सुख-दुःख, पापपुण्य

मी एक साधनी:
महाराज, जिज्ञासू मुमुक्षू अर्जुनाला धर्मयुध्दापूर्वी श्रीकृष्णाने गीता सांगितली. त्या अर्जुनाच्या, "हे दुःख नको, निर्मळ आणि अक्षय टिकणारे सुख हवे" या इच्छेचा धागा पकडून, गोपालरुपातील भगवंताने सनातन ब्रह्मज्ञान सांगितले.
आमच्यापैकी प्रत्येकजणच सुख-दुःख अनुभवताना दिसतो, आम्हीही सुखाच्या मागे धावतो आणि दुःखापासून लांब पळतो, ते कशामुळे ? विविध इच्छा माणसांच्या मनात निर्माण होणं आणि त्यामुळे सुख-दु:ख वाट्याला येणं, हा घोळ कशामुळे चालू रहातो, महाराज?

माझ्या मनातील सद्गुरु:
माणसाला ५ ज्ञानेंद्रिये व ५ कर्मेंद्रिये आहेत. त्या प्रत्येक इंद्रियाचा एक विषय ठरलेला आहे. उदा. डोळ्याचा विषय वस्तूचे रुप, कानाचा विषय वस्तूचा शब्द म्हणजे आवाज, जीभेचा विषय रस, नाकाचा विषय गंध व त्वचेचा विषय स्पर्श.

भगवंत गीतेत सांगताहेत की, प्रत्येक इंद्रियाच्या विषयात राग म्हणजे आकर्षण व द्वेष म्हणजे तिटकारा लपलेले असतात. जीवांच्या इंद्रियांचे विषयांशी होणारे संयोग थंडी-उष्णता देतात. त्याप्रमाणे माणसाला सुख किंवा दुःख होते. हे संयोग उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून ते अनित्य म्हणजे न टिकणारे असतात.
------------
मी एक साधनी:
याचा अर्थ, सुखही जास्त काळ टिकत नाही आणि दुःख ही नाही. माणसाला सुख हवं असतं आणि दुःख नको असतं. ते तर शक्य नाही असं दिसतंय. कारण प्रत्येक विषयातच दोन्ही दडलेलं असतं असं भगवंत अर्जुनाच्या निमित्तानं कलियुगातल्या माणसांना सांगताहेत.
सगळे जण तरीही सुख मिळवण्याची धडपड करत असतात, हे नेमकं कशामुळे महाराज?
माझ्या मनातील सद्गुरु:
कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी निःसंदेहपणे क्षणमात्र सुध्दा काम न करता रहात नाही.
तो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे, कर्म करायला भाग पाडला जातो.
सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात म्हणजेच, आपल्या स्वभावानुसार अधीन होऊन कर्मे करतात.
ज्ञानीसुध्दा आपल्या स्वभावानुसार व्यवहार करतो.
मी एक साधनी:
म्हणजे, कोणाही माणसानं काहीही करायचं नाही असं ठरवलं तरीही, त्याला ते शक्य नाही. महाराज, काही विशिष्ट गोष्टी करताना मला बरं वाटतं, काही करताना चुकतंय असं वाटतं? बरोबर कृती कशी असते? चुका घडताना त्या कशामुळे घडतात?
माझ्या मनातील सद्गुरु:
माणूस जर आकर्षण म्हणजे मला हवंच किंवा तिटकारा म्हणजे मला नकोच या दोहोंच्या आहारी गेला तर त्याच्या हातून चुका होऊन त्याच्या कल्याणमार्गात विघ्न येते.

॥श्रीराम समर्थ॥