ज्ञानविज्ञानयोग (अध्याय ७)

मी एक साधनी -
सातव्या ज्ञानविज्ञानयोगामध्ये भगवंत "मी कसा आहे, माझी माया कशी आहे? माझ्या प्रकृतीपासून भूतसमुदाय कसा निर्माण झालेला आहे? माझ्यापासून तीन भाव कसे निर्माण झाले आहेत? याबद्दल सांगतात.
ते म्हणतात की "मायेच्या द्वारा ज्यांचे ज्ञान हरण केले गेले आहे असे आसुरी स्वभावाचे, मनुष्यातील नीच असणारे, दुष्ट कर्मे करणारे मूर्ख लोक मला भजत नाहीत."
ते पुढे, त्यांना भजणार्‍या ४ प्रकारच्या भक्तांचे वर्णन करतात.
त्याविषयी अधिक आपल्याकडून समजून घ्यावं असं मला वाटतंय.
माझ्या मनातील सद्गुरु:
भक्तजन चार प्रकारचे असतात.
एक - उत्तम कर्म करणारे,
दुसरे - अर्थार्थी म्हणजे सांसारिक पदार्थांची कामना करणारे,
तिसरे - आर्त म्हणजे संकट निवारणासाठी भक्ती करणारे
आणि चवथे - जिज्ञासू व ज्ञानी (भगवंताचे यथार्थ रूप जाणण्याच्या इच्छेने भजणारे)
----------------
मी एक साधनी -
पहिल्या तीन प्रकारच्या भक्तांना भगवंत कोणते फळ देतो?
माझ्या मनातील महाराज -
भोगांच्या इच्छेमुळे त्यांच्या ज्ञान हरण गेले जाते. हे सर्व आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन निर्निराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात. जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवतास्वरूपाचे श्रध्देने पूजन करू इच्छितो, त्या त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रध्दा भगवंत दृढ करतो. तो त्या श्रध्देने योक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून भगवंताने ठरवलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवतो. ह्या अल्पमेधा माणसांना मिळणारे फळ अंततः नाशवंत असते. देवतांचे पूजन करणारे देवतांना प्राप्त होतात.
हे मूढ लोक भगवंताच्या सर्वश्रेष्ठ, अविनाशी अशा परम भावाला न जाणता मन-इंद्रियांच्या पलीकडे असणार्‍या सच्चिदानन्दमय परमात्मस्वरूप भगवंताला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रकट झालेला मानतात.
आपल्या योगमायेने लपलेला भगवंत सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही. म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या, अविनाशी परमेश्वराला जाणत नाहीत. भगवंत सर्वांना जाणतो पण अज्ञानी त्याला जाणत नाहीत. या सृष्टीत इच्छा व द्वेष यापासून उत्पन्न होणार्‍या द्वंद्वमोहाने सर्व प्राणी गोंधळतात व अज्ञ राहतात.
मात्र निष्काम भावाने श्रेष्ठ कर्मांचे आचरण करणार्‍या ज्या पुरुषांचे पाप नष्ट होऊन गेले आहे, व जे द्वंद्वमोहातून मुक्त झाले आहेत असे दृढव्रती भगवंतालाच भजतात व ते त्याचे भक्त त्यालाच जाऊन मिळतात.
------------------------------------------
मी एक साधनी:
महाराज भगवंताने सांगितलेले ज्ञानी भक्त कसे असतात?
माझ्या मनातील सद्गुरु:
भगवंत अर्जुनाला सांगताहेत की, हे ज्ञानी भक्त मला प्रिय असतात. ते साक्षात माझे स्वरूपच असतात.
ते नित्ययुक्त असतात.
ते एकभक्ति असतात.
त्यांना मी प्रिय वाटतो.
ते उदार असतात.
ते युक्तात्मा असतात.
ते माझ्या ठिकाणीच (अत्त्युत्तम गतीमध्ये) स्थिर असतात.
हे ज्ञानवान अनेक जन्मांनंतर शेवटच्या जन्मांत मी, म्हणजे वासुदेवच, सर्व काही आहे अशा भावाने मला भजतात.
ते दृढव्रती असतात (ते भगवंतालाच भजतात).
ते त्याचाच आश्रय घेतात.
जरा, मरण यातून मोक्ष मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतात.
ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म, तसेच अखिल कर्म ते जाणतात.
--------------------------------------
मी एक साधनी:
या प्रकारच्या योग्यांना भगवंत कोणते फळ देतो?
माझ्या मनातील सद्गुरु:
असे ज्ञानी महात्मे अतिशय दुर्लभ असतात.
निष्काम भावाने पुण्यकर्म केल्याने त्यांचे पाप नष्ट होऊन गेलेले असते, द्वंद्व आणि मोहातून ते मुक्त झालेले असतात.
अंत:काळी ते परमात्म्याला (अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ यांसहित) जाणतात.
ते युक्तचित्त असल्यानेच त्याला जाणू शकतात.

॥श्रीराम समर्थ॥