लेखिकेचे मनोगत

मला समजलेली श्रीमद्‌भगवद्‌गीता
लेखिकेचे मनोगत
:
----------------------------------------
- इ.स. २००६-७ या दोन वर्षांच्या कालात, मी, भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितलेली गीता मूळ संस्कृतातून वाचली, त्याचा अन्वयार्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला.
- हे दिवस मी एका वेगळ्य़ाच मनोविश्वात वावरत होते. मध्यमवयात मला वेळ सापडला त्याचं सोनं झालं असं मला वाटलं.
- गीता मला वाचावीशी वाटणं, ती माझ्याजोगती मला समजणं, त्यामुळे माझ्या अंतरंगात खोलवर बदल घडून येणं ही मी सद्गुरु व परमेश्वरीकृपा समजते.
- जे कळलं ते मी लिहून काढलं.
-------------------------------------
- श्रीमद्भगवद्गीता ही कलियुगातील, (अर्जुनासारख्या) जिज्ञासू व मुमुक्षू माणसांना मार्गदर्शन करण्यासाठी श्रीभगवंतानं अर्जुनाचं निमित्त करुन सांगितली.

गुरुकृपा होण्यापूर्वी -
- १९८४ पासून मानसशास्त्राचा अभ्यास सुरु केल्यापासून मी ही गीता अनेकवेळा वाचण्याचा प्रयत्न केला होता. हताश व निराश होऊन मी गीतेवरची भाष्यं वाचणं बंदही केलं होतं. श्रीकृष्ण हा श्रीविष्णूचा अवतार होता हे माहित असून सुध्दा, तो मानवी रुपात असल्यानं, "मला शरण ये, माझं भजन कर, माझं स्मरण कर, सर्व कर्मे मला अर्पण कर", हा त्याचा अर्जुनाला सांगितलेला उपदेश मला काही केल्या पटतच नव्हता. माझी देहबुध्दी आड येत होती. आणि फक्त श्रीकृष्णाला शरण जाऊन सगळे प्रश्न कसे सुटतील हे ही त्यावेळी लक्षात येत नव्हतं. "मी गीता ऑप्शनला टाकलीय, मला ती समजत नाही, माझी अजून गीता वाचायची वेळ आली नाही", असं प्रामाणिकपणे सांगून मी ऐकणार्‍याची नाराजीही ओढवून घेतली होती.
गुरुशोध चालू असता -
- मे २००४ मध्ये म्हणजे जवळजवळ २० वर्षांनी, मी भक्तिमार्गाची कास धरली. श्रीरामनामाची सेवा सुरु केली. अनेक वैयक्तिक-कौटुंबिक अडथळे पार करत नेटानं साधना चालू ठेवली. साधना खर्‍या अर्थानं फलदायी करायची असेल तर सद्गुरुंच्या कृपेला पर्याय नाही, असं मी कितीतरी संतांच्या ग्रंथातून वाचत होते. या संत-सत्पुरुषांचे त्यांच्या सद्गुरुविषयीचे विशेष प्रेम, त्यांच्या नात्यातला अ-लौकिक गोडवा मला भावून जात असे. माझी शरणागतीची तयारी कितपत झालीय हे मी अजमावीत होते. एकीकडे राहिलेली सर्व यज्ञकर्म, कुळाचार, पितृ-पूजन संपन्न होत होते. यथावकाश साधनेशी तीव्रता, श्रीरामरायाविषयीचे शंका-निरसन, प्रभू-चरणाबद्दलचा ध्यास वाढत गेला. शिवाय माझे गुरु कोण याची ही तळमळ तीव्र झाली. इतकी की दुसरा विचारच सुचेना. अनेक गुरुस्थानांना जाऊन मी मला “आपण पदरात घ्यावं”, अशी दत्तगुरु अवतारांतील देहातीत गुरुंना विनंती करुन पाहिली होती. सद्गुरुंच्या छ्त्राविना मी अगदी व्याकुळ होऊन गेले होते. मार्च २००६ मध्ये भृगू-संहितेनुसार पूर्वजन्मीच्या पातकांचं यथासांग परिमार्जन करुन झालं आणि माझ्या मनाची तयारी झाली. सद्गुरुचरण मला माझ्या नजरेच्या टप्प्यात आल्यासारखे वाटू लागले.
सद्‌गुरुंनी पदरात घेतल्यानंतर -
- २६ मार्च २००६ या दिवशी, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची अनुग्रह-दीक्षा, त्यांच्या समाधीच्या ठिकाणी विधीपूर्वक मला मिळाली. मी स-नाथ झाले.
- यथावकाश, कै. श्री. बेलसरेबाबांनी लिहिलेल्या महाराजांच्या चरित्रग्रंथाचे अगणित वेळा वाचन-मनन-चिंतन केलं. महाराजांच्या कृपाप्रसादाचा लाभ रोज सतत मिळतोय हे लक्षात यायला लागलं. तेच खरे माझे माता-पिता-बंधू-परमेश्वर हे अनुभवायला मिळू लागलं. त्यांची सत्ता माझ्या जागेपणी व स्वप्नांमध्ये जाणवायला लागली. मी त्यांच्या चिंतनात रमून गेले. बिनकारणाचा आनंद-शांति-समाधान-प्रसन्नता मला ह्र्दयात जाणवू लागली. कधी न अनुभवलेली मनाची स्थिरता-एकाग्रता सातत्यानं राहू लागली. सर्वात महत्वाचं म्हणजे चिंता कमी होऊन मी आश्वस्त झाले. मागे-पुढे-डावीकडे-उजवीकडे-वर-खाली महाराजांची दृष्टी मला जाणवू लागली.
- सद्गुरुनिर्दिष्ट साधना एका टप्प्यापर्यंत झाल्यावर श्रीमद्भगवद्गीता मुळातून म्हणजे संस्कृतातून वाचावी, फक्त त्याचा अन्वयार्थ वाचावा असं वाटु लागलं. मी महाराज-भक्त श्री. प्रकाश नेर्लेकरांकडे गेले. मला कशा प्रकारचं पुस्तक हवं आहे ते सांगितलं. त्यांनी हरतर्‍हेची गीतेवरची पुस्तकं पुढे ठेवली. गोरखपूर प्रकाशनचं एक छोटं पुस्तक मी घरी घेऊन आले. त्याची यथासांग पूजा केली. माझ्या अज्ञानाचा अंधकार दूर होऊन मला यातील शब्दांचा अर्थ कळू दे अशी मी भगवंतापाशी प्रार्थना केली. त्या पुस्तकाचं प्रसन्न केशरी-पिवळ्या रंगाचं आकर्षक मुखपृष्ठ मला आवडलं. आतली ठळक मोठ्या अक्षरातली मांडणीही आवडली. कुरुक्षेत्रातल्या श्रीकृष्ण-अर्जुनाच्या संवादाचे चित्र मी आवडीने बघू लागले. २००१-२ या काळातली माझी अर्जुनासारखी झालेली अवस्था मला आठवली. त्यातून सहीसलामत बाहेर पडून आता शांतपणे साधना अधिक सजगपणे, डोळसपणे करावी या उद्देशाने मी वाचत असलेली गीता मला नक्कीच मार्गदर्शन करेल असं वाटू लागलं.
- सन २००६-७ चं दीड वर्ष मी एका वेगळ्याच धुंदीत काढलं. गीतेनं मला वेड लावलं. मनातल्या कितीतरी शंका-कुशंका विरुन गेल्या. मन साफ झालं, हृदयात आनंद मावेना. गुरुकृपेमुळे गीतेतील प्रासादिक शब्दांमध्ये दडलेला अर्थ साधक डोळवू शकतो हे, याची देही याची डोळा अनुभवायला मिळालं. यापूर्वी मला गीता का कळली नाही, मनात का संभ्रम निर्माण झाला तेही कळलं. श्रध्दावंतालाच गीता सांगावी हे भगवंतानं का स्पष्ट सांगितलंय हे कळलं.
आनंद वाटावा -
- मला झालेला आनंद हृदयात जिरवूनही उरला. ती उर्जा बाहेर पडू पहात होती. त्यातून जे समजलंय ते लिहून काढावं असं वाटू लागलं. उलटसुलट अनेकवेळा गीता वाचून झाली. मनात अनेक तुकडे तयार होत होते, जोडले-तोडले जात होते. गीतेतलं सर्वच तत्वज्ञान आपल्याला आत्ता कळणार नाही. मात्र आपल्या आत्ताच्या पायरीला जेवढं चिंतनीय-अभ्यासनीय प्रत्यक्षात आणण्यासजोगं वाटतंय तेव्हढं लिहावं असं मी ठरवलं.
- अध्यायातील मला लक्षात आलेल्या विषयानुसार सुटी मांडणी करुन झाली. सर्व अध्यायांवरचं लेखन झाल्यावर विषयाप्रमाणे तुकडे जोडले. सर्व १८ अध्याय ५-६ मुद्यात बसले. एक एक विषयाप्रमाणे संकलित केलेली वाक्यं वाचली आणि संक्षेपित झालेली गीता काही वेगळंच सांगू लागली.
- आत्तापर्यंत मी गीताई, स्वरुपानंदांनी लिहिलेली भाष्यमय गीता वाचली होती. श्रीज्ञानेश्वरीची भाषा तत्कालीन असल्यानं मला समजायला जड गेली. गीताप्रेमी गीता विस्तारानं मांडतात. मला मात्र तिचा संक्षेप करुन घ्यायला सांगितला ही श्रीगुरुकृपेची ओळख. नेमकं-मोजकं साधकाला सांगणं यात तर गुरुंचं वैशिष्ठ्य!
- अजून खूप साधना होणं बाकी आहे. भगवंतामध्ये पूर्णपणे विलीन व्हायला किती जन्म लागतील मला माहित नाही. कितीतरी प्रवास बाकी आहे. पण आता त्याची फिकीर वाटत नाही. सद्गुरुंनी बोट धरलंय, त्यांच्या नावेमध्ये बसवलय. त्यांनी दिलेलं रामनामही भगवंतच घेतो हे अनुभवतेय. मी करतेय असं म्हणायला कुठं जागा नाही. गीतेवर लिहीलं जावं ही सुध्दा त्यांचीच इच्छा! लिहून घेणारे तेच आहेत.

॥श्रीराम समर्थ॥