दुःख-निराशा-दौर्बल्य-संमूढता

मी एक साधनी:
अशा संमूढ माणसाची मनःस्थिती कशी असते?
माझ्या मनातील सद्गुरु:
संमूढ माणसाचं मन भ्रमिष्ट व शोकमग्न होते.
त्याला अवाजवी, अतिरेकी, अवास्तव, काल्पनिक भीती वाटते.
चिंता व काळजीने त्याचे मन व्यग्र होते. काय करावे, कसे करावे? हे विचार त्याच्या मनात येतात.
उलटसुलट इच्छा आणि त्याप्रमाणे केले तर, मोठ्या प्रमाणावर कसे भयंकर अपरिमित नुकसान होईल, पाप लागेल अशा कल्पना, या दोन्हींची एकत्रित वावटळ उठून, त्याच्या डोक्यात गोंधळ होतो.
त्यामुळे त्याला कोणताही निर्णय घेता येत नाही.
त्याची बुध्दी असमर्थ होते.
त्याच्या अशा या दैन्यामुळे त्याच्या मूळ स्वभावाविरुध्द वर्तन घडते.
त्याला अतिशय शोक वाटतो, कारण या काल्पनिक नुकसानीला तोच जबाबदार ठरेन, अशी त्य़ाला भीती वाटते.
त्याला संपूर्ण हतबलता येते.
त्याचे कर्म थांबते म्हणजे त्याला काहीच करु नये असं वाटते.
चिंता-शरम-भीती-नैराश्य- दुःख यांनी मोहित माणसाचं मन व्यापून जातं.

मी एक साधनी:
कामामुळे संमोहित झालेला माणूस कसा दिसतो, कसा वागतो?
माझ्या मनातील सद्गुरु:
संमोहित माणसाचे अवयव गळून जातात,
त्याचं तोंड कोरडं पडत,
त्याच्या शरीराला कंप सुटतो,
त्वचेवरचे केस ताठ उभे होतात,
त्याच्या हातातून वस्तू गळून पडतात,
अंगाचा दाह होतो,
त्याला उभं रहाणं अवघड जातं,
त्याचे डोळे अश्रूंनी डबडबून व्याकूळ होतात.

मी एक साधनी:
सायकोथेरपीसाठी येणार्‍या देशी परदेशी माणसांपैकी बहुतेकांची स्थिती अशीच असते. त्यामुळेच तर मी गीतेच्या अभ्यासाकरीता प्रवृत्त झाले. इच्छा-आकांक्षा यापलिकडे आपल्या ग्रंथांमध्ये जे सांगितलय ते जाणून घ्यायची मला ओढ लागली.
महाराज, गीतेच्या दुसर्‍या अध्यायात भगवान या संमोहाबद्दल काय मत व्यक्त करतात ?
माझ्या मनातील सद्गुरु:
भगवान अर्जुनाला असं सांगत आहेत की, अशा पध्दतीचा विचार करण्याचा मार्ग मोहाचा, चुकीच्या वेळी सुचलेला, यशस्वी माणसांनी न आचरलेला, अंती सुख न देणारा, समाजात अपकीर्ति करणारा आहे.
अशी वागणूक षंढपणाची, न शोभणारी, हृदय दुबळं करणारी व त्यामुळे आपल्या व्यक्तित्वाची उंची कमी करणारी म्हणजे स्वतःला क्षुद्र करणारी आहे.
ज्यांच्याकरीता शोक करण्याची गरज नाही, अशांसाठी शोक केला जातोय.
अजून काहीच प्रत्यक्षात घडलेलं नसताना शोकाची ही अवस्था आश्चर्यकारक आहे.

॥श्रीराम समर्थ॥