सप्त पाताळ

सप्त पाताळ-
(संदर्भ - श्रीदेवी भागवत पुराण, पृष्ठ - ५१२ ते ५१८)

पृथ्वीच्या खाली सात विवरे आहेत.
सर्व ऋतूंमध्ये सुख देणारी अशी ती उत्तम विवरे आहेत. हे जणू स्वर्गच आहेत.
येथील लोक अत्यंत आनंदीत होऊन सुखाने विहार करीत असतात.

हे सर्वजण मायावी असून सर्व ऋतूंमध्ये निरनिराळी सुखे भोगतात. मयाने येथे उत्तमोत्तम नगरे निर्माण केली आहेत. सर्पमण्यांच्या प्रकाशामुळे येथे अंधार नाही. येथील प्राण्यांना शारीरिक व मानसिक पीडा कधीच उद्‌भवत नाहीत. त्यांन वार्धक्य नाही. ही विवरे सदा कल्याणरूपच आहेत.

१) अतल -
येथे मयाचा पुत्र बल याचे वास्तव्य आहे. त्याने ९६ माया निर्माण केल्या आहेत.
२) वितल -
येथे भगवान शंकर हाटकेश्वर नाव धारण करून आपल्या गणांसह व भवानीसह रहातात. प्रजापतीने निर्माण केलेल्या सृष्टीची वृध्दी करीत तो तिथेच असतो.
३) सुतल -
येथे बलीराजा नित्य वास्तव्य करीत असतो. भगवान त्रिविक्रमाने त्याला सर्व लक्ष्मी अर्पण केली आहे. बली येथे भगवंताची आराधना करतो. प्रत्यक्ष भगवान हरि त्याचा द्वाररक्षक आहे.
४) तलातल -
येथे महाबलाढ्य असूरश्रेष्ठ मय वास्तव्य करीत असतो. त्याच्यावर कल्याणकारी शंकराचा वरदहस्त आहे. तो मायावी राक्षसांना नित्य पूजनीय आहे.
५) महातल -
येथे सर्व सर्पांचा परिवार रहात असतो. सर्व सर्प सामर्थ्यसंपन्न व क्रूर आहेत.
६) रसातल -
येथे बलश्रेष्ठ व साहसी असुर राहातात.
७) पाताल -
येथे नागलोकांचे स्वामी व श्रेष्ठ नाग राहातात. हे अत्यंत रागीट, प्रचंड शरीराचे व अति विषारी आहेत.
या विवराच्या मूल प्रदेशात भगवानाची अनंत नावाची अतिशय तामसी कला आहे. हा सामर्थ्यसंपन्न, उदार, असंख्य गुणांचा साठाच आहे.

॥श्रीराम समर्थ॥