हरिद्वार/हरद्वार

मोक्षपुर्‍यांचे माझे अनुभव
------------
१) हरिद्वार/हरद्वार
- फारफार वर्षांपासून इथे जाण्याची माझी इच्छा होती. सन २००६ मध्ये उन्हाळ्यात गुरुनाथ ट्रॅव्हल्सबरोबर मी जेव्हा दोन धाम (हिमालयातले) यात्रा केली, जी माझी पहिलीच यात्रा होती, तेव्हा जातायेता हरिद्वारला दोन वेळा मुक्काम करण्याचा योग आला.

- दिल्लीहून इथे यायलाच संध्याकाळ झाली. उन्हाळा असल्याने उजेड होता. पुढे श्रीकेदारनाथाकडे जाय़चं असल्याने ते विचार डोक्यात होते. त्या दृष्टीने तयारी करायची होती. शिवाय़ मनसादेवीचे दर्शन हा टूरमधला भाग होताच.
---------------
- हा सर्वकाळ गंगादशहराचे दिवस होते. वैशाखातील १० दिवस गंगेची पूजा करण्याचा हा पर्वकाल होता.

medium_haridwar-gangaaarti.jpg

medium_aarti sky view.jpg

त्या दिवशी संध्याकाळी गंगेची आरती पाहून फार समाधान झाले होते. समोर आरतीच्या उजेडात चमकणारे उसळत्या वेगाने वाहत जाणारे भलेमोठे गंगेचे पाणी, गुरुजींचे आरतीचे स्वर, दोन्ही तीरांवरून भलीमोठी आरतीची दीपमाला पालविणारे सेवक.. प्राचीन काळाचा प्रत्यय देणारा एक वेगळाच अनुभव होता तो.... अष्टसात्विक भाव मनी दाटले होते.
-----------------
- दोन धाम करून आल्यावर दिल्लीला जाण्यापूर्वी मात्र दुपारचा व संध्याकाळचा बराच काळ मोकळा होता. दशेहराचा शेवटचा दिवस होता. गावात मिरवणुका होत्या. गर्दी होती. मात्र रामघाटावर तेवढी गर्दी नव्हती. तिथे स्त्रियांसाठी वेगळी सोय आहे. जाताना मग घेऊन गेलो होतो. नदीच्या पाण्याला प्रचंड ओढ असल्याने सर्व ठिकाणी साखळ्या लावलेल्या आहेत. शिवाय गंगेचे पाणी मे महिन्यात सुध्दा खूप थंड होते.

medium_flower offering.jpg

त्या दिवशी गंगेच्या पाण्याने काठावर स्नान करणे, गंगेची यथासांग पूजा करणे, ओटी भरणे, आरती व्यवस्थित बघणे असे करता आले. गंगेच्या पाण्य़ाने स्नान करुन मला खूप पवित्र झाल्यासारखे वाटले त्यादिवशी. तुपाचा दिवा लावलेली फुलाची परडी गंगेला अर्पण करताना जे काही वाटले ते शब्दात सांगणे अवघड आहे.
------------
गंगेचं पवित्र पाणी भरून घ्यायला मोठा प्लॅस्टिकचा कॅन बरोबर नेला होता पण त्यात पाणी भरुन घेणार कसं? तेवढ्यात एका साधूने गंगेत स्नान करताकरता किनार्‍याशी येऊन हात पुढे केला, तो कॅन त्याने घेतला, गंगेच्या मध्यावर तो गेला, तिथले स्वच्छ पाणी त्याने कॅनमध्ये भरले आणि मला परत आणून दिले आणि निशब्दपणे परत गंगेत स्नान करायला गेला. केवढी परमेश्वराची कृपा!
--------------------
अक्षरशः असं वाटलं की इथच राहायला काय हरकत आहे? पहाटे उठून गंगेवर यायचं, स्नान करायचं, काठावर बसून ध्यान करायचं, दुपारी भिक्षा मागायची, दिवसभर गंगेकडे बघत रामनाम घ्यायचं, रोज संध्याकाळी आरती बघायची, गंगेकडे बघत झोपायचं. नामस्मरण सुरुच ठेवायचं. मृत्यू जवळ आला की गंगेत रामनाम घेत शरीर लोटून द्यायचं.
असं प्रत्यक्ष जगणार्‍या आसपासच्या साधूंचा मला हेवा वाटला.
----------------------
नंतर मला कळलं की काही साधू आयुष्यभर गंगापरिक्रमा करीत राहतात. म्हणजे गढवालमधल्या गोमुखापासून गंगेच्या एका किनार्‍यानं पायी चालणं सुरु करायचं, त्याच काठानं जातजात बंगालमधल्या श्रीगंगासागराला यायचं. स्नान करून दुसर्‍या तीराने परतीचा प्रवास करीत गोमुखापर्यंत जायचं.
असे परिक्रमावासी देव ठेवेल तसं राहातात. जवळ पैसा बाळगत नाहीत. पैशाला स्पर्शही करीत नाहीत. दुपारी भिक्षा मागून गंगेला नैवेद्य दाखवून जेवतात. रात्री मुक्काम करतात. त्यांचाही मला हेवा वाटला.
-------------
या जन्मात मला प्रपंच असल्याने, व कर्तव्ये असल्याने असे काही करणे अव्यवहार्य आहे, हे मला मी पटवले व जड अंतःकरणाने परतीच्या वाटेला लागले.

॥श्रीराम समर्थ॥