परमपद

परमपद -
मी- एक साधनी:
हे परमपद कसे आहे असं भगवंत सांगतात?
माझ्या मनातील सद्गुरु:
वेदवेत्ते याला अक्षरब्रह्म म्हणतात. यती विरक्त होऊन यात प्रवेश करतात.

मी- एक साधनी:
हे परमपद मिळवण्यासाठी कसा प्रयत्न करावा असं भगवंतानं अर्जुनाला सांगितलं?
माझ्या मनातील सद्गुरु:
आता मी तुला भगवंताचे परमरहस्ययुक्त वचन सांगतो- परमात्मा असे म्हणतो की, जो मी सांगतो त्याप्रमाणे वागेल, मी त्यालाच सर्व पापांतून मुक्त करेन व माझी प्राप्ती करून देईन. ज्याला माझी प्राप्ती हवी असेल त्याने, सर्व धर्म(सर्व कर्तव्यकर्म) यांचा माझ्या ठिकाणी त्याग करावा. फक्त मलाच शरण जावे. फक्त माझ्याच ठिकाणी मन ठेवावे. फक्त माझेच भक्त व्हावे. माझेच पूजन करावे. मलाच प्रणाम करावा. शोक करु नये. प्रत्येक जीवाच्या शरीररूपी यंत्रामध्ये अंतर्यामी मीच परमेश्वर स्थित असतो व हे यंत्र मी स्वतःच्या मायेने फिरवतो. मला सर्व भावांनी शरण गेलं तर माझ्या कृपेने परम शांती आणि शाश्वत स्थान (परमधाम) प्राप्त होते. सर्व कर्मे करीत असताना मत्परायण व्हावं व माझ्या ठिकाणी ती अर्पण करावीत. जो अहंकारामुळे माझे ऐकत नाही तो, परमार्थातून भ्रष्ट होतो व नष्ट होतो.

जो माझ्या ठिकाणी चित्त ठेवतो, त्याच्यावर माझी कृपा होते. तो संकटातून पार होतो व शाश्वत अव्यय परमपदाची प्राप्ती करुन घेतो.

जे अनन्य भावाने माझे चिंतन करीत मला भजतात त्यांना मी योगक्षेम प्राप्त करून देतो. (माझ्यापर्यंत येऊन पोचण्यासाठी ते करीत असलेल्या साधनाचे रक्षण करतो.) शुद्ध अंत:करणाच्या भक्ताने प्रेमपूर्वक, निष्काम भावाने पान, फूल, फळ, पाणी अर्पण केले तर मी ते स्वीकारतो. (सगुणरूपाने प्रेमपूर्वक ग्रहण करतो.). सर्व भूतांकडे मी समदृष्टीने पाहातो. मला कोणी प्रिय नाही व अप्रिय नाही. परंतु जे मला प्रेमाने भजतात, जे माझ्यात (रममाण) असतात, त्यांच्यामध्ये मी सुद्धा असतो. एखादा अतिशय दुराचारीसुद्धा मला अनन्य भावाने भजत असेल तर, तो साधू समजावा. कारण त्याने माझ्या भजनासमान दुसरे काही करणार नाही, असा निश्चय केलेला असतो. असा भक्त लवकरच धर्मात्मा होतो आणि सतत टिकणारी परम शांती प्राप्त करून घेतो. माझा भक्त नष्ट होत नाही. स्त्रिया, वैश्य, शूद्र, पापयोनीत जन्माला जरी आलेले असतील तरी ते जर मला शरण आले तर ते परमगती प्राप्त करून घेतात.

॥श्रीराम समर्थ॥