प्रकृती/भगवंताची माया

प्रकृती/भगवंताची माया
(संदर्भ - श्रीमद्भगवद्गीता - अध्याय ७, १३, १०)
-------------------------------------------------------
पुरुष (शरीरात असणारे चैतन्य) व प्रकृती दोन्ही अनंत व अनादि आहेत. (१३.१९)
पुरुष प्रकृतीमध्ये स्थित असल्याने त्रिगुणांचा भोग घेतो, या गुणांचा संग असल्यामुळे पुरुषाला बर्‍यावाईट योनींमध्ये जन्म घेणे भाग पडते. (१३.२१)
जीवाच्या देहातील पुरुष खरं तर परमात्माच आहे. (१३.२२)
क्षेत्र (प्रकृती) व क्षेत्रज्ञ (परमात्मा) यांनीच सर्व स्थावरजंगम सृष्टी बनलेली आहे. (१३.२६)
जगामध्ये भेद दिसणं हा परमात्म्याच्या त्रिगुणी मायेचा प्रभाव आहे.
------------------------------------
प्रकृती दोन प्रकारची असते -
अपरा प्रकृती (जड, अष्टधा) - भूमी , आप (पाणी), अनल (अग्नी) , वायू, खं (आकाश) , मन , बुध्दी , अहंकार (७.४)
परा प्रकृती (चेतन) - हिच्यामुळे सर्व जग धारण केले जाते. (७.५)
----------------------
सर्व भूते या दोन प्रकृतींमुळे निर्माण होतात, परमात्मा या जगाची उत्पत्ती करतो आणि त्याचा लयही करतो. (७.६)
ही माया दैवी व गुणमयी आहे, ती तरुन जायला फार कठीण आहे.
ही माया जिवाचे स्वरूपाविषयीचे (जीवात्म्याविषयीचे) ज्ञान हिरावून घेते. त्यामुळे मूढ-अज्ञानी जीव परमात्म्याला भजत नाहीत कारण तीन गुणांच्या भावांमुळे हे सर्व जग मोहित होतं. तम व रज हे गुण माणसाला अधिक अज्ञानी करतात. सत्वगुणी मनुष्य दैवी संपदायुक्त होऊ शकतो.

परमात्मा या तीन गुणांच्या अलिकडे अव्यय असा आहे. त्य़ामुळे त्याला कोणी जाणू शकत नाही. परमात्मा मनुष्यरूप आणि त्यामुळे माणसांसारखाच आहे असं मूढ मानतात.

प्रत्यक्षात परमात्मा सर्वश्रेष्ट, अव्यय, परम व अव्यक्त असा आहे. परमात्मा त्याच्याच योगमायेने झाकलेला आहे. म्हणून कोणी त्याला पाहू/जाणू शकत नाही. तो अज व अव्यय असूनही माणसं त्याला जन्म-मृत्यू असणारा समजतात. पूर्वी होऊन गेलेल्या, वर्तमान काळातल्या आणि भविष्यात होणार्‍या सर्व भूतांना परमात्मा जाणतो. परंतु त्याला कोणी जाणत नाही.

भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की मी अव्यक्त मूर्ती आहे, माझ्यामुळे हे सर्व जग परिपूर्ण आहे, सर्व भूते माझ्यात स्थित आहेत, मी त्यांच्यामध्ये अवस्थित नाही, माझ्या ईश्वरीय योगशक्तीने मी भूतांना उत्पन्न करणारा आहे, भरण पोषण करणारा आहे, तरीही माझा आत्मा त्यांच्यात नाही. आकाशात सदैव महान वायू स्थित असतो, त्याप्रमाणे सर्व भूते माझ्यामधेच स्थित असतात, कल्पाच्या अंती सर्व भूते माझ्या प्रकृतीत लीन होतात, कल्पाच्या आरंभी मी त्यांना पुन्हा उत्पन्न करतो. माझ्या मायेचा अंगीकार करून पराधीन भूतसमुदायाला मी पुन्हा पुन्हा त्यांच्या कर्मानुसार उत्पन्न करतो. या कर्मात मी आसक्त नसल्याने व मी उदासीन असल्याने ही कर्मे मला बंधनात पाडत नाहीत. माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती चराचरासह सर्व जग निर्माण करते. या हेतूने हे जग फिरत आहे.

जे परमात्म्याला निरंतर भजतात तेच या मायेतून तरून जातात.
logo12.jpg