श्रीगंगासागर यात्रा

श्रीगंगासागर यात्रा
श्रीगंगासागर हे क्षेत्र कलकत्यापासून १४४ कि.मी. आहे. येथे गंगानदी अनेक मुखांनी पूर्वेला बंगालच्या उपसागराला मिळते.हा त्रिभुज प्रदेश १५० किलोमीटर्सचा आहे.मात्र जेथे हुगळी नदीचा जो भाग कपिल मुनीच्या आश्रमापाशी सागराला मिळतो त्या भागाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याने श्रीगंगासागर म्हणतात.

या पंचमुखांची नावे आहेत -

  • हुगळी
  • माटला
  • राममलंग
  • मालंच
  • धरिघाट

ऐतिहासिक पार्श्वभूमी -
१) या क्षेत्रात कपिल मुनींचा अश्रम होता. त्यांच्या शापाने ६०००० उन्मत्त सगरपुत्रांचे भस्म झाले होते. त्यांच्या वंशातील भगिरथ राजाने प्रचंड तप करुन श्रीगंगेला प्रसन्न करुन घेतले व २५० वर्षे तिच्या मार्गात कालवा खोदत तिला सागरापर्यंत जिथे त्याच्या पूर्वजांचे राखेचे ढीग होते तेथेपर्यंत तिला आणले. गंगामाईचे पाणी त्यांच्यावरुन गेल्यावर ते पूर्वज शापातून मुक्त झाले. तो दिवस होता मंकरसंक्रमणाचा.
तेव्हापासून गंगासागर क्षेत्र अतिपावन मानले जाते.

मकरसंक्रमणाच्या दिवशी गंगा नदीचं पाणी ओसरुन मध्ये वाळूचा भाग वर येतो. अतिप्राचीन कालापासून येथे दर वर्षी मकरसंक्रमणाच्या कालात साधारण १२ जानेवारीपासून १६ जानेवारीपर्यंत ५ लाखांहून अधिक संख्येने साधू-संत-भाविक यात्रेकरु येतात व श्रध्देने गंगास्नान करून पवित्र होतात.
स्त्रिया ओटी भरतात. तिळगूळ वाटतात. अनेकजण दाने देतात.
नदीच्या जराशा वरच्या बाजूला कपिल मुनींचा आश्रम नव्याने तयार करण्यात आलेला आहे.


२) वनवास काळात पांडव येथे आले होते. त्यांनी गंगास्नान, पितरांना पिंडदान (तर्पण), ध्यान, जप-तप येथे केले होते.


ही यात्रा अतिशय अवघड मानली जाते - कारण हा भाग अतिदुर्गम आहे. इतर यात्रा अनेकवेळा करणे त्यामानाने शक्य असते मात्र आसपासच्या भागातील काही यात्री सोडता, इतरजण पुन्हा जाणे टाळतात.
सब तीरथ बारबार, गंगासागर एक बार!
इतके या स्थानाचे महत्व आहे.
---------------------------------
माझा प्रत्यक्ष अनुभव -
मी नुकतीच श्रीगंगासागर यात्रेला जाऊन आले. ११ जानेवारी ते २३ जानेवारी २०१०.
हातीपायी धड, सर्व सामानासह सुखरूप, शिवाय एक वेगळ्याच प्रकारचा आनंद, समाधान, आत्मविश्वास, हुरुप हृदयात घेऊन. हे एक आश्चर्यच म्हणायला पाहिजे.
पार्श्वभूमी -
ऑगस्टमध्ये श्रावणात ओकारनाथ-महांकालेश्वराची यात्रा केल्यानंतर कधी एकदा १२ ज्योतिर्लिंग व चार दिशेचे चार धाम आपण पूर्ण करतोय असं मला झालं होतं.
सप्टेंबर २००९ पासून या श्रीगंगासागर-पुरी-श्रीशैल्यम्‌ यात्रेला जायचं या विचारानं मनात उचल खाल्ली होती.
खातापिता-उठताबसता-झोपेत मी एकच ध्यास घेतला होता...गंगासागर-श्रीजगन्नाथ, श्रीमल्लिकार्जुन
--------------
माझ्यापुढे २ पर्याय होते -
१) या तीनही राज्यातील देवस्थानं तीन वेगळ्या वेळी करणे
अ) पश्चिम बंगाल - कलकत्ता, श्रीगंगासागर
ब) ओरिसा - पुरी, कोणार्क, भुवनेश्वर
क) आंध्रप्रदेश - श्रीशैल्यम्‌, हैद्राबाद
२) हे सर्व एकत्र करणे.
पहिल्या पर्यायात निवांतपणा होता. सलग दिवस कमी होते. इतर ठिकाणंही पहाण्याची सोय होती.
मात्र तीन वेगळ्या वेळेला जायला नाही जमलं तर? शिवाय एकत्रित विचार केला तर यात्रेचे दिवस बरेच जास्त होते आणि एकत्रित खर्च बराच होणार होता आणि शिवाय मला इतर साईटसिईंग करायचं नव्हतं.

दुसर्‍या पर्यायात एकाच वेळी, कमी दिवसांत, कमी खर्चात माझं स्वप्न पूर्ण होणार होतं.
शेवटी मनाचा हिय्या करून मी सद्‌गुरुंचा कौल घेऊन दुसरा पर्याय निवडला. निर्णय बदलण्याचं मनात यायच्या आत गुरुनाथ ट्रॅव्हल्समध्ये ३ महिने आधी मी बुकिंग करून टाकलं.
------------------------
यात्रेतील आव्हानं -
सुरुवातीपासूनच मनात धास्तीच होती. एव्हढा प्रवास तोही ३ राज्यांचा, १२ दिवसांचा, ४ वेळा ट्रेन, बस, बोट इ नी रात्रीअपरात्री करायचा, भाषा न समजणार्‍या प्रांतांतून, त्यातून थंडीच्या दिवसांत. आपण हा निर्णय घेऊन चूक तर नाही केली असं मला सारखं वाटायचं. हद्द म्हणजे मी घरातून एकटीच नेहेमीप्रमाणे!
गुरुनाथकडून मिळालेला दिलासा -
यावर्षी १०० जण यात्रेकरू जमले आहेत, तीन बसगाड्या केल्या आहेत. ट्रेनमध्ये सर्व पर्यायात प्रवासी आहेत. शिवाय ६०% महिला आहेत त्यामुळे तुम्हाला सोबत मिळेल व मदत होईल असे मला ऑफिसमध्ये सांगितले गेले.
शिवाय १० जण स्टाफमेंबर्स आहेत ते सुखरूप नेऊन आणतील.
या प्रवासात चालावं लागतं पण स्वतःला कमीच कारण मागचे ढकलत असतात.
अशाप्रकारे माझा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न गुरुनाथच्या ऑफिसमध्ये आपुलकीने केला गेला. ही माझी ५ वर्षांतली ६ वी यात्रा.
मी या यात्रेला जाणार्‍या प्रवाशांची यादी पाहिली. कोणी ओळखीचं वाटेना. ओळखीच्या काहीजणींना बरोबर चलण्याविषयी बोलून पाहिलं पण ते काही जमलं नाही.
मला सतत प्रवासाची स्वप्नं पडत होती. मी इतरांना सोडून भलतीकडेच चाललेय, सामान मागे राहिलय इ.
त्यात व्यवसायाचे दैनंदिन ताण, अचानक आलेल्या पाहुण्यांची सरबराई, तब्येतीच्या तक्रारी यानं माझा जीव मेटाकुटीला आला होता.
देव/सद्‌गुरु आपली परीक्षा घेताहेत असंच मला वाटत राहिलं.
------------------------
प्रवासाची जय्यत तयारी -
शेवटी एकला चालो रे! साधू अकेला भला! इ. वचने मनात आणून मी मनानं प्रथम सक्षम होण्याचा प्रयत्न केला.
ही यात्रा ८-१० वर्षांपूर्वी केलेल्या एका ज्येष्ठ महिलेला भेटले. तिच्याकडून काही टीप्स घेतल्या. त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
प्रथम वजनाला हलक्या व चाके आणि ट्रॉली असलेल्या दोन सुटकेसेस घेतल्या.
किती व कशा प्रकारचे कपडे लागतील त्याची यादी केली.
काही शिवून घेतले, ते धुऊन इस्त्री करुन घेतले.
पूजेसाठी कायकाय लागेल याची यादी केली व त्यातील वस्तू जाऊन घेऊन आले.
पटकन सापडण्याच्या दृष्टीने प्रवासाच्या प्लॅनप्रमाणे कपडे भरले. पूजेचे साहित्य व त्यावेळी नेसायच्या साड्या, दानाच्या वस्तू एका बॅगेत भरले व इतर पंजाबी ड्रेस इ. दुसर्‍या बॅगेत भरले. वजनाला हलके पण गरम असे स्वेटर्स व वॉर्मर्स घेऊन आले.
कॅमेराची बॅटरी चार्ज करून ठेवली. त्यातील आधीचे फोटो काढून टाकले.
१००० पासून ते ५ रु. पर्यतच्या नोटा करून आणल्या. रेल्वेत सुटे लागतात, सायकलरिक्शाला सुटे लागतात. भिकार्‍यांना दानं द्यायला नाणी लागतात, पाण्याच्या बाटलीला सुटे लागतात. कुठे वेळ जायला नको, अडायला नको, कोणाला मागायला नको - या हेतूने ही तयारी करून, ते पैसे मी विभागून ठेवले.
बरोबर प्रवासात खाण्यासाठी काय घ्यायचं याचा विचार करून त्याप्रमाणे वस्तू तयार करवून घेतल्या. पटकन हुषारी मिळण्यासाठी थोडा सुका मेवा व लिमलेटच्या गोळ्या बरोबर घेतल्या.
मोबाईलमध्ये ५०० रूचा टॉकटाईम टाकून आणला.
कपडे वाळत घालायची प्लॅस्टिकची दोरी व ती गजाला बांधायला नाडी असे घेतले.
उन्हासाठी नंबरचा गॉगल घेतला.
प्रवासात लागणारी औषधे घेतली.
छोटे चायनीज टॉर्च घेतले. एका हॅंडबॅगेत नकाशा, पेन्स, रेल्वेची तिकीटे, त्यांच्या झेरॉक्स प्रती, निवडणूक ओळखपत्र इ घेतलं.
देवळात पर्स नेण्यापेक्षा जाकीटातून पैसे नेणे सोपे जाते या हिशेबाने उबदार जाकीट घेतले. त्यात मोबाईल, टॉर्च, पेन, रेल्वे तिकिटे मावली.
चालण्याचे बुट घेतले, स्लीपर्स घेतल्या. गुडनाईट मशीन घेतलं.
महत्वाचं म्हणजे जपाचं सामान घेतलं.
या कामात मला यजमानांचं व घरात मदत करणार्‍या सेवकाचं अतिशय सहकार्य झालं.
घरात तिकिटांच्या प्रती, हॉटेलचे पत्ते, प्रवासाचा आराखडा ठेवला.
ऑनलाईन पेशंटना एक आठवडा मी १३ दिवस नसल्याचं कळवलं.
जीमेलवर व्हेकेशन रिस्पॉन्डर टाकला.
मोजक्या लोकांना यात्रेची कल्पना दिली.
घरात वाणीसामान, भाज्या, फुले भरली.
माझ्या अनुपस्थितीत महाराजांच्या प्रतिमेची पूजा करायला आमच्या नेहेमीच्या पुजार्‍यांना सांगितलं.
संक्रान्तीची दाने वैदिक ब्राह्मणांना दिली.
घरातल्या देवासाठी व देवळातल्या महादेवासाठी तिळगूळ, हलव्याचे हार, स्नानाला तिळतेल आणून ठेवले.
-------------------------------
जायचा दिवस -
आता फक्त मी तास-मिनिटं मोजू लागले.
कुलदेवता श्रीयोगेश्वरीची ओटी घरी भरली. घरातल्या देवांचे व देवतुल्य सासूसासर्‍यांच्या प्रतिमेचे आशीर्वाद घेतले.
महाराजांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
सनातनने (माझ्या धाकट्या मुलाने) व त्याच्या मित्राने मला पुणे स्टेशनवर याय़ला सोबत केली. सामान उचलायला मदत केली. पार गाडी सुटण्याची वेळ होईपर्यंत दोघे थांबले. त्यांच्या आपुलकीची पावती मी दिली.
गुरुनाथने सर्व प्रवाशांचे चेकिंग केले. बॅगांना कंपनीच्या व आमच्या नावाचे टॅग्ज लावले.
गाडी वेळेवर संध्याकाळी ६=३० ला सुटली. मी हुश्श केले.
पुणे हावडा प्रवास ३४ तासांचा होता. मी जास्त करून जप करणं, नित्यपाठ म्हणणं, मौन, नामस्मरण यात वेळ घालवला.
बाकीच्या प्रवाशांशी कमीतकमी मोजका संवाद ठेवला. त्यांच्या चौकशांना प्रामाणिक उत्तरे दिली. मी होऊन कोणाच्या चौकशा केल्या नाहीत.
हावडा -
हावड्याला तिसर्‍या दिवशी पहाटे ४ ला ट्रेन पोचली. आयुष्यात प्रथमच प. बंगालमध्ये आले होते. इथल्या साधुसंत, स्वातंत्रसैनिक, कवी-साहित्यिकांविषयी लहानपणापासून खूप वाचलं होतं.
बाहेर बर्‍यापैकी थंडी होती. प्लॅटफॉर्मवर १०० जणांची शिरगणती, त्यांच्या सामानाचे व्यवस्थापन, चहापाणी, पुढच्या सूचना इ. कार्यक्रम होऊन स्टेशनबाहेर आम्ही आलो. माझ्या नशीबानं स्टेशनवर कोठेही जिने लागले नाहीत. स्टेशन खूप जुनं (१५०-२०० वर्षे) असूनही स्वच्छ व विस्तीर्ण दिसलं. दिव्यांचा भरपूर उजेड होता.
बाहेर आल्यावर बसपर्यंत जायला मोठी कसरत करायला लागली. वाटेत खूप गर्दी होती - खूप यात्रेकरू होते, जुन्या पिवळ्य़ा एंबेसेडर टॅक्सीज होत्या, बसेस होत्या, गंगेच्या स्तुतीपर गाणी लाऊडस्पीकरवर लावली होती. यात्रेकरूंसाठी सूचना दिल्या जात होत्या. हवेत धुळ होती. थंडीमुळे धुकं होतं
आता मात्र गंगासागर यात्रेला आल्यासारखं वाटायला लागलं.
बसने आम्ही हॉटेलवर आलो. सर्वांना रुमवाटप झालं. पुढच्या सूचना दिल्या. किल्ली घेऊन मी रुम गाठली. थोड्या वेळानं सामान आलं.
मी आवरून घेतलं, जप केला. नाष्त्यासाठी बोलावणं आलं. नाश्ता झाला. गंगासागरला जाण्याच्या सूचना मिळाल्या. त्याप्रमाणे वर येऊन तयारी केली.
गंगासागरला जायची तयारी -
- पाण्याची बाटली
- टॉर्च
- स्नानानंतर बदलायचे कपडे
- गरम स्वेटर, शाल
- स्लीपर्स
- थोडा खाऊ
- गंगेची ओटी (नारळ, फुले तिथे मिळतात)
- गुरुनाथ स्टाफचे फोन नं., हॉटेलचा पत्ता, रुट मॅप इ छापलेला कागद.
- थोडे पैसे
- मोबाईल फोन
- मुख्य मनाची तयारी.
--------------------------------------
जातानाचा प्रवास -
गावात गर्दी होती, कुंभमेळ्याचं वातावरण होतं.
वाहने भरधाव जात होती.
हरवूड पॉईंटपर्यंत बसचा प्रवास होता.
ट्रॅफिक जॅममुळं वेळ लागत होता. संध्याकाळी वाटेतील एका बर्‍या हॉटेलमध्ये चहा पिऊन सगळे ताजेतवाने झालो. बाथरूमची ही शेवटची बरी सोय असल्याने सर्वांनी नैसर्गिक क्रिया उरकून घेतल्या.
हवा थंड होती, धुकं होतं, पावसाळी हवा होती, जवळ अमावस्या, ग्रहण, संक्रांत आल्यानं वातावरण कुंद धुसर होतं. समुद्र पाहूनही मन प्रसन्न न होता उदास होत होतं.
रात्र पडली. गुरुनाथने जेवणाची पाकीटं दिली. सर्वांनी बसमध्ये पुरीभाजी खाऊन घेतली.
शेकडो वाहने इंच इंच लढवीत होती. हरवूड पॉईंट आला. तरी स्टीमरपर्यंत जायला मध्ये बरंच अंतर होतं कारण सिक्युरिटी. चालतचालत निघालो. पुढे गुरुनाथची पाटी घेऊन एकजण मागे एकजण मध्ये आम्ही अशी वरात निघाली. मजल दरमजल करीत जेटीपाशी आलो.
तिकिटं काढली गेली. माशांना खायला देण्याचे खाद्य विक्रेते विकत होते. ते घेतले.यात्रेकरूची गर्दी स्वयंसेवक सांभाळत होते. सर्व ठिकाणी राज्य सरकारने चोख व्यवस्था ठेवली होती. दिव्यांचा भरपूर उजेड होता. हरवलेल्या व्यक्तींची माहिती दिली जात होती. ती ऐकून मनात धस्स होत होतं. जुन्या सिनेमांत जुळे हरविण्याचे प्रसंग अशा मेळ्यातूनच दाखवले होते. तसे खरचं हरवाहरवीचे प्रसंग घडतात तर!.
१००० जणांचा जथ्था स्टीमरसाठी सोडला जात होता. डोक्यावर वळकटी घेतलेल्या आणि ढकलाढकली करणार्‍या, वेगाने घुसणार्‍या लोकांची चुणुक पाहाय़ला मिळाली.
अखेर आमची वर्णी लागली. जेटीवरून स्टीमरमध्ये चढले. स्टीमर चालू झाली. अनेकांनी माशांना खाऊ घातलं. माहितगार लोकांनी सांगितलं की ही खाडी आहे. गंगासागर पुष्कळ पुढे आहे. मी आपली पुड्या गंगेतल्या माशांसाठी राखून ठेवल्या.
पाऊण तासांचा तो वेगाने होणारा अंधारातला प्रवास लक्षात राहण्याजोगा होता.
आता स्टीमरमधून उतरलो.
कचूबेडिया -
गंगेच्या त्रिभुज प्रदेशातलं हे एक मोठं बेट आहे. सर्व ठिकाणी रेती आहे. एका बाजूला इतरजण येईपर्यंत आम्ही थांबलो. एकदा शिरगणती झाली. पुढच्या बसेस ठरवल्या गेल्या. आमची बस बाजूला थांबली..उद्याच्या परतीच्या प्रवासाकरीता.
या लोकल बसेस होत्या. इथं जोर लावून घुसायचं होतं. सर्व बायका व अपंग-वृध्द यांना पहिल्या बसमध्ये चढवलं. आमचा पुढचा प्रवास सुरु झाला.
बस थांबल्यावर आम्ही पुन्हा थांबलो. इतर यात्रेकरू येईपर्यंत विश्रांती घेतली. सर्वजण आल्यावर शिरगणती झाली. एका जोडीला एक नंबर दिला होता. त्याप्रमाणे नंबर पुकारला गेला की जय गंगामैया! अशी आरोळी द्यायची. मजा आली.
बसमध्ये बसल्याबर बस सुरु झाली की सर्व देवतांना जय करून निघण्य़ाची गुरुनाथची पध्दत मला खूप आवडते. आपण पर्यटनाला नाही तर यात्रेला आलो आहोत. देवाने बोलावलं म्हणून निघालोय. त्याची मर्जी असेल तर त्याचं दर्शन होईल.
आता गंगासागर जवळ होतं. सुंदरबनचा सगळ्यात दक्षिणेकडचा हा भाग होता. भातशेती, नारळ, केळी, पपई, मातीची घरे, हातपंप, भाज्या परसात लावलेल्या होत्या. घरापुढच्या नाल्यात मासे पकडायला जाळ्य़ा लावलेल्या होत्या. अशा असंख्य छोट्या वाड्या होत्या. मधल्या मैदानात अनेक यात्रेकरू शेकोटी करून तात्पुरत्या उभारलेल्या राहुट्यांमध्ये ब्लॅंकटं पाघरून झोपले होते.

गंगासागरकडे जाण्याच्या राजरस्त्यावर गर्दी असल्याने जवळच्या जंगलातल्या आडवळणाने जाण्याचा निर्णय झाला. त्या चढावरच्या उबडखाबड रस्त्यावरुन चालण्याची ताकद कोणामध्ये नव्हती. मग बंगला-हिंदीत घासाघीस करुन ठेले ठरवले गेले. ठेले मी पहिल्यांदाच पाहिले. हा ठेला म्हणजे हातगाडीला सायकल जोडली होती. बग्गीपेक्षा नक्कीच त्याचं वजन जास्त वाटलं. अशा त्या मागच्या हातगाडीवर आम्ही दाटीवाटीनने बसलो. पुढे लावलेल्या सायकलीला आता वाहक दामटू लागला. ही ठेलागाडी रात्रीची चढावर जास्त माणसं घेऊन जाणार्‍या वाहकाची मला कमाल वाटली. असा आमचा १८ ठेल्यांचा जथा निघाला. जाताना वाटेतल्या झुडुपांच्या काटेरी फांद्या आम्ही आडवाटेने आल्याचं सांगत होत्या. त्यांच्यापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो.

अखेर आम्हाला उतरायला सांगितलं. गंगासागर अजून जवळ आलं होतं. अजून जास्त पुढे न्यायला वाहक सिक्युरिटीमुळे तयार होईनात. मग काय? दोन्ही पायांना म्हटलं "चला, वाटेत विश्रांती झालीय आता कुरकुरायचं काम नाही." आम्ही सगळे चालू पडलो.

विस्तीर्ण पसरलेलं मोकळं मैदान लागलं. सर्व ठिकाणी भरपूर उजेड होता. वाटेत खूप राहुट्या लागल्या. हजारो यात्रेकरु त्यात रात्रीची झोप घेत होते. सतत लाऊडस्पीकरवर हरवलेल्यांना शोधणारे आणि स्वयंसेवक यांचे आवाहन ऐकू येत होते. एव्हांना हरवलेल्या माणसांची नावं आम्हाला पाठ व्हायला लागली होती.
हवेत गारवा होता. आता शेवटचा स्टॉप आला. एक सुलभ केंद्र दिसलं. सर्वांनी नैसर्गिक विधीसाठी धाव घेतली. खूप गर्दी बघून आम्ही आडोसा गाठला. मैदानावर टेकल्यावर किती बरं वाटलं. "गंगा कुठं आहे?" असं आशेने विचारल्यावर, "ती काय समोर?" असं म्हणून मोकळ्य़ा अंधाराकडे बोट दाखवलं गेलं. "आई ग! अजून चालायचं आहे". असं मी म्हणून मी उठले.

व्यवस्थापकांनी दोन गट केले गेले. एक गट विश्रांतीला थांबला यात वृध्द, अपंग, थकलेले होते. दुसरा गट कपिलमुनींचा आश्रम बघायला निघाला. मीही निघाले. मंदिर जरी आधुनिक असलं तरी ही जागा त्यांची आहे. असं म्हणतात की मूळ जागा केव्हाच समुद्रानं गिळलीय. पण कलियुगात काहीतरी चिन्हात्मक तयार करणं क्रमप्राप्त आहे. "हे काय इथून जवळच आहे असं म्हणताम्हणता बरंच चाललो. एका मोठ्या मंदिरासमोर उभे राहिलो. त्यांचे लांबून वर्णन ऐकले. नमस्कार केले. पण आमच्यापैकी काही उत्साही म्हणले की आम्हाला जवळून दर्शन हवे. संयोजक सांगत होते की आमचा २५-३० वर्षांचा अनभव आहे की इथून निघायला जर उशीर झाला तर आपण गर्दीत सापडू. या राहुट्यांमध्ये झोपलेली सर्व माणसं सूर्योदयाला उठतील आणि मग ही गर्दी होईल त्यापेक्षा आताच गंगास्नान करुन लवकर निघू. पण कोणी ऐकायच्या मनःस्थितीत नव्हतं..अनेक वाद झाले. संचालकांचा निरुपाय झाला.

मग मंदिराच्या पुढच्या गर्दीत कसंबसं घेतलेलं दर्शन आणि वळसा घालून परत येईपर्यंत माझी इतकी दमछाक झाली की चक्कर येते की काय असं वाटलं. पाय गळून गेले, घशाला कोरड पडली. महाराजांचा धावा केला. समोर इतक्या लांब एका देवळीत मारुतिराय प्रसन्न उभे होते. महाराज भेटल्यासारखं व ते दिलासा देत आहेत असं वाटलं. त्यांना मी म्हटलं," मी मूर्खपणा केला. कपिलमुनींना मी लांबून नमस्कार केला असता तरी चाललं असतं. पण एकटीनं एवढ्या गर्दीत कसं थांबायचं. चुकायची भीती वाटली, त्यामुळे उगीच वणवण केली मी स्वतःची. मला माफ करा."

इतकं थकलेलं असताना मी समुद्रस्नान कसं काय करणार? हवेत थंडी आहे, पाणीही थंड असेल...असं पुटपुटत मी तिथेच पूर्ण स्नान न करण्याचा निर्णय घेतला. अजून १२-१४ तास परतीचा प्रवास आहे. बरेच चालायचं आहे. शेवटपर्यंत शक्ती टिकवायचीय. आज तर पहिले तीर्थस्थान आपण पाहातोय. अजून १० दिवस बाकी आहेत. असं स्वतःशी मी बोलत होते. शिवाय मी मनाची समजूत काढली की आपलं काशीला गंगेत व प्रयागच्या त्रिवेणीत मनसोक्त स्नान झालंय. इथे पूर्ण स्नान न करणं हिताचं आहे.

मग मी उरलेला धीर व शक्ती गोळा केली. पाय लटपटत होते. मी त्यांना सॉरी म्हटलं. त्यांच्या ताकदीपेक्षा मी त्यांना जास्त कामाला लावलं होतं. एका टपरीतून महिलांनी ओटीसाठी नारळ व फुलं घेतली. माझी इच्छा असूनही मी नारळाचं ओझं घेतलं नाही. मी गंगामाईला म्हटलं की ,"जेवढं पुण्याहून तुझ्यासाठी प्रेमानं आणलंय तेवढं तुझ्यापर्यंत येऊन तुला अर्पण करण्याची ताकद मला दे." मी बाटलीतलं पाणी प्यायले.

मग आम्ही सगळेजण गंगामाईच्या दिशेने अंधारात चालू लागलो. हळुहळू अंधार वाढत गेला. दिव्यांचा उजेड मागं पडत गेला. ती पुळण खूपच मोठी वाटली मला. मग आमच्या व्यवस्थापकांनी १ नंबर मनोर्‍यापाशी सर्वांना आणलं व सांगितलं की," पुढं अंधार आहे. एकदा तुम्ही पाण्यात शिरलात की पुढं फक्त पाणी असेल. स्नान करून मागं आल्यावर तुम्हाला माणसांचा महासागर दिसेल आणि कुठं जायचं हे कळणार नाही. मग तुम्ही गोंधळून जाल. तेव्हा हा उंच असणारा १ नंबर मनोरा पहा. इथे आम्ही सगळे असू. तुम्ही सर्व परत येईपर्यंत आम्ही जाणार नाही. एकमेकांना धरून राहा. जोडीजोडीने जा." आम्हाला त्यांनी तिथे जोडे काढायला सांगितले. "बदलायचे कपडे, पूजेचं सामान फक्त घेऊन जा. बाकी सामान इथेच ठेवा." असं त्यांनी जाताना सांगितलं.

मग मी, कुलकर्णी जोडपे व एक गृहस्थ एकमेकांबरोबर गेलो. कितीही आत गेलं तरी अंधारात गंगामाईचं पाणी दिसेना. मागे वळून पाहिलं व एक नंबर कुठे आहे ते बघून ठेवलं. पुढं गेल्यावर ओली वाळू, चिखल लागला. काठाला अगदी कमी पाणी असलेलं व शांत आवाज न करणारं गंगामाईचं पात्र दिसलं. पुढे काहीच दिसत नव्हतं. आता आम्हाला एक चारपाई, तिला वांधलेलं गाईचं एक वासरू व एक त्या तीर्थाचा पंडा दिसला. त्यानं आम्हाला त्याची चारपाई कपडॆ ठेवायला दिली. संकल्प, दान इ. बोलू लागला. आम्ही म्हणलं आधी स्नान करु देत मग सर्व करू. त्यानं घाई केली नाही. आमच्या आधी आलेल्या यात्रेकरूंचं स्नान झालं. आम्हाला जागा मिळाली. कुलकर्णी बाई धीराच्या होत्या त्यांनी व्यवस्थित डुबकी मारून स्नान केलं, कपडे बदलले, मग यजमानांना घेऊन त्या पुन्हा पात्रात गेल्या माईची ओटी भरली.

गंगासागरात अखेर स्नान:
मी एका गृहस्थांना माझ्या पिशवीकडे लक्ष ठेवायला सांगितले. मी माझे दानाचे, पूजेचे साहित्य बाहेर चारपाईवर ठेवले. माईला नमस्कार करून मी तिच्या पात्रात पाय ठेवला. तिचे थंड पाणी हातात घेऊन नेत्रस्नान केले. माथ्यावर तिचे पाणी शिंपडले. सर्वांगावर तिचे पवित्र जल शिंपडले. आता पाणी वाढायला लागले. अंधारात क्षितिज दिसत नव्हते. पाणी वरवर येऊ लागले. पुळण वेगाने पाण्यात जाऊ लागली.
मी माघार घेतली. चारपाई पाण्यात बुडायला लागल्यावर त्या तीर्थोपाध्यायांनी ती उचलून मागे घेतली. पाणी आवाज न करता वाढू लागले. मला भीती वाटू लागली. पात्रात आत गेलेली मंडळी दिसत नव्हती. मी भरकन्‌ कपडे बदलले. पुन्हा उथळ पात्रात जाऊन माईची ओटी भरली. सौभाग्यवायनदान दिलं, तिळगूळ भरवला, तिच्यामधल्या माशांना खाणं दिलं. नमस्कार केला.
पाणी आता खूपच भराभर पुळणीत भरायला लागलं. त्या चारपाईवाल्या पंडाची पंचाईत होऊ लागली. त्या चारपाईला बांधलेल्या वासराची ओढाताण होऊ लागली. मग पाण्यात उभं असतानाच आम्ही त्याच्याकडून संकल्प दक्षिणादान इ. करवलं. वासराला स्पर्श केला. गंगेला मनोमन नमस्कार करून मी परत फिरले.

मी पिशवी घेऊन चालू लागले. पाण्य़ात गच्च चिखलात माझा पाय सटकू लागला. मी कुलकर्णीबाईंचा हात घट्ट धरला व कशीबशी बाहेर आले. अजूनही बाकीच्या बायका पात्राबाहेर आल्या नव्हत्या. पाण्यात त्या मनसोक्त खेळत होत्या. त्यांना कदाचित थंडी वाटत नव्हती. मी मात्र स्वेटर घालून कुडकुडत होते. दात न घासता गंगास्नान करताना मला अपराधी वाटलं होतं.

मग आम्ही लांब असलेला एक नंबर पाहिला व त्या दिशेने चालायला सुरुवात केली. अखेर आम्ही आमच्या व्यवस्थापकांपाशी आलो. बायकांचं हॅपी संक्रांत व तिळगुळाचं वाटप उत्साहानं चालू झालं. काहीनी लुटायला वस्तू आणल्या होत्या. त्या लुटणं, हसणं इ. चालू होतं. मी भोवतालच्या काही बायकांना हळदकुंकवाची फुलं व तिळगूळ दिला. सर्व व्यवस्थापकांना तिळगूळ देऊन वाकून नमस्कार केला. इथपर्यंत येईपर्यंत त्यांनी केलेली मेहेनत आठवली. अजून तेवढच परत जायचं होतं.

मी आतामात्र वाळूत बसकण मारली. लोक गरम चहा घेत होते. रात्रीचं जागरण व थकवा आल्याने मी टाळला. अजूनही गच्च अंधारच होता. क्षितिज दिसत नव्हतं. पाणी वाढायला लागल्यावर माझ्या मनात सुनामीची भीटी वाटली होती - अंधार-अमावस्या- ग्रहण-संक्रांत सर्वच एकत्र होतं. "खरतर गंगेत जीव जाणं भाग्याचं नाही का?" असं माझं एक मन म्हटलं होतं. दुसरं मन म्हणलं होतं," नाही मला जगन्नाथाचं व मल्लिकार्जुनाचं दर्शन घ्यायचय".

हरवले-सापडले -
तेवढ्यात रडारड आरडाओरडा ऐकू आला. आमच्या १०० यात्रेकरूंपैकी एका गृहस्थाची बायको हरवली होती. तो हवालदिल झाला होता. त्याचा चेहेरा भयानक भीतीनं ग्रस्त होता. तेवढ्यात एक बहाद्दर म्हणाला," मी वहिनींना बघून येतो." तोपर्यंत बाकीच्या बायकांनी त्या गृहस्थाची हेटाळणी करायला सुरुवात केली. त्यांच्यापैकी कोणीही पुन्हा अंधारात त्या बाईंना शोधायला गेलं नाही. कावळ्यांनी टोच्या माराव्यात तसं त्या बिचार्‍या पेन्शनर गृहस्थावर तोंडसुख घेत होत्या.

मी शांतपणे बघत होते. आता आमच्या व्यवस्थापकांनी सांगितलेल्या गोष्टी आथवू लागल्या. त्यांच्या सूचना किती अनमोल असतात हे कळलं. तेवढ्यात अजून एक बाई छाती बडवीत आपल्या माणसांच्या नावानं हाक मारत रडत जाताना दिसली. घरापासून इतकं लांब, अंधारात, माणसांच्या महासागरात आपल्या माणसांना शोधणं किती अवघड असतं हे खरच लक्षात आलं. तेवढ्यात तो माणूस हरवलेल्या बाईंना घेऊन आल्या. ती नवर्‍यावर भयानक चिडली होती. त्या दोघांना शांत केलं. नवर्‍याच्या डॊळ्यांत पाणी होतं - दिलासा, दुःख, मनस्ताप, अपराधी भाव सर्वच त्यात होतं.

परतीचा प्रवास:

॥श्रीराम समर्थ॥