श्रीभावार्थ रामायण

श्रीभावार्थ रामायण
कवी - श्रीएकनाथमहाराज
-------------
महाराजांनी मला अनुग्रह देण्यापूर्वीच मी या ग्रंथाचे वाचन सुरु केले होते. माझे उपास्यदैवत प्रभू रामचंद्र यांच्याविषयी ज्यांनी ज्यांनी ग्रंथ लिहिले ते वाचण्याचा छंद मला लागला होता. हा प्रचंड ग्रंथ वाचायला मला १ वर्ष ६ महिने लागले.
यामध्ये भाषेतील सर्व रस मला भरभरून आढळले. नाथांची विनयी, नम्र, मर्यादशील भावशैली मला अतिशय भावली.
या ग्रंथातील काही ठळक मला आवडलेले नाथांचे निरुपण देत आहे.

या ग्रंथाची पार्श्वभूमी १६ वे शतक -
महाराष्ट्रातील जनतेवर त्यावेळी परकीय यावनी सत्तेचा वरवंटा फिरत होता. सर्वच जनता धार्मिक जुलूम, आर्थिक अन्याय, आणि नैतिक निलाजरेपण सोसून टाचा घासत होती.
श्रीएकनाथमहाराजांना त्यांच्या तीर्थाटनामध्ये असे दिसून आले की स्वधर्मीयांना सदाचरणाचा, सत्संस्कारांचा पत्ताच नव्हता. नाथांना अतिशय दुःख झाले.
ते विचार करु लागले की कोणता आदर्श, कोणाचा पराक्रम, कोणाचे चरित्र या जनतेला सांगून अस्मिता जागवता येईल?
ते देशविचार, देवसेवा आणि धर्मपालन यासाठीच अवतरले होते...त्यांना परमात्म्याने पाठवले होते. नाथांच्या या बेचैन अवस्थेत पंढरीच्या पांडुरंगाने त्यांना धनुर्धारी राजा रामचंद्राच्या रूपात दर्शन दिले आणि आज्ञा केली की ,"उठी, करी रामायण ।". या दृष्टांत-आज्ञेचा तपशील स्वतः नाथ देतात.
या ग्रंथात आजवर जनतेत परंपरेने आलेला श्रीरामाविषयीचा भक्तिभाव आणि श्रीरामाच्या अवताराचा अर्थ असे दोन्ही आले आहेत.
त्यातून महाराष्ट्राची जनजागृती, धर्मसंरक्षणवृत्ती आणि संतांनी केलेली लोकसेवा अधिक प्रकर्षाने वाढली.
नाथांचा हा शेवटचा ग्रंथ आहे.
हा वाल्मिकी रामायणावरील प्राकृत टीकाग्रंथ आहे.
यात ओवीसंख्या ४०,००० इतकी आहे.
हा वाचकाला भक्तिरसात तल्लीन करून सोडणारा ग्रंथ आहे.
यातील पहिले ४४ अध्याय स्वतः श्रीनाथांनी लिहिले
नंतरचे अध्याय त्यांच्या निर्वाणानंतर त्यांचे शिष्य गावबा यांनी लिहिले.
एकनाथमहाराज (शके १४५० ते १५२१ - एकूण ७१ वर्षे)
------------------------------

॥श्रीराम समर्थ॥