धार्मिक यात्रा करण्यामागील माझा हेतू

१९९५ ते २००० पर्यंत मी निसर्गनिरीक्षणासाठी जंगलातून, पाणवठ्यांवर फिरत होते. निसर्गातली परमेश्वरी माया बघत होते. सन २००४ मे पासून मार्च २००६ पर्यंत मी गुरुशोधासाठी फिरत होते. माझ्या धार्मिक यात्रा मी महाराजांचा अनुग्रह घेतल्यावर त्यांच्या कृपेनेच सुरु झाल्या.

एप्रिल २००६ पासून ऑक्टोबर २०१० पर्यंत चार वर्षे मी महाराज मला नेतील तिकडे झपाटल्यासारखी जात राहिले. येहळेगावला श्रीतुकामाईंचं दर्शन झालं, मराठवाड्यातील व पश्चिम विदर्भातील काही देवस्थानांची व संततीर्थांची दर्शने झाली, आणि मग मी विसावा घेतला. गेल्या १ वर्षात मी कोठेही गेलेली नाही.
-------------------------------------
आसपासचे लोक मला प्रश्न विचारतात -
- तुम्ही एवढ्या यात्रा का करता?
- त्यापेक्षा पर्यटन म्हणून भारतात, भारताबाहेर किती तरी बघण्याजोगं आहे, तिथे प्रवासनिवासाच्या उत्तम सोयी आहेत, शिवाय शॉपिंग करता येतं. तिथं का नाही तुम्ही जात?
- आडगावी, अस्वच्छ ठिकाणी, यात्रेला जाऊन गर्दीत जीव धोक्यात का घालता?
- तिथल्या नद्या प्रदूषित, तीर्थस्थानं गलिच्छ, पंडे लुबाडू, रस्ते खराब, अतिशय गर्दी, गरीब-श्रीमंत भेद, अतिरेक्यांच्या हल्ल्याची भीती, टोकाची आडगावं इथं जाऊन तुम्हाला काय मिळतं तुम्हाला?
----------------------------------------
अनुग्रहापूर्वी -
- हो! याच कारणासाठी मी ही यात्रा केल्या नव्हत्या.
- हो! मी ही अशीच नावे ठेवली होती.
- हो! मी ही नदीची पूजा, सुवासिनींच्या ओट्या भरणं, देवावर दुध-तूप-दही-मध ओतणं याची व इतर धार्मिक कर्मकांडांची निंदा केली होती.
- तरीही मला आतून देवस्थानांची ओढ होती. कमी गर्दीच्या निवांत वेळी मी आसपासच्या गावी जाऊन विशेषतः कोकणात देवदर्शन घेत असे. तिथे जाऊन मला खूप बरं वाटत असे.
- यशाच्या क्षणी मी देवळात जाऊन देवाबरोबर आनंद अनुभवला आहे.
- मला, माझ्या महत्वाकांक्षांना, प्रयत्नांना मर्यादा आहेत आणि "त्या"चीच इच्छा या जगात चालते हे मी वारंवार अनुभवले आहे.
---------------------------------------
मग मी यात्रांना का जाते?
- महाराज त्यांच्या ६८ वर्षांच्या आयुष्यातली वय १२ पासून ते शेवटपर्यंत (मधली काही वर्ष सोडता) यात्रेला जात असत.
- त्यांनी तीन वेळा पायी संपूर्ण भारत फिरून बघितला आहे.
- सर्व तीर्थस्थाने त्यांनी अनेकवार एकट्याने आणि नंतर भक्तमंडळींना बरोबर घेऊन पाहिली आहेत.
- त्यांची चरणधूलि या सर्व ठिकाणी आहे.
- त्यांची इच्छा, त्यांचा उत्साह, त्यांचा हेतू लक्षात घेऊन मी जिवाचा हिय्या करुन हौशीनं त्यांचं स्मरण करीत जाते.
-------------------------
माझी परिस्थिती -
- मी ४८ व्या वयानंतर यात्रा सुरु केल्या. माझं शरीर तकलादु आहे. बाहेरचं अन्नपाणी सोसत नाही, डासांचा त्रास होतो, गर्दीत जीव गुदमरतो, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरचे जिने चढताउतरताना धाप लागते, धुळीचा त्रास होतो. निघण्यापूर्वी यात्रा सुखरुप होईल ना याचं टेन्शन असतं.
- सासर-माहेरचे लोक, मैत्रिणी, नेहेमी बरोबर नसतात.
- बहुतांशी घरातली मी एकटीच जाते.
- कुलदेवतेचे आशीर्वाद घेऊन मी घर सोडते.
- माझ्याबरोबर माझे महाराज सतत असतात.
- गुरुनाथ ट्रॅव्हल्सचे लोक पुढे-मागे-डावीकडे-उजवीकडे देवदूतांसारखे असतात.
- इतर अनोळखी यात्रींची सोबत असते.
- तोंडात रामनाम असते.
- सर्व कुळाच्या वतीनं देवाचं दर्शन घेते, त्याची करुणा भाकते.
- महाराज जोपर्यंत सुचवत आहेत तोपर्यंत यात्रांना जायचं. "आता घरी बसून स्वस्थ नाम घे" म्हणले तर तसं करायचं
------------------------
या यात्रांमधून मला काय मिळतं?
- देवदर्शनाने अतिशय समाधान मिळतं
- उत्तम क्षेत्रोपाध्यायांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कृत्ये करुन फार बरं वाटतं.
- खूप थंडी, पाऊस, ऊन, वारा, कमी प्राणवायू असणारी हवा, अतिशय गर्मी, चढ-उतार, बोटीतले हेलकावे यांच्याशी जुळवून घेताना शरीराची कसोटी लागते.
- निवासाच्या जागा बदलणे, बॅगेत सामान भरणे, काढणे, पुन्हा भरणे, दर्शनाच्या-जेवणाच्या वेळा पाळणे यात मनाला शिस्त लागते.
- ट्रेन-बस-सायकलरिक्षा-रिक्षा-दंडी-कंडी अशा विविध प्रकारे शरीर इकडून तिकडे नेताना अनेक अनुभव येतात.
- तीर्थक्षेत्रांतले रहिवासी, इतर ठिकाणांहून तेथे आलेले यात्री, माझ्या बरोबरचे यात्री, रेल्वेतले यात्री, या सर्वांच्या भाषा-वर्तन-रुढी-चालीरीती-पेहराव-साधनापध्दती-श्रध्दा यांतून खूप शिकायला मिळतं.
- स्वतःला सांभाळून राहावं, इतरांना जमेल तशी मदत करावी हेही महाराज करवून घेतात.
- "मी कोणीतरी ग्रेट" हा नखरा-नाटकं कमी होतात.
- समजुतीनं घ्यायला, दम धरायला, धीर धरायला, श्रध्दा बळकट व्हायला या सगळ्या अनुभवांचा उपयोग होतो.
- अस्सल भारत कसा आहे, अस्सल भारतीय कसे आहेत, सनातन धर्म कसा आहे हे पुस्तक वाचून नाही समजणार. तो मोठ्या शहरांत-मॉलमध्ये-हॉटेलमध्ये-थिएटरमध्ये जसा आहे; त्यापेक्षा तो खेड्यापाड्यात, साध्यासुध्या लोकांत उदार-प्रेमळ-सोशिक-चतुर असा आहे हे समजते.
- तीर्थाच्या ठिकाणी सर्व प्रकार बघायला मिळतात. चांगल्यावाईटाची सर्व प्रकारची सरमिसळ बघायला मिळते.
- आत्ता या ठिकाणी "मी नेमकं काय करायचं?" याचा निर्णय होतो. आपल्यामधले सत्व-रज-तम उघड उघड आरशात दिसतात.

  • सत्वाचा अभिमान
  • रजाची लोकेषणा
  • तमाचा द्वेष-मत्सर-राग-लोभ-आळस-मोह

यांचे आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये दर्शन होते.
- घरात होत नाही इतके नामस्मरण यात्रेत होते.
- देवाच्या कृपेचा अनुभव ठायीठायी येतो.
- "त्याने बोलावले व त्याची इच्छा असेल तरच त्याचे दर्शन होते" ते सत्य आहे.
- ज्याचा जसा भाव असेल तसे त्याला अनुभव येतात.
- प्राथमिक पातळीवरच्या साधकामध्ये अनुसंधान मुरण्यासाठी यात्रा हा उत्तम पर्याय आहे.
- सर्वात महत्वाचं म्हणजे देव एका मूर्तीत नाही तर सर्व ठिकाणी भरुन राहिला आहे, सर्वांच्या अंतरात्म्यामध्ये आहे याची प्रचीती यात्रेत निश्चित येते.

॥श्रीराम समर्थ॥