व्दारका

द्वारका -
--------------------
नोव्हेंबर २००८ मध्ये माझे मधले दीर श्री. उदयन, माझी नणंद सौ. अदिती, व अभ्यंकर कुटुंबीय असे आम्ही ६ जण गुजराथमधील मातृगया (सिध्दपूर), श्रीसोमनाथ व द्वारका या यात्रेला गेलो होतो.
निमित्त होते माझ्या स्वर्गीय सासूबाईंची - कै. मैत्रेयी विनोदांची जन्मशताब्दी.
खरेतर माझ्याबरोबरचे प्रवासी पर्यटक होते, यात्री नव्हते. द्वारकेला जाण्याची त्यांची फारशी इच्छा नव्हती. मात्र द्वारकाधीशाच्या दर्शनाच्या माझ्या लालसेने त्यांचा निरुपाय झाला.
पहाटे श्रीसोमनाथाची महापूजा करून, नाश्ता करून आम्ही द्वारकेच्या दिशेने भाड्याची गाडी करून निघालो. मी अतिशय प्रसन्नचित्त होते. श्रीसोमनाथाने माझी सेवा स्वीकारली याचा मला अतिशय आनंद झाला होता. (याविषयी अधिक ज्योतिर्लिगामध्ये वाचावं)
---------------------------------
वाटेत डावीकडे साथ करीत असलेला पश्चिमेचा निळाशार, अतिशय स्वच्छ अरबी समुद्र उन्हात चमचम करीत होता. हवा अतिशय स्वच्छ होती. वाट बर्‍यापैकी निर्जन होती. स्वच्छ पुळण खेळायला ये म्हणत होती. अधूनमधून लागणारी छोटी गावे सौराष्ट्राचे दर्शन घडवीत होती. तेथील लोकांचे पारंपारिक पोशाख चित्तवेधक होते. माझ्या दीरांनी एका भल्यामोठ्या मिशावाल्या धिप्पाड माणसाचा फोटो काढून आपल्या संग्रही ठेवला. गिरनार पहाडापाशी जत्रा असल्याने गर्दी होती. तेथे गाडीला जरा वाट मिळायला वेळ लागला.
आता मात्र उन मी म्हणत होते. जीवाची तगमग होत होती. वाटेत आम्ही पोरबंदरला थांबलो.

पोरबंदरचा राजवाडा आम्ही दुरुनच पाहिला.

गाडीतून उतरून इतरांनी म. गांधींचे स्मारक पाहिले. मी गाडीतच बसून नामस्मरणाचा धोशा चालू ठेवला. मला आता पोटात कसंतरी होऊ लागलं होतं. विचित्र बेचैनी होत होती. आधी वाटलं की आम्लपित्त झालं असेल. त्यावरची औषधं घेऊनही त्रास कमी होईना. द्वारकाधीशाचे दर्शन होईल ना? अशी शंका माझ्या मनात डोकावू लागली. इतरजण गाडीत येऊन बसल्यावरही मी गप्पगप्पच होते. मला रडवेले वाटत होते. देवाचा मी धावा करीत होते.

कालांतरानं कलत्या संध्याकाळी आम्ही द्वारकेला येऊन पोचलो. लांबूनच देवळाचे दर्शन झाले.

तेथील श्रीआद्यशंकराचार्यांच्या शारदापीठातील निवासस्थानात येऊन पोचलो.

आम्ही ४ स्त्रियांनी आमचे सामान एका कॉमनरुममध्ये ठेवले. आवरून आम्ही त्या मठातील व्यवस्थापकांना भेटायला गेलो. मी आवळासुपारी चघळून भागवत होते.

तेथील गुरुजींनी आमचे स्वागत केले. आद्यशंकराचार्यांच्या पूजेतील नवरत्नशिवलिंगे आम्हाला त्यांनी दाखवली उद्याच्या म्हणजे वैकुठचतुर्दशीच्या पवित्र दिवशी या शिवलिंगांवर रुद्राभिषेक करण्याचे ठरवले. अजून काय पाहिजे. हरि आणि हर अनायसा माझ्याकडून सेवा करुन घेणार होते.

मग द्वारकाधीशाच्या दर्शनासाठी ते आम्हाला घेऊन निघाले. माझं कितीतरी वर्षांचं स्वप्न साकार होणार होतं. मठाबाहेरून मंदिरात जायला एक रस्ता आहे. त्या रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. मठातून जायला वेगळा खास रस्ता आहे. मुख्य गुरुजी आमच्याबरोबर असल्याने आम्ही कमी गर्दीतून सुखरूप मंदिराबाहेरील प्रांगणात आलो.

मंदिराचा कळस मी पाहायला गेले...बाप रे! खूपच उंच तो होता. एक आडवा लांब झेंडा त्यावर फडफडत होता. अनेकजण असे झेंडे घेऊन येताना आम्ही पाहिले. गुरुजींनी आम्हाला सांगितले की इथे अशी प्रथा आहे की द्वारकेची वारी लोक झेंडा आणत करतात. मग ते कळसावर एकाला चढवतात व आधीचा झेंडा उतरवून त्यांचा झेंडा लावतात. मग खाली जमलेले सर्व भाविक द्वारकाधीशाचा जयजयकार करतात.

प्रदक्षिणेच्या वाटेवर ढकलाढकला होतीच. आम्ही गुरुजींच्या सहाय्याने वाटेतील अडथळ्यांवर मात करीत मुख्य मंदिरात आलो. तेथे तर ही गर्दी आणि झुंबड होती.

भगवंताच्या समोर एक पडदा होता. गुरुजींनी सांगितलं की इथे पहाटेपासून रात्रीपर्यंत प्रत्येक प्रहराची वेगळी पूजा, त्याप्रमाणे भगवंताचा वेगळा शृंगार, भोग (नैवेद्य) असे राजोपचार चालू असतात.

त्यामुळे भोग दाखवताना देवाच्या मुखापुढचा पडदा ओढला जातो. तेव्हा भाविकांना दर्शनासाठी थांबावं लागतं. मग खूप गर्दी होते. येथे बारीनं दर्शन घेण्याची शिस्त नाही.
आम्हाला त्यांनी भगवंताच्या पुढच्या देवकीमातेच्या मंदिरापाशी नेलं. तिचं दर्शन मी करून तिला विनवीत होते की," बघ बाई तुझ्या पोराचं दर्शन घ्यायला कडमडत सर्वांच्या इच्छेविरुध्द आलीय मला त्याचं दर्शन घडव".
आणि अचानक गुरुजींनी मला उलटं वळायला सांगितलं आणि काय आश्चर्य! पुढे ध्यानीमनी नसताना साक्षात्‌ भगवंत हसत उभा. मला सुधरेनाच. मी डोळे विस्फारून पहातच राहिले. आसपासचं जग मला विसरायला झालं. त्याच्याकडे किती पाहू आणि किती नाही, काही कळलं नाही. या मनमोहनासाठी गोपी का वेड्या होत होत्या, राधेला, मीरेला का एवढं त्याचं वेड लागलं होतं ते आत्ता लक्षात्‌ आलं. मी तर फक्त भगवंताची मुर्ती बघत होते. त्या भक्तांनी प्रत्यक्ष मानवी देहात भगवंताला पाहिलं होतं.

माझ्या मनात आत्ता टाईप करताना येतंय की भगवंताच्या एवढ्या गोंडस रुपाचा दुस्वास कंसानं, पूतनेनं, शिशुपालानं कसा काय केला असेल? गुरुजींनी मला भानावर आणलं. बाकीचे रांगेत उभे होते. मी बाजूला सरल्यावर की त्यांना दर्शन मिळणार होते. मी बाजूला झाले व मिळेल त्या फटीतून त्या राजसाचं रूप दिसतय का पाहू लागले.

त्या रात्री मला उलट्याजुलाबाचा प्रचंड त्रास झाला. मी गुपचुप सहन केलं. जवळ असलेल्या तात्पुरत्या औषधाचा काही उपयोग झाला नाही. पाय लटपटत होते. डोळ्य़ांपुढे अंधारी येत होती. जरा पहाट झाल्यावर मी इतर महिलांना माझ्या त्रासाची कल्पना दिली. सोमनाथच्या हॉटेलमधील पाणी बाधलं होतं. पाणी-मीठ-साखर घेणं चालू केलं. पोटात पाणी ठरत नव्हतं. मी तसेच स्नान केले. साडी नेसले. सर्व पूजेचे सामान घेतले. नणदेबरोबर शंकराचार्यांच्या मठात गेले.

तेथील नवरत्नांवर रुद्राभिषेक प्रमुख आचार्यांकरवी झाला. श्रीमहादेवाने मला बळ दिले. प्रसन्न होऊन मी अष्टकन्यांचे (श्रीकृष्णाच्या महाराण्यांचे) दर्शन घ्यायची इच्छा व्यक्त केली. सर्वांना घेऊन आम्ही वरच्या मजल्यावर गेलो. तिथे सर्वांची ओटी भरली. मग पुन्हा खाली येऊन द्वारकाधीशाचे दर्शन घेतले. स्वारीचे स्नान चालू होते. त्यामुळे वस्त्र-अलंकारहित दर्शन झाले. तेवढ्यात एका पडद्याआड तेथील एक सेवेकरी द्वारकाधीशाच्या सुवर्णपादुका तबकात घेऊन दर्शनासाठी घेऊन आले. पुण्याहून खास आणलेल्या वस्तू अर्पण केल्या. मला भरून आलं. देव किती कृपाळू आहे! त्यानं दर्शन तर दिलंच. शिवाय त्याची चरणधूली लागलेल्या पादुकाही स्पर्शदर्शनासाठी पुढे केल्या. मला त्याच्या कृपेची पावती मिळाली. पोटात आत समाधान वाटलं. त्याचं वर्णन करणं अवघड आहे.

मग मात्र मी गळाठले. इतरजण व्दारकाबेटावर जायला निघाले. माझे जुलाब चालूच असल्याने मी माझी असमर्थता व्यक्त केली व खोलीत येऊन पडून राहिले.
मंडळी संध्याकाळी उशीरा आली. त्यांनी सांगितले की बोटीला खूप गर्दी होती. मला तिथे उन्हाचा खूप त्रास झाला असता. संध्याकाळी मी पडूनच होते. मला हवे असलेले औषध द्वारकेत नव्हते शहरात गेल्यावरच ते मिळणार होते. मी मुकाट्याने सहन करीत होते. संध्याकाळची आरती मी पडूनच ऐकली. डोळ्यांतून पाणी येत होतं. दोनदा घेतलेलं भगवंताचं दर्शन मी आठवत होते.

या मठात बरेच शांत वातावरण होते. येथे बरेच निवासी बटू मला दिसले. येथील रसोड्यात सोवळ्यात स्वयंपाक होतो व अतिथींना सोवळ्यात प्रेमाने वाढले जाते. या बटूंनी माझी पुष्कळ सेवा केली. रात्री मी बिनतिखट कढीखिचडी खाल्ली.

दुसर्‍या दिवशी मी स्नान करून एकटीच वर जाऊन द्वारकाधीशाचं दर्शन घेऊन आले. पाय लटपटत होते. पण मला खूप बरं वाटलं. याचं रूप पुन्हा पहाय़ला मिळेल, नाही मिळेल. आवरून आम्ही निघालो. खरं म्हणजे मी मंदिराजवळच्या बाजारात नेहेमी जाते. सीडी, काही पूजेच्या-दानाच्या वस्तू घेते. पोस्टकार्ड फोटो घेते. इथली धूळ मला घ्यायची होती, पण मी काही करू शकले नाही. देवदर्शन आणि प्रसाद मिळाला हेच मी खूप समजले. बाकी भोग!

॥श्रीराम समर्थ॥