विविध कर्मकांडांविषयीचे अनुभव

विविध कर्मकांडांविषयी मला आलेले अनुभव -
--------------------
- कर्म, कार्य, कर्मकांडं याविषयी जाणून घेणं, त्यांचा संदर्भ निर्णयसिंधू, धर्मसिंधू यामध्ये पाहणं, आमच्या कुलोपाध्यायांशी बोलणं, स्वतः करताना ते समजून घेऊन श्रध्दापूर्वक करणे, कसा अनुभव येतो ते पाहणं

हे मी २००४ पासून करते आहे.
- सुरुवातीला चुकांचं टेन्शन, खर्चाचा ताण, साहित्य जमवताना होणारी धावपळ, कुटुंबीयांचे सहकार्य मिळवताना होणारी कसरत या कसोट्यांतून मी गेले.
मात्र अतिशय वेगळ्या प्रकारचं समाधान, शांति, कृतकृत्यता मला बराच काळ अनुभवायला मिळायची.
- मग मला यात रमायलाच आवडायला लागलं.
- त्यानिमित्तानं होणारं देवाचं चिंतन, सद्‌गुरुचं साहचर्य याची मला चटक लागली.
हे मी करते या म्हणण्याला काही वावच नव्हता - नसतो.
- ही महाराजांची इच्छा आहे असंच मला वाटत राहतं.
- काही करण्यापूर्वी, करताना, झाल्यावर नामस्मरण चालूच असतं. त्यामुळे माझं आराध्यदैवत श्रीरामरायानं जशी सर्व कर्म कर्तव्यभावनेनं केली तसंच सर्व शास्त्रविहीत कर्म कर्तव्यभावनेनं व परमात्म्याच्या स्मरणात करण्याची म्हणजेच भगवद्गीतेतला कर्मयोग आचरण्याची संधी आहे असंच मला वाटत गेलं.
- कर्म कुणालाही चुकलेलं नाही.
- मी कर्ता या भूमिकेतून केलं तर त्याचे फल पाप-पुण्य़ानुसार बरेवाईट मिळणार आणि स्वर्ग-नरक-पृथ्वी यातल्या फेर्‍या चालू राहणार.
- त्यापेक्षा हे करणे देवाला आवडते असे समजून त्याच्या स्मरणात केले, तो बघतोय, ऐकतोय अशा भावनेने केले तर ते उत्तम होते आणि आपोआपच ते त्याला अर्पण होते. त्यामुळे त्याच्या फलाचे बंधन मला लागत नाही.
किती छान!
- या धार्मिक कर्मकांडांना उगीचच नावे ठेवणार्‍या, टाळणार्‍या, सबबी सांघणार्‍या, पटतय पण पुरेशी हिंमत नसणार्‍या लोकांपासून मी लांब होत गेले.
- कधीकधी न राहवून स्वतःचा वेळ खर्च करून मी त्यामागचं तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करते.
- पण तुमचा निर्णय - परमेश्वर बघून घेईल इ. बोलून माझ्या मार्गाने चालू लागते.
- आपल्यापाशी वेळ फार कमी आहे, आणि प्रत्येक क्षणाचा उपयोग परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी करायचाय या निश्चयाशी मी ठाम आहे.

॥श्रीराम समर्थ॥