कर्मसंन्यासयोग (अध्याय ५)

मी- एक साधनी:
महाराज, गीतेत वर्णिलेला पाचव्या अध्यायातील कर्मसंन्यासयोग कसा असतो?
माझ्या मनातील सद्गुरु:
संन्यास व कर्मयोग दोन्हीही कल्याणकारी आहेत. दोन्हीत कर्मयोग अधिक श्रेष्ठ आहे. ज्ञानयोग्यांना जे स्थान प्राप्त होते तेच कर्मयोग्यांनाही होते. हे दोन्ही एकच एकच आहेत हे जो पहातो, तोच खरे पहातो.
-----------------------
मी- एक साधनी:
तो कसा आचरावा?
माझ्या मनातील सद्गुरु:
पहाताना, ऐकताना, स्पर्श करताना, वास घेताना, भोजन करताना, झोपताना, श्वास घेताना, बोलताना, त्याग करताना, दान घेताना, डोळे उघडताना आणि मिटताना, तत्व जाणणार्‍या युक्त मनुष्याने असे समजावे की, सर्व इंद्रिये आपापल्या विषयांत व्यवहार करीत आहेत आणि मी काहीसुध्दा करीत नाही.
बाहेरच्या विषयभोगांना बाहेरच सोडावे, दृष्टी दोन्ही भुवयांमधल्या ठिकाणी लावावी. प्राण व अपान या वायूंना सम करावे.
---------------------------
मी- एक साधनी:
हा योग आचरणारे कर्मसंन्यासी कसे असतात?
माझ्या मनातील सद्गुरु:
हे संन्यासी कोणाचाही द्वेष करीत नाहीत, कशाचीही अपेक्षा करीत नाहीत.
या योगयुक्तांचे मन त्यांच्या स्वत:च्या ताब्यात असते, ते इंद्रियनिग्रही आणि शुद्ध अंत:करणाचे असतात, परमात्माच त्यांचा आत्मा असतो.
मी- एक साधनी:
महाराज आपल्याला पाण्यात पहाणार्‍यांचाही आपण कधी द्वेष केला नाहीत. आपण आपल्याला विविध कारणांसाठी भेटायला आलेल्यांकडून कधीही कोणतीही अपेक्षा केली नाहीत उलट, आपल्याच घरी आपण शेकडोजणांना ठेऊन घेतलं होतत, त्यांना रामनाम देऊन, महिनोंमहिने जेऊ घातलं होतंत. त्य़ांचे रुसवे-फुगवे काढले होतेत. त्यांची लग्ने लावली होतीत, मुंजी केल्या होत्या. शिवाय घरी जायला निघाल्यावर पुरुषाला नारळ आणि सुवासिनीला खण देत होतात. त्यांना रामनाम घेण्याची आठवण करुन निरोप देत होतात.
महाराज, कर्मसंन्यासांची अजून काही वर्णने सांगावीत.
माझ्या मनातील सद्गुरु:
हे योगी कर्मे करूनही अलिप्त राहातात.
ते सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करतात, ते कर्मे करताना आसक्ती ठेवत नाहीत, पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापापासून अलिप्त राहातात.
ममत्त्वबुद्धी न ठेवता, केवळ इंद्रिये, मन, बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारा आसक्ती सोडून देऊन अंत:करणाच्या शुद्धीसाठी ज्ञानकर्मसंन्यासी कर्मे करतात.
-------------------
मी- एक साधनी:
आपल्या मातापित्याच्या आग्रहामुळे व आपल्या सद्गुरुंच्या आदेशामुळे आपण लग्ने केलीत, मुले होऊ दिलीत. अनेक जवळचे नातेवाईक - आजोबा, वडिल, भाऊ-बहिण, प्रथम पत्नी, मुले गेली तरी आपण शांत राहिलात. रामनाम घेत आपण कर्तव्य म्हणून कुळकर्णीपणाची वृत्तीही केलीत. तीही आदर्श केलीत. आपल्या देखरेखीखाली सर्व जनता सुखी आणि समाधानी आणि निश्चिंत होती. महाराज, कर्मसंन्यासांची अजून काही वर्णने सांगावीत.
माझ्या मनातील सद्गुरु:
हे योगी विद्या आणि विनय यांनी युक्त असतात, ब्राह्मण-गाय-हत्ती-कुत्रा-चांडाल या सर्वांना ते समदृष्टीने पाहातात.
त्यांचे मन समभावात स्थिर झालेले असते, त्यांनी या जन्मीच संपूर्ण संसार जिंकलेला असतो.
प्रिय वस्तू मिळाल्यावर ते आनंदित होत नाहीत व अप्रिय वस्तू मिळाल्याने उद्विग्न होत नाहीत.
त्यांची बुद्धी स्थिर असते. ते संशयरहित (असंमूढ- without any confusion) असतात (गोंधळलेले नसतात), ते ब्रह्मामध्ये स्थित असतात.
मी- एक साधनी:
आपण श्रीमारुतीरायाचे अंशावतार आहात, आपण लहानपणीच एक श्रेष्ठ दर्जाचे योगी झाला होतात.
आपल्या सद्गुरुंचे अतिशय प्रिय आणि निष्ठावान सशिष्य आपण होतात, अष्टसिध्दी आपल्या पायाशी लोळत होत्या, आपण केंव्हाच रामरुप झाला होतात.
एकूण १२ वेळा आपण देशभरात फिरुन तीर्थयात्रा केल्या होतात. मोजता येणार नाही इतक्याजणांना आपण सन्मार्गाला लावलंत. भिकारी, महारोगी, गाढव, कसायाने ओढून नेलेल्या गाई, वाममार्गी तांत्रिक-मांत्रिक या सर्वांशी आपण सारख्याच प्रेमाने वागलात. आपल्या उत्तुंग लोकसंग्रहाचं, सर्व श्रेय आपण कायम रामरायाला दिलत. "मी" असा शब्दाने कधी जिव्हा आपण विटाळली नाहीत. भक्तांशी बोलताना अतिशय गोड आवाजात आपण आर्जवानं रामनामाची महती सांगत असायचे.
माझ्या मनातील सद्गुरु:
हे बुद्धीमान योगी इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणार्‍या भोगांमध्ये रमत नाहीत, कारण हे भोग दु:खाला कारण ठरतात, या भोगांना सुरुवात व शेवट असतो.
शरीर सोडण्यापूर्वीच कामक्रोधातून उत्पन्न होणारा आवेग हे योगी सहन करू शकतात.
त्यांचे पाप नष्ट झालेले असते, त्यांची द्वैतबुद्धी नष्ट झालेली असते (छिन्नद्वैधा). सर्व भूतमात्रांचे हित करण्यात ते रमलेले असतात, ते परमात्म्यात स्थिर असतात.
त्यांची काम-क्रोधाशी फारकत (वियुक्त) झालेली असते, त्यांनी मन जिंकलेले असते.
त्यांच्या सर्व बाजूंना परमात्माच भरलेला असतो.
ते बाहेरच्या विषयभोगांचे चिंतन न करता त्यांना बाहेरच ठेवतात, त्यांची दृष्टी भ्रूमध्यामध्ये त्यांनी स्थिर केलेली असते, त्यांनी प्राण व अपान सम केलेले असतात, त्यांनी इंद्रिये-मन-बुद्धी जिंकलेली असते, त्यांचे काम-क्रोध-भय गळून गेलेले असते, ते मोक्षपरायण झालेले असतात.
---------------------------
मी- एक साधनी:
महाराज, सार्‍या जीवनभर आपण देहबुध्दीमुळे वारंवार होणारे दुःख आणि न संपणार्‍या भोगतृष्णेविषयी परोपरीने सांगत होतात. रामाशी अनन्य होऊन केलेल्या १३ कोटी राममंत्रजपयज्ञाने साधकाची सर्व पापे, वासनाबीज जळून जाते आणि त्याची संपूर्ण चित्तशुध्दी होऊन तो रामरुप होऊन जातो. तो यथावकाश सर्व जगच रामरुपात पहातो. त्याला बाकी काही करण्यासारखे उरत नाही. असं आपण स्वानुभवाने सांगत होतात. या कर्मसंन्यासयोग्यांना भगवंत कोणते फल देतो?
माझ्या मनातील सद्गुरु:
कर्मयोगाशिवाय, सर्व क्रियांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग (संन्यास) होणे दु:खकारक (कठीण) आहे.
योगयुक्त (कर्मयोगी) ब्रह्माला फार लवकर प्राप्त होतो.
कर्मयोगी कर्माच्या फळांचा त्याग करून भगवत्‌प्राप्तीरूप शांती प्राप्त करून घेतो. (अंत:करण) वश करून घेतलेला मनुष्य (देही) काही न करता आणि काही न करविता, नऊ द्वारे असलेल्या पुरात (देहात) सर्व कर्मांचा मनाने त्याग करून सुखाने राहातो.
ज्यांचे अज्ञान परमात्मज्ञानाने नाहीसे झाले आहे, त्यांचे ज्ञान सूर्याप्रमाणे परमात्म्याला प्रकाशित करते.
ज्यांचे मन व बुद्धी तद्‌रूप झालेली आहे आणि परमात्म्यातच ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहे असे ईश्वरपरायण पुरुष (माणूस) ज्ञानाने पापरहित होऊन परमगती प्राप्त करून घेतात. (अपुनरावृत्तिम्‌).
ज्याच्या अंत:करणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते, असा योगी आत्म्यात असलेल्या, ध्यानामुळे मिळणार्‍या सात्विक आनंदाला प्राप्त होतो.
त्यानंतर तो ब्रह्मयोगमुक्तात्मा अक्षय सुखाचा अनुभव घेतो.
जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी, आत्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो, तो अंत:ज्योती (आत्म्याच्या ज्योतीमध्ये ज्याचे ज्ञान प्रकाशित होते तो), तो ब्रह्मभूत (परमात्म्याबरोबर एक झालेला) योगी ब्रह्मनिर्वाण प्राप्त करून घेतो.
या ब्रह्मवेत्त्या ऋषींना ब्रह्मनिर्वाण लाभते. त्यांना सर्व बाजूनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण असतो. परमात्म्य़ाचा हा भक्त त्याला तत्त्वत: जाणून शांतीला प्राप्त होतो.

॥श्रीराम समर्थ॥