अयोध्या

अयोध्या
--------------
श्रीराम हे आराध्यदैवत झाल्यापासून सतत विविध प्रकारच्या कवींनी लिहिलेली रामायणे (वाल्मिकीरामायण, अध्यात्मरामायण, भावार्थरामायण, श्रीरामविजय, योगवासिष्ठ्य, तुलसीरामायण) मी वाचतच होते.
शिवाय महाराजांच्या चरित्रात अनेकवेळेला अयोध्येचा उल्लेख आलेला आहे.
- महाराज कितीतरी वेळेला इथे आले होते.

- त्यांच्या आईचे निर्वाण व अंत्यविधी येथे झाले होते
- महाराज त्यांच्या भक्तांना घेऊनही इथे आले होते व त्यांनी महिनामहिना मुक्काम केला होता. (चरित्रसार)
- श्रीरामदासस्वामीही आपल्या आराध्यदैवताची नगरी म्हणून येथे आले होते, त्यांनी चातुर्मास येथे केला होता.
- येथून जवळच नैमिषारण्य आहे ज्याचाही संदर्भ चरित्रात खूप वेळा आला आहे.
----------------------
ऐतिहासिक संदर्भ -
गीतरामायणातील अयोध्येवरचे गाणे ऐकून व वाल्मिकीरामायणात वाचून, "अरे ही तर साक्षात मनूनिर्मित नगरी आहे" हे मला कळले.
[त्रेतायुग होऊनही लाखो वर्षे होऊन गेली आहेत (द्वापरयुगाची ८,६४००० वर्षे, कलियुगाची ५११० वर्षे)]
स्कंदपुराणात
अ = ब्रह्मा, य = विष्णू, ध = रुद्र हे सर्व मिळून शंकर होतो.
याला अवधपुरी असेही म्हणतात.
कलियुगात या नगरीचा जीर्णोध्दार राजा विक्रमादित्याने केला.
गोस्वामी तुलसीदासांनी आपले रामायण इथे लिहिले.
अयोध्येची इतर नावे - विनीता, अयुधा, साकेत, इश्वाकुभूमी, रामभूमी
------------------------------------
आधुनिक कालातले संदर्भ -
- इतर अनेक हिंदू देवस्थानांची जी वाट औरंगझेबाने (सतराव्या शतकात) लावली तशीच ती अयोध्येतील मंदिरांचीही लावली.
- अयोध्या-फैजाबाद ही जुळी शहरे आहेत.
http://www.shaktipeethas.org/ayodhya-map-t96.html
- रामजन्मभूमी विषयी राजकीय-सामाजिक-धार्मिक वादंग गेली दशकाहून अधिक वर्षे चालू आहे.
- राजा विक्रमादित्याला दृष्टांत झाल्यामुळे त्याने रामपंचायतनाच्या मूर्ती शरयू नदीतून वर काढून त्याची प्रतिष्ठापना केली. त्यां मूर्तींची पूजा काळे राममंदिरात होते.

---------------------------------
माझे अनुभव -
- श्रीगुरुनाथ ट्रॅव्हल्सच्या त्रिस्थळी (प्रयाग-काशी-गया) यात्रेत समाविष्ट केलेले अयोध्येचे नाव बघून मला फार आनंद झाला होता.
- अनायसा श्रीरामाचे, शरयू नदीचे दर्शन घडणार म्हणून मी खुश होते.
- भारताच्या, उत्तरप्रदेशाच्या नकाशावर ही सर्व नावे कोठे दिसतात, त्यांच्यामधली अंतरे किती वगैरे मी पाहून ठेवले होते.
- सकाळी नाष्ता करुन प्रयागहून आम्ही सर्व यात्री बसने निघालो.
- उत्तरप्रदेशमधल्या शेतीप्रधान ग्रामीण भागाचे दर्शन झाले. इथे कुकींग गॅस नाहीच. सर्वत्र उभी चुलाणं, लांबलांब अंतरावरची छोटीछोटी गावं. जागोजागी हातपंप.
- सगळीकडे चुन्यानं लिहिलेल्या गुप्तरोगांवरच्या दवाखान्य़ांच्या जाहिराती. मला पहाय़ला सुध्दा शरम वाटत होती. सगळा उत्तरप्रदेश गुप्तरोगांनी ग्रासल्याचे वातावरण त्याने होत होते. असेच मला दिल्ली स्थानकावरच्या अशाच जाहिराती वाचून वाटले होते. इथले रहिवासी आपलीच बदनामी कशी काय सहन करतात?
- रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नवीन कोवळी पालवी फुटलेले व नारळाएवढ्या भल्या मोठ्या बेलफळांनी लगडलेले वृक्ष होते. वाटेतल्या एका दुकानात बेलफळाचे, बोरांचे, जांभळांचे, कैरीचे शेकडो साठवणीचे पदार्थ विकायला होते. आम्ही लूट केली.
- दिवसभर उन्हात प्रवास करुन कलत्या दुपारी आम्ही अयोध्येला पोचलो.
- अयोध्येच्या पाट्या दिसायला लागल्यापासूनच पोलिस, चौक्या, जवान, मोठ्या गन्स, तपासणी नाकी यांची भरमार दिसू लागली. एखाद्या सीमेवरच्या युध्दछावणीत तर आपण नाही ना आलो असं मला वाटू लागलं.

रामजन्मभूमी
- सर्व सामान गाडीतच ठेवून फक्त थोडे सुटे पैसे घेऊन उतरायला आम्हाला सांगितलं. आम्ही हॉटेलवर न जाता आधी रामजन्मभूमी, हनुमानगढी, कनकमहाल इ चे दर्शन करणार होतो. सुरी-कात्री-केसाची पिन-मोबाईल-कॅमेरे-पिशवी-पर्स काहीही नेण्याची परवानगी नव्हती. मला जरा विचित्रच वाटलं. आपल्याच देशात श्रीरामाच्या राजधानीत रामाचं (इथं त्याला रामलल्ला म्हणतात) दर्शन घ्यायला चोरी? मला राग-संताप-चीड-खेद-हतबलता वाटली होती. काही इलाज नव्हता.
- मी समन्वयचा हात धरून पाण्याच्या बाटल्या घेऊन बसमधून खाली उतरले
- जन्मभूमीच्या अलिकडेपर्यंत बसच काय कोणतेच वाहन जात नाही फक्त सायकलरिक्षा सोडून. मी मुकाट एक अशी रिक्षा केली. बाकी सर्वजण पायी निघाले. मी वाहकाला "इतरांबरोबर रहा" असे सांगत होते. तरीही काही आडवळणे लागली की आम्ही दोघे एकटे पडत होतो. मला जाम टेन्शन आलं होतं. समन्वय मजेत होता.
- "रामा काय रे हे? तुझं दर्शनही इतकं दुर्मिळ? त्यासाठी सरकारची, लष्कराची परवानगी? अरे काय चोरी करतो की काय आम्ही इथं"...अर्थात हा उद्वेग फक्त सर्व मनातल्या मनात.
- मग आम्ही एका मोठ्या छावणीपाशी आलो. तिथे सर्व वस्तू काढून ठेवायला सांगितल्या. एक बिल्ला मिळाला. सायकलरिक्षा बाजूला थांबली. आसपास मुसलमान मोहल्ला होता. जवळच एका स्तंभावर पोलिसहल्ल्यात शहीद झालेल्यांची नावे होती. वातावरण इतकं विचित्र, घुसमटणारं वाटलं मला. लांबून तीन मजली उंच तारेचे कुंपण, वॉच टॉवर्स, सशस्त्र जवान, ऑफिसर्स...

- समन्वयला घेऊन मी इतर यात्री व गुरुनाथच्या स्टाफबरोबर निघाले. पुरुषांची रांग वेगळी, स्त्रियांची वेगळी. कशाला . तपासणीसाठी...एका तंबूत स्त्री जवानांकडून तपासणी झाली. माझ्य़ा गळ्यात ती तपासायला लागली. मी तुळशीच्या माळेत गुंफलेलं रामाचं लॉकेट काढून तिला दाखवलं. तिनं त्याला नमस्कार केला. माझ्या डोळ्यांत पाणी आलं. "ये सब क्यूं? हम हमारेही रामजीका दर्शन क्यों नहीं कर सकते?" असं मी तिला गहिवरुन विचारलं.
- तिनं सांगितलं गेले १०-१२ वर्ष इथं २००० आर्मी जवान रात्रंदिवस तैनात असतात. सतत प्रकाशझोत (सर्चलाईट), दुर्बिणी, गस्त, आरोळ्य़ा, वायरलेसवर वार्ता-सूचना असं चालू आहे. कारण इथे पुन्हापुन्हा बाबरी मशीद पाडण्याचे प्रयत्न केले जातात. मोर्चे निघतात. दंगली होतात. यावर सरकार प्रचंड पैसा खर्च गेले कित्येक वर्षे करीत आहे....देशाच्याच विशिष्ट नागरिकांविरुध्द.
- अशाच तपासण्या वारंवार झाल्या. वाटेच्या चिंचोळ्या रस्त्याला दोन्ही बाजूंनी तारेचे उंच कुंपण होते. त्यातून माकडे येतजात होती, लोकांना ती गुरकावत होती. मी रामनामाचा सपाटा लावलाच होता ..घाबरून

- हा सगळा भाग माकडांनी व्यापलेला आहे. इथे प्रचंड गवत-झाडी झाली आहे. मुळची राममूर्ती इथे नाही. त्याजागी एक छोटी रामलल्लाची मूर्ती आहे. तिची पूजा करायला एक पुजारी येतो. बाकी देशभरातून रोज खूप संख्येने यात्रेकरु येतात. त्या सर्वांना या तपासणीतून जावे लागते.
- अखेर मी त्या सर्व बाजूंनी तरटाचे पडदे लावून आड केलेल्या अर्धवत पडलेल्या मशिदीतल्या छोट्याशा रामलल्लाचे दर्शन घेतले. जवळची फुलं मी लांबूनच वाहिली.

हात जोडून मी त्याला म्हटलं,"तुझ्यासाठी रे मी इतके हजारो मैल लांब आले. खूप बरं वाटलं तुला पाहून. तुझं दर्शन तू खूपच अवघड करून ठेवलं आहेस. आम्ही कलियुगातली पापी माणसं जे काही चाळे करतो आहे ते पाहून तुझ्यासारख्या निर्लेप-गंभीर-कर्तव्यकठोर देवालाही हसू येत असेल."
- बाजूलाच सुंदर कोरलेले जुन्या राममंदिराचे स्तंभ पडले होते. अजून कोणते पुरावे पाहिजे आहेत?
- आमच्या पैकी एकजण आर्मी ऑफिसर्सना म्हणाला की,"धन्यवाद तुम्ही इथे रामाचं रक्षण करता आहात." त्यावर तो जे म्हणाला ते खरच चिंतन करण्याजोगं आहे (जे मला अडीच-तीन वर्षांनी आठवतय) - "रामजी तो परमात्मा हैं। वे हमारी रक्षा करते हैं। हम तो खाली हमारी ड्युटी करते हैं।"
- लांबवरचा वळसा घालून आम्ही थोडं बाहेर आलो. तिथं बाबरी मशिदीवरचा हल्ला, अयोध्येतील धार्मिक स्थलं इ. VCD होत्या. त्या मी घेतल्या.
- नवीन राममंदिराच्या निर्मितीसाठी घडवण्यात येणारे स्तंभही मी पाहिले. कारसेवक पाहिले. सर्व पाहून मी या सर्व यंत्रणेला हलवायला किती असहाय्य आहे याची जाणीव मला झाली. मोठेमोठे राजकारणी, धार्मिक नेते काही करु शकत नाहीत. मी काय करणार आहे?
- हुश्श करून मी पाणी प्यायले. सर्व यात्री एकत्र आल्याचे गुरुनाथच्या स्टाफने चेक केले.
----------
कनकमहाल
- मग मी व समन्वय सायकलरिक्षात व बाकीचे पायी असे निघालो.
कनकमहाल पाहिला.

याची निर्मिती राजा विक्रमादित्याने केली आहे. मुळचा महाल सीतेला कैकेयीने लग्नात भेट दिला होता. तेथील रामसीतेच्या मूर्ती फारच सुरेख आहेत.

सज्जनगडावर जसे रामदासी दिसतात तसे इथे रामदासी दिसतात. शुभ्र वस्त्रे, शांत चेहेरा, हातात जपमाळ...आपल्या आराध्यदैवतासारखेच पार्षदगण दिसतात असे मी भागवतपुराणात वाचले होते. त्याची मला आठवण झाली. रामलल्लापेक्षा वेगळे शांत पवित्र वातावरण इथे होते. आता कलती संध्य़ाकाळ झाली होती.
--------------------
हनुमानगढ
- तेथून आम्ही हनुमानगडाला निघालो. उजेड जवळजवळ नव्हताच.

गडाच्या पायथ्याशी मी लांबलचक फुलांचा हार व पेढे घेतले घेतले. पेढे समन्वयपाशी दिले. मी हार घेतला. आम्ही पायर्‍या चढायला लागलो. तेवढ्यात एक भलेमोठे वानर आले, त्याने माझ्या हातातला हार हिसकून घेतला व खायला सुरुवात केली. मी पुन्हा खाली गेले एक छोटा हार घेतला व तो ओढणीत लपवला. रामनामाचा धोषा लावला, वानरांची नजरानजर न होऊ देता मी व समन्वय वर देवळात पोचलो.
- देवळातील सभागृहात तुलसीरामायणाचे वाचन चालले होते

- गर्भगृहात श्रीहनुमानाची प्रचंड शेंदूरचर्चित सुंदर मूर्ती सिंहासनाधिस्थ आहे. येथे श्रीरामरायाने महानिर्वाणाच्या वेळी शरयू नदीमध्ये सर्वांना आपल्याबरोबर घेऊन जाताना मागे, श्रीहनुमान या पट्टशिष्यभक्ताला अभिषेक करुन चिरंजीवपद दिले व सांगितले की "रोज जोपर्यंत या पृथ्वीवर रामकथा सांगितली जाईल तोपर्यंत तू राहशील व या अयोध्येचे राज्य करशील."
- मी हात जोडले आणि स्तुती करुन मारुतिरायाला प्रार्थना केली की," तुझासारखा तूच! तुझ्या भक्तीची सर कोणालाच नाही. तुझेच अंशावतार श्रीरामदासस्वामी व आमचे महाराज होते. माझ्या हृदयात थोडीतरी रामाची भक्ती येऊ दे. तुझी कृपा होईल तर ते सुध्दा होणे अशक्य नाही. तुझे लक्ष माझ्या साधनेवर असू देत. तू बोलावल्यामुळे मी इतक्या दूर आले बघ आणि तुझे इतके छान दर्शन झाले. फारफार समाधान झाले बघ..."
- समन्वयला घेऊन मी खाली आले. इतर यात्री पायी व आम्ही दोघे सायकलरिक्षात असे आमच्या बसपाशी आलो. आता मात्र रात्र झाली होती.
--------------------
फैजाबाद
- बस लांबवर अंतर काटून एका मोठ्य़ा हॉटेलसमोर थांबली. इथे येऊन आम्ही एका रात्रीसाठी दाखल झालो. फ़ैजाबाद अयोध्येपेक्षा वेगळेच वाटले. अधिक संपन्न, आधुनिक स्वच्छ वाटले. देवाची लीला! इथे सर्वांची रात्रीची जेवणे झाली. पहाटेच आवरुन चहापाणी करुन निघायचे होते. तेव्हा बॅगा आवरून ठेवल्या.
----------------------
शरयूनदी, श्रीकाळेराममंदिर..
- सकाळी नाश्ता झाल्यावर आम्ही हॉटेल सोडले व बसमध्ये बसलो. बस आता जुन्या अयोध्येच्या वाटेला लागली. शरयू नदी दिसल्यावर मला तिच्या संबंधित रामायण आठवले. तिच्या काठी कितीतरी सुंदर बांधलेले घाट आहेत.

आमची बस एका कडेला थांबवली गेली. शरयूत ज्यांना स्नान करायचे होते, त्यांनी बदलायचे कपडे, पंचा इ घेतले. आम्ही शरयूची ओटी भरण्याचे सामान घेतले. समन्वयचे पोट दुखू लागल्याने शरयू नदीच्या पवित्र जलाचे त्याच्यावर फक्त सिंचन केले व त्याला आडोशाला एका चारपायीवर बसवले. मी पुढे जाऊन तेथील उपाध्यायाकडून संकल्प सोडून माईची पूजा केली, जलदुग्धाभिषेक केला. ओटी भरली. तेथील शिवलिंगाची पूजा केली. बाकीच्या काही महिला व पुरुषांनी बरंच आत जाऊन डुबक्या मारल्या, मनसोक्त पोहून घेतलं. घाटावर गाई, बैल, कुत्री इ ची येजा होतीच. गावातले बरेच भाविक हातात तांब्याचे कलश घेऊन स्नान करून, त्या कलशात माईचे पाणी, दूध व बेलपान घेऊन कोठे जाताना दिसले. काही भाविक आपल्या पितरांचे तर्पण करीत होते.
------------------------------------
त्या उपाध्यायांनी सांगितले की जेव्हा प्रयागराज पापी माणसांचं पाप धुवून मलिन होतो तेव्हा तो शरयूत शुध्दीसाठी येतो.
या शरयूत श्रीरामाबरोबर लाखो भक्तांनी, एवढेच नव्हेतर पशू-पक्षी-अयोध्येची माती यांनीही मोक्ष मिळवला.
श्रीरामदासस्वामी येथे कितीतरी काळ राहिले होते.महाराजांची मातोश्री येथेच निवर्तली. येथेच महाराजांनी तिचे दिवस केले. खूप दाने दिली.
शरयूचा उगम हिमालयात होतो. तो भाग आता चीनमध्ये गेला आहे. ही नदी पुढे बिहारमध्ये गंगेला मिळते. तिचे पाणी घरी आणावेसे वाटले पण ते टिकत नाही म्हणून मी आणले नाही.
-----------------------------------------------------
गुरुनाथच्या स्टाफने आता सर्वांना एकत्र केले व आपल्याला लवकुशांनी स्थापिलेल्या महादेवाचे देऊळ व काळेराममंदिर बघायचे आहे म्हणून सांगितले.

आम्ही शरयूवरचा पूल क्रॉस केला. गावातील रस्त्यावर अनेक साधू दिसत होते. वाटेतल्या भाविकांच्या गर्दीशी जुळवून घेत महादेवाच्या मंदिरापाशी आलो. तेथे आपल्या रुईसारख्या दिसणार्‍या हिमालयात व पायथ्याशी सहज असणार्‍या पौराणिक संदर्भ असलेल्या मंदार फुलांच्या माळा व बेल घेतला. इथे शिस्त नव्हतीच. वाटेत माकडे, सांड होतेच.

ढकलाढकलीला तोंड देत समन्वयचा हात धरून मी इतरांबरोबर गाभार्‍यात आले.
इथेही शिस्त नव्हतीच. रेटारेटी चालू होती. मला दर्शन कसे मिळणार? मला महादेवाची पूजा कशी करायला मिळणार असे वाटत असताना पुजार्‍यांचे समन्वयकडे लक्ष गेले त्यांनी बाकीच्यांना बाजूला सारले. समन्वयला पुढे बोलावले, त्याच्या गळ्यात महादेवावरचा हार घातला, त्याला प्रसाद दिला. माझ्याकडून पूजा स्वीकारली. मी प्रसन्न मनाने समन्वयला घेऊन बाहेर आले.

आता आम्ही काळेराममंदिराकडे निघालो. एका छोट्या बोळातून गेल्यावर मंदिर लागले. आत गेल्यावर एकदम कोकणात आल्यासारखे वाटले. मराठी बोलणारी माणसं, अनेक रामदासी, माजघरातील काळी फरसबंदी, गाईच्या शेणाचा वास आहाहा!

सर्वजण सतरंजीवर बसले. थोड्या वेळाने तेथील व्यवस्थापक आले. त्यांनी तेथील मंदिराची, त्यांच्या कार्याची माहिती हिंदीमिश्रित मराठीत सांगितली. राजा विक्रमादित्याच्या स्वप्नात श्रीरामराय आले व म्हणाले की मला शरयू नदीतून वर काढ व माझी स्थापना कर. ही मूर्ती परकीय आक्रमणामुळे त्यावेळच्या पुजार्‍यांनी नदीत सोडली होती. त्याप्रमाणे राजाने केले. पुन्हा जेव्हा परकीय आक्रमणे होऊ लागली तेव्हा गेल्या काही शतकामध्ये ही मूर्ती दडवून ठेवण्यात आली व तिचे घरगुती पातळीवर पूजन अर्चन सुरु झाले.
त्यामुळे त्यांचे म्हणणे असे की सध्याची रामलल्लाची मूर्ती ही आधुनिक आहे. मुळची मूर्ती ही आहे. त्यांच्या घरगुती मंदिरात जी मूर्ती आहे ती रामपंचायतन आहे (श्रीराम-सीता-लक्ष्मण-भरत-शत्रुघ्न). मूर्ती लहान पण अतिशय गोड आहेत.

श्रीरामासमोरचे श्रीहनुमान स्त्रीवेषातील आहेत. त्याची कथा लंकेतल्या युध्दाच्या वेळी मारुतिरायाने ज्या देवीचे रुप घेतले होते व रामराय व लक्ष्मणाला सोडवले त्यावेळची आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अशी एकमेव मूर्ती आहे.

मग त्यांनी विविध प्रकारे केल्या जात असलेल्या पूजांचे प्रकार सांगितले. प्रत्येकाला हवे ते निवडायचे स्वातंत्र होते. मला येथील विशेष प्रकारच्या पूजेची कल्पना एका ज्येष्ठ स्नेह्यांनी दिली होती. त्याप्रमाणे मी तयारी करून गेले होते. शिवाय तेथून सुवर्णतुलसीपत्र घेतले, नाव व गोत्र सांगितले. सशुल्क आजीव सेवकत्व घेतले.
पूजेच्या प्रकाराप्रमाणे गट करून त्याप्रमाणे एकेकाला बोलावून संकल्पासहित पूजा तेथील गुरुजींनी करवल्या.
श्रीमारूतिरायांचीही पूजा मी केली.
मग इतराचं होईपर्यंत मी व समन्वय श्रीरामपंचायतनाच्या गर्भगृहातील मारुतिरायांच्या मागे भिंतीला टेकून बसलो. मी तिथे थोडा जप केला. आणि रामरायाच्या मुखाकडे टक लावून बघत त्यांच्याशी संवाद करु लागले. डोळ्यातून पाणी वाहू लागले. लक्षावधी वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या मोक्षपुरीत रामरायांच्या सन्निध्यात मी आहे, यात मला महाराजांची व रामरायाची कृपाच दिसली. समन्वयचे दर्शन झाल्यानेही मला बरे वाटले.
तिथेच १३ कोटी जप लिहिलेल्या ग्रंथांची पूजा होते. काहींनी त्यांचे दर्शन घेतले. मला मात्र रामरायाचे मुख सोडून काही गोड वाटेना.
व्यवस्थापकांनी नंतर मला बोलावून माझा नावपत्ता घेतला. चैत्रातील श्रीरामनवरात्रात चालणार्‍या उत्सवाचे पत्रक दिले. काही फोटो दिले. जे मी स्कॅन करून इथे दिले आहेत. त्यांनी माझ्या रामसेवेची चौकशी केली तेव्हा त्यांना मी माझ्या सद्‌गुरुंचे नाव सांगितले. त्यावर ते म्हणाले की महाराज इथे अनेकवेळेला आले होते. त्यांनी इथे या वास्तूत राहून चातुर्मास केले होते. मला इतकं भरुन आलं - तरीच इथलं वातावरण वेगळं आहे - त्यांची चरणधुलि इथे आहे.
मी म्हणाले की, "मला इथे आजोळी आल्यासारखं वाटतंय". त्यावर ते म्हणाले की, "तुम्हाला इथे येऊन चातुर्मास करायला हरकत नाही". रामभूमीत रामनामसेवा करणं म्हणजे केवढी पर्वणी!
मोठ्या कष्टाने मी तेथून उठले. आता आम्हाला अयोध्या सोडायचे होते व काशीला जायचे होते. २४ ताससुध्दा आम्ही अयोध्येत नव्हतो.
असं वाटलं पुन्हा एकदा निवांत येऊन इथे राहावं.
----------------------------------------------------------
अयोध्येतील अधिक माहितीसाठी
http://faizabad.nic.in/pages/Ayodhya%20-%20Sugriva%20Kila_jpg.htm

॥श्रीराम समर्थ॥