सात्विक श्रध्दा

मी एक साधनी:
सात्विक श्रध्दा असलेल्या माणसाची लक्षणे कशी असतात?

माझ्या मनातील सद्गुरु:
सात्विक माणुस अकुशल कर्मांचा द्वेष करीत नाही.
कुशल कर्मांमध्ये आसक्त होत नाही.
तो शुध्द सत्वगुणयुक्त रहातो.
तो संशयरहित असतो.
तो बुध्दिमान (मेधावी) असतो.
सात्विक माणूस देवांची पूजा करतो (सात्विक श्रध्दा).
त्याचा आहार रसयुक्त, स्निग्ध, स्थिरता देणारा, मनाला प्रिय वाटणारा, आयुष्य-बुध्दी-बळ-आरोग्य-सुख-प्रीती यांची वृध्दी करणारा म्हणजेच सात्विक असतो.
तो शास्त्रविधीने नेमून दिलेला, कर्तव्यकर्म म्हणून केलेला, फळाची इच्छा न ठेवता केलेला असा सात्विक यज्ञ करतो.
त्याचे तप सात्विक असते.
देवता-ब्राह्मण-गुरु-ज्ञानी यांच्या पूजनाने व पावित्र्य-सरळपणा-ब्रह्मचर्य-अहिंसा यांच्या आचरणाने तो शारीरिक तप करतो.
उद्वेग निर्माण न करणारे, प्रिय, हितकारक, सत्य अशा भाषणाने तो वाणीचे तप करतो.
स्वाध्याय व अभ्यास करुन मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवत्चिंतन, मनोनिग्रह, अंतःकरणात शुध्द भाव ठेवून तो मानसिक तप करतो.
कर्तव्यभावनेने, योग्य देश-काल (जिथे तुटवडा असतो) पाहून, पात्र व्यक्तीस (असमर्थ व दीन जो परतफेड करु शकणार नाही), उपकार न करणार्‍याला, श्रेष्ठ ज्ञानी-ब्राह्मण व संतांना सात्विक माणूस दान करतो.
तो सर्व शास्त्रविहीत कर्मे करतो मात्र आसक्ती व फलाचा त्याग करतो.
सात्विक ज्ञानामुळे मनुष्य सर्व भूतांमध्ये परमात्मा पाहातो.
शास्त्रविहीत, संगरहित, फळाची आशा, अपेक्षा नसणारे व आसक्ती, द्वेष विरहित असे सात्विक कर्म तो करतो.
तो सात्विक कर्ता असतो म्हणजेच तो संगरहित, अहंता नसलेला, धैर्यवान, उत्साही, काम पूर्ण किंवा अपूर्ण कसेही झाले तरी हर्ष-शोक न वाटणारा असतो. त्याची सात्विक बुध्दी प्रवृत्ती-निवृत्ती, कर्तव्य-अकर्तव्य, भय-अभय, बंधन-मोक्ष हे सर्व जी यथार्थपणे जाणते.
त्याची सात्विक धृती अव्यभिचारिणी ध्यानयोगाने मन, प्राण आणि इंद्रिये यांच्या क्रिया धारण करते.
सात्विक माणसाला भजन-ध्यान-सेवा या अभ्यासात रमल्यानं सुख मिळतं.
हे सुख आरंभकाळी विषाप्रमाणे (कडू) परिणामी अमृततुल्य वाटतं.
हे सात्विक सुख आत्मबुध्दीच्या प्रसादामुळे उत्पन्न होते.

॥श्रीराम समर्थ॥