कर्मयोग (अध्याय ३)

मी-एक साधनी:
महाराज भगवंताने तिसर्‍या अध्यायात सांगितलेला कर्मयोग कसा असतो?
माझ्या मनातील सद्गुरु:
कर्माचे बंधन न होता स्वधर्मकर्म करण्यास सांगणारा हा कर्मयोग आहे.
------------------
मी-एक साधनी: तो कसा आचरावा?
माझ्या मनातील सद्गुरु:
मनुष्य कर्मे केल्याशिवाय निष्कर्मतेला (योगनिष्ठेला) प्राप्त होत नाही, फक्त कर्माचा त्याग केल्याने सांख्यनिष्ठा प्राप्त होत नाही.
मनुष्याने शास्त्राने नेमून दिलेली कर्तव्यकर्मे करावीत, कर्म न करण्य़ापेक्षा कर्मे करणे श्रेष्ठ आहे, कर्म न केल्याने शरीर-व्यवहार चालणार नाहीत.
यज्ञानिमित्त केलेल्या कर्माशिवाय इतर कर्मांत गुंतलेला मनुष्य, कर्मांनी बांधला जातो.
मनुष्याने आसक्ती सोडून यज्ञासाठी कर्तव्यकर्म उत्तमप्रकारे करावे.
लोकसंग्रहाकडे बघून कर्तव्यकर्म करावे.
अंतर्यामी परमात्म्यामध्ये चित्त गुंतवून, सर्व कर्मे परमात्म्याला समर्पण करुन, आशा-ममता-विगतज्वर (संतापरहित) हॊऊन, कर्तव्यकर्म करावे.
दुसर्‍याचा धर्म चांगला असला तरी तो आपल्यासाठी भयावह असतो, आपला धर्म दुय्यम असला तरी स्वतःसाठी तो श्रेयकर असतो.
स्वधर्म करता करता मरण आले तरी ते श्रेयस्कर असते.
------------------------------------
मी-एक साधनी:
महाराज हे कर्मयोगी कसे असतात?
माझ्या मनातील सद्गुरु:
कर्मयोगी हे, मनाने इंद्रियांना ताब्यात ठेऊन आसक्त न होता, सर्व इंद्रियांच्या द्वारे कर्मयोगाचे आचरण करतात.
ते आत्म्यामध्येच रमतात, आत्म्यामध्येच तृप्त राहातात आणि आत्म्यामध्येच संतुष्ट असतात, त्यांच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही.
कर्मयोग्यांना या विश्वात कोणतेही कर्म करण्याचे प्रयोजन नसते, कोणतेही कर्म न करण्याचेही प्रयोजन नसते, कोणाशीही त्यांचा यत्किंचितही स्वार्थाचा संबंध(अर्थव्ययाश्रम) नसतो.
हे ज्ञानी लोक(जनकादी) आसक्तिरहित कर्म करण्यानेच परम सिद्धीला पोहोचतात.
----------------------------------
मी- एक साधनी:
महाराज, सर्वसामान्य माणसांप्रमाणेच कर्तव्ये करणारे(वागताना दिसणारे) काही योगी लोकसंपर्कात असताना वरवर पाहता काही विशेष भक्ती किंवा साधना करताना दिसत नाहीत, त्यामुळे आपणही काही साधना केली नाही तरी चालेल असा गैरसमज आसपासच्या माणसांचा होऊ शकतो. कारण भगवंताच्या कृपेसाठी काही न करणे हे सर्वसामान्य माणसांच्या सोईचे असते. आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी साधना करणे तर आवश्यक असते, अशा वेळी योगीजनांनी इतर माणसांच्या भल्याकरीता काय करावे?
माझ्या मनातील सद्गुरु:
या ज्ञानी पुरुषांना भगवंताची आज्ञा अशी आहे की त्यांनी शास्त्रविहित कर्मात आसक्ति असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये, शास्त्रविहित सर्व कर्मे स्वत: उत्तम प्रकारे करावीत, अज्ञानी लोकांकडून करून घ्यावीत.
सर्व गुणच गुणांत वावरत असतात हे लक्षात घेऊन गुणविभाग व कर्मविभाग यांचे तत्त्व जाणणारा हा योगी (ज्ञानयोगी- तत्त्वविद्‌) गुणांमध्ये आसक्त होत नाही. पूर्व ज्ञान असणार्‍या(कृत्स्नविद्‌) या योग्याने अज्ञानी लोकांना विचलित करू नये.

मी- एक साधनी:
महाराज, मी जेव्हा आपले चरित्र वाचले तेव्हा कळले की, आपणही कितीतरी वैदिक कर्मे विप्रांकडून वर्षानुवर्षे करवून घेत होतात. आपल्या घरातील व आपण बांधलेल्या विविध मंदिरांतील देवांची नित्य पूजाअर्चा, आरती, नैवेद्य, भजन-कीर्तन, जपयज्ञ, हवन इ. होत असे. एकादशी आणि वर्षातून येणार्‍या विशेष तिथींना सर्व साधकांसह आपणही उपवास करत होता. प्रतिवर्षी आपण आपल्या पितरांच्या सद्गतीसाठी श्राध्दपक्ष करीत होतात. हजारों लोकांना भारतवर्षातील तीर्थस्थळी नेऊन गंगास्नान, तीर्थश्राद्ध स्वतः करून इतरांना करण्यास उद्युक्त करीत होतात. आपण स्वतः सोवळे नेसल्याशिवाय श्रीरामाच्या मूर्तीला स्पर्श केला नव्हता. स्नान न करता धुंधुरमासाचा खिचडीचा प्रसाद खाण्यास नकार देताना, आपण असेच म्हणाला होता की मी जर असं अधार्मिक वागायला लागलो तर इथे असणारे लोकही तसेच वागायला लागतील. आपल्या चरित्रातील प्रसंगांवरुन आणि प्रवचनांचे सार वाचून, मला कर्मयोग नीट लक्षात आला. तोपर्यंत परमात्म्याच्या सगुणरुप उपासनेशी निगडित कर्मकांडांविषयी खूप गैरसमज माझ्या मनात होते.
महाराज, या आपल्यासारख्या कर्मयोग्यांना भगवंत कोणते फल देतो?
माझ्या मनातील सद्गुरु:
भगवंत सांगतात की, यज्ञ केल्यामुळे पुष्ट झालेल्या देवता योग्यांना न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहातात.
यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतात. आसक्ती सोडून कर्म करणारा योगी परमात्म्याला जाऊन मिळतो.
भगवंत्त म्हणतात की, जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंत:करणाने माझ्या मताचे नित्य अनुसरण करतात, ते ही सर्व कर्मांपासून मुक्त होतात.

॥श्रीराम समर्थ॥