आत्मसंयमयोग (अध्याय ६)

मी- एक साधनी:
सहाव्या अध्यायात सांगितलेला आत्मसंयमयोग कसा असतो, महाराज ?
माझ्या मनातील सद्गुरु:
आत्मसंयमयोग दुःखी संसारापासून सोडविणारा हा योग आहे.
------------------------
मी- एक साधनी:
तो कसा आचरावा?
माझ्या मनातील सद्गुरु:
साधकाने स्वतःच स्वतःचा संसारसमूहातून उध्दार करुन घ्यावा.
स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये.
मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे.
मन-इंद्रिये-शरीराला वश करुन घेउन, आशारहित होऊन, संग्रहरहित होऊन साधकाने एकाकी रहावं आणि आत्म्याला परमात्म्यामध्ये लावावं.
स्वच्छ प्रदेशात, कुश-मृगचर्म व वस्त्र अशा क्रमाने लावलेले आसन, फार उंच नाही आणि फार खाली नाही अशा ठिकाणी स्थिरपणे प्रतिष्ठित करावे.
त्या आसनावर बसावे, चित्त इंद्रिय यांना वश करुन मन एकाग्र करुन आत्मशुध्दीसाठी योगाचा अभ्यास करावा.
शरीर-डोकं आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर करावं.
आपल्या नासिकाग्रावर दृष्टी ठेवावी.
अन्य दिशांना पाहू नये.
ब्रह्मचर्यव्रतात रहावं, भयरहित व्हावं.
आत्म्याला प्रशांत करावं, मनाचा संयम करावा, परमात्म्याच्या ठिकाणी चित्त लावावं, तत्परायण व्हावं.
हा योग साधायचा असेल तर खूप खाऊ नये, उपाशी राहू नये, फार झोपू नये, फार जागे राहू नये.
यथायोग्य आहार-विहार करणार्‍याला, यथायोग्य व्यवहाराचे कर्म करणार्‍याला, योग्य निद्रा घेणार्‍याला व योग्य वेळ जागं रहाणार्‍याला हा योग सिध्द होतो.
हा योग करताना उत्साही चित्ताने करावा व निश्चयाने करावा.
संकल्पापासून उत्पन्न होणार्‍या सर्व कामनांचा निःशेषरूपाने त्याग करुन, मनाने सर्व इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित करुन, हळुहळू उपरती प्राप्त करुन घ्यावी. धैर्ययुक्त बुध्दीने मनाला परमात्म्यामध्ये स्थिर करावे.
चंचल व अनावर मन अभ्यासाने व वैराग्याने ताब्यात आणता येते.
ज्याने मनावर ताबा मिळवला नाही त्याला योग सिध्द होत नाही.
प्रयत्नशील माणसाला योग सिध्द होऊ शकतो.
------------------------------
मी- एक साधनी:
महाराज, हा योग प्रत्यक्ष आचरीत असलेले आत्मसंन्यासी कसे असतात?
माझ्या मनातील सद्गुरु:
जे कर्मफलाचा आश्रय न घेता कर्तव्यकर्म करतात; जे संकल्पांचा त्याग करतात, जे संन्यासी(आत्मसंन्यासी) तेच योगी.
निष्काम कर्म करणे एवढाच त्यांचा हेतू असतो. कारण सर्व संकल्पांचा अभाव हेच कल्याणाला कारण ठरते.
इंद्रियांच्या भोगांमध्ये व कर्मांमध्येही जे आसक्त होत नाहीत (अनुषज्जते) अशा या सर्वसंकल्पसंन्याशांना योगारूढ म्हणतात.
या (आत्मसंन्यासी) योग्यांनी मन व इंद्रिये यांच्यासहित शरीर (आत्मा) जिंकलेले असते, हे (आत्मसंन्यासी) आपणच आपले मित्र असतात (आत्मन: आत्म एव बंधु).
ज्यांनी मन व इंद्रियांसह शरीर (आत्मा) जिंकलेले नाही, त्यांच्यासाठी ते स्वत:च शत्रुवत्‌, शत्रुत्त्वाचे वर्तन करतात.
शीत-उष्ण, सुख-दु:ख, मान-अपमान यामध्ये हे (आत्मसंन्यासी) प्रशान्त असतात, ते जितात्मन:(स्वत:ला जिंकलेले) असतात, त्यांच्या आत परमात्मा सोडून दुसरे काहीही नसते.
त्यांचे अंत:करण ज्ञान-विज्ञानाने तृप्त असते, ते कूटस्थ असतात, ते विजितेंद्रिय असतात, त्यांना दगड-माती-सोने समान असते, ते भगवंताशी युक्त झालेले असतात.
ते (आत्मसंन्यासी) सुहृद-मित्र-शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करण्याजोगा, बंधू, साधू, पापी या सर्वांविषयी समान भाव (समबुद्धी) बाळगणारे असे विशेष असतात.
त्यांचे चित्त पूर्णपणे नियत केलेले असते, सर्व इच्छांविषयी ते नि:स्पृह झालेले असतात, ते परमात्म्यामध्ये स्थित झालेले असतात.
सर्व प्राण्यांचा आत्मा असलेल्या अशा भगवंताला सर्व ठिकाणी व्यापून राहिलेला ते (आत्मसंन्यासी) पाहातात, भगवंतामध्ये सर्व प्राण्यांना ते पाहातात, त्यांना परमात्मा अदृश्य नसतो(ते त्याला पाहू शकतात), भगवंताला ते अदृश्य नसतात (तो त्यांना पाहातो).
ते (आत्मसंन्यासी) एकत्त्वात स्थिर होऊन, सर्व भूतांत स्थिर असलेल्या भगवंताला भजतात.
त्यांचे सर्व व्यवहार परमात्म्यातच होत असतात.
ते सर्वत्र स्वत:ला पाहिल्याप्रमाणे पाहातात, स्वत:चे सुख-दु:ख समदृष्टीने पाहातात. हे (आत्मसंन्यासी) श्रद्धावान योगी भगवंताच्या ठिकाणी अंतरात्म्याला स्थापन करून त्याला अखंड भजतात, ते भगवंताला सर्वांत श्रेष्ठ वाटतात.
मी- एक साधनी:
आपल्या चरित्रात मी असे वाचले की, आपण संपूर्ण राममय झालेला होता. सर्व कर्मे आपण त्याच्यासाठीच करायचात. आपल्याला आपले भक्तही रामरुप दिसायचे. आपल्या सन्निध्यात सामान्य प्रापंचिक, ब्रह्मचारी, वृध्द निवृत्त, गरीब-श्रीमंत, सज्जन-लबाड, व्यसनी, भोंदू, व्यभिचारी, संन्यासी, योगी, रोगी, लहान मुले, परित्यक्ता, बालविधवा, पतिव्रता, चोर, खुनी, दरोडेखोर, सर्व प्रकारची साधना करणारे साधनी असायचे. सर्वजण आपल्याभोवती गुण्यागोविंदाने रहायचे. सर्वांना आपण एकच भोजन-तीर्थ-प्रसाद द्यायचात. आपल्याला विष घालणार्‍यालाही आपण रामनाम दिलेत. आपल्या डोक्यात दगड घालाय़ला निघालेल्या भाईबंदाला आपण आपल्या पंक्तीला बसवून जेवायला घातलंत. आपली परीक्षा घ्यायला आलेल्या वैदिकांना, पुराणिकांना, वेदांतपंडितांना आपण सन्मानाने वागवून भक्तिमार्गाचे महत्व सांगितलेत. देहाने प्रपंच करावा आणि मनाने राम भजावा, आपल्या साधनाचे प्रदर्शन करु नये आणि रामासाठी राम भजावा, त्याला अन्य काही मागू नये हे आपल्या निरुपणाचे सार होते.
----------------------------------------------
महाराज, हा आत्मसंन्यास योग साधलेल्या योग्यांना भगवंत कोणते फल देतो?
माझ्या मनातील सद्गुरु:
भगवंतामध्ये असणारी निर्वाणपरमाम्‌ शांति हे योगी मिळवतात.
वारा नसलेल्या निश्चल ज्योतीप्रमाणे अशा योग्यांचे चित्त होते.
ते आत्म्यातच तुष्ट राहातात.
ते आत्यंतिक आनंदात राहातात.
परमात्म्याशी त्यांनी अविचल युती साधलेली असते.
ते दुसर्‍या कोणत्याही गोष्टीला लाभ मानत नाही.
फार मोठ्या दु:खानेही ते विचलित होत नाहीत.
त्यांचा रजोगुण शांत होऊन जातो.
अशा ब्रह्मभूतांना-ब्रह्मसंस्पर्शींना उत्तम व अत्यंत सुख मिळते.
सर्व भूतांना हे योगी आत्म्यामध्ये पाहातात.
प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारे योगी, मागील अनेक जन्मांच्या संस्कारांच्या जोरावर, याच जन्मात संपूर्ण पापरहित होऊन, तात्काळ परमगती प्राप्त करतात.

॥श्रीराम समर्थ॥