येथे नदी सतत दरवर्षी तिचं पात्र बदलते कारण ती येताना खुप गाळ घेऊन येते तो साठून त्याची बेटे होतात. इथे तर पुळणीचे डोंगर होते. नदीचा प्रवाह दिसायला वेळ लागला.

medium_kumbhamela.jpg

येथे कुंभमेळ्याला प्रचंड गर्दी होते असं मी वाचून होते.

medium_allahabad fort.jpg

जेथे अलाहाबादचा किल्ला आहे तेथे आम्हाला नेण्यात आलं. उन मी म्हणत होतं. टोप्या असूनही तोंडे भाजत होती. पादत्राणे बसमध्येच काढली होती त्यामुळे पावले पोळत होती.

medium_sangum.jpg

संयोजकांनी नावा ठरवल्या. त्या नावेत बसून आम्ही त्रिवेणीपर्यंत गेलो.
ज्या जोड्या वेणीदान करणार होत्या त्यांना वेगळ्या नावेत बसवून नेलं.
मला महाराजांच्या चरित्रातला प्रसंग आठवत होता. मी महाराजांना आळवीत होते, रामनाम तोंडात चालू होतं. अखेर एका पुळणीपाशी आलो. तेथे सर्वांना उतरविलं.
आता डावीकडची काळी शांत संथ यमुना आणि वेगाने वाहणारी शुभ्र गंगा स्पष्ट दिसू लागल्या.
त्रिवेणी ही जागा अगदी छोटी आहे जिथे तीनही नद्यांचा संगम होतो. सरस्वतीचे फक्त स्मरणच कलियुगात करायचे असते...
त्या जागेवर आपल्याला तेथील स्थानिक लोक नेतात. एका उंच बांबूला दोन्ही हातांनी घट्ट धरायचं, दोन्ही पावलं दुसर्‍या बांबूवर ठेवायची. आणि डोळे मिटायचे, श्वास कोडायचा रामनाम घ्यायचे आणि जय गंगामैयाकी! म्हणत ते लोक आपल्याला पूर्ण बुडवून बाहेर काढतात. ते नंतर आपल्याला पलिकडच्या पुळणीवर ठेवतात. हे असं का? तर तेथे पात्र खोल आहे. उभं राहता येत नाही. शिवाय गंगेला ओघ खूप आहे. त्यामुळे स्थानिक लोकांची मदत घ्यावी लागते.

पुरुष भराभर तिकडे गेले. समन्वयचा ताबा आमच्याबरोबर आलेल्या सद्‌गृहस्थांनी घेतला व त्याचे स्नान व्यवस्थित घडले. मग आम्ही बायका त्रिवेणीत आपादमस्तक स्नान करवून घेऊन बाहेर आलो.
पलिकडच्या पुळणीवर गेल्यावर संयोजक म्हणाले..मनसोक्त स्नान करुन घ्या. मग मी इतर दोघींसह पुळणीवर बसकण मारली व बरोबरच्या गडूने सचैल स्नान केलं. जन्मोजन्मीची पापे धुतली जावोत अशी मी प्रयागराजाची प्रर्थना केली. महाराजांच्या आठवणीने डोळ्यांत पाणी येतच होते. पाणी छान कोमट होते. बरं झालं आत्ता टळटळीत दुपारी आलो ते. सकाळी पाणी थंड असतं. मी काकडले असते. समन्वयचे जन्माचे पुण्याचे काम माझ्या हातून झाले म्हणून मी देवाचे आभार मानले.
आता आम्हाला गोळा करण्य़ात आलं नावेत बसून आम्ही तीरावर आलो. एका तट्ट्याच्या राहुटीच्या आडोशाला कपडे बदलले. आधीचे कपडे न्यायला स्थानिक रहिवासी आलेच होते.

मग आम्ही पाय पोळत पळत बाहेर आलो.

medium_prayag-Hanuman.jpg

जवळच असलेल्या मोठ्या मंदिरात श्रीहनुमानाचे दर्शन घेतले. मला महाराज भेटल्याचा आनंद झाला.
बाहेर जमलेल्या भिकार्‍यांना समन्वयच्या हस्ते यथाशक्ती दान दिले. महाराज हे सर्व पाहत आहेत असं मला वाटलं.
मग आम्ही पुन्हा क्षेत्रोपाध्यायांच्या घरी आलो.
काहींची काही धर्मकर्म राहिली होती त्यांना सोडून उरलेले आम्ही हॉटेलवर आलो.
मनात खूप समाधान होतं. यात्रेची सुरुवात तर चांगली झाली होती.

आम्ही भोजन केले. विश्रांति घेतली.
संध्याकाळी आम्ही ६ जण मिळून रिक्षा ठरवून अलाहाबाद शहर शक्य तितकं बघितलं. आम्ही एक वाटाड्या बरोबर घेतला. त्यानं सुंदर असं ते शहर आम्हाला दाखवलं. तेथील बागा, ऐतिहासिक इमारती, अमिताभ बच्चनचा बंगला इ. हा भाग खुपच सुंदर आहे. सकाळी पाहिलं ते प्राचीन गाव होतं. दोन्ही मधला फरक जाणवण्याजोगा वाटला..असेच चित्र कोणत्याही ऐतिहासिक स्थळाचं मला दिसतं.

आम्ही परत आलो. भोजन झाले, गुरुजींची दक्षिणा दिली. रुममध्ये येऊन पुढच्या दिवशीच्या प्लॅनप्रमाणे जागा सोडण्यासाठी बॅगा भरल्या.

उद्या लवकर उठून नास्ता करुन अयोध्येला जायला निघायचे होते.

medium_anandbhavan.jpg

सकाळी निघालो. बसने प्रवास करताना वाटेत मोतिलाल नेहेरुंनी देशाला दान केलेली आनंद भुवन हवेली पाहिली. फारच सुंदर वाटली..स्वच्छ, नेटकी, गुलाबाच्या फुलांचे ताटवे असलेली.

ही दुमजली इमारत एकेकाळी स्वातंत्रलढ्याची साक्षीदार होती. तेथील फोटोंचे म्युझियमही छान आहे.

नंतर वाटेत कोण्या पुराणकालीन ऋषींची (मी दुर्दैवाने नाव विसरले)तपःस्थली पाहिली.

॥श्रीराम समर्थ॥