नर्मदा परिक्रमा

नर्मदा परिक्रमा
[संदर्भ - नर्मदे हर हर नर्मदे (श्री सुहास लिमये), नर्मदे हर हर, साधनामस्त, नित्य निरंजन (श्री जगन्नाथ कुंटे)]

मध्यप्रदेशातील श्रीओंकारेश्वरापासून सुरुवात करायची. पश्चिमेला नर्मदेच्या दक्षिण तटाच्या कडेने जायचं, रेवासागर (नर्मदा जिथे अरबी समुद्राला मिळते ते नर्मदेचे मुख) नावेने ओलांडायचा, नर्मदेच्या उत्तर तीराजवळून पूर्वेकडे नर्मदेच्या उगमापर्यंत झारखंडातील अमरकंटकापर्यंत यायचं. तिथे वळसा घालून नर्मदेच्या दक्षिण तटाजवळून पश्चिमेला ओंकारेश्वरापर्यंत येऊन परिक्रमा पूर्ण करायची.
------------------------------
ही यात्रा अतिशय खडतर आहे.
ती पायी करावी लागते.
वाटेत नर्मदेचे पात्र ओलांडून चालत नाही.
ती चातुर्मासात करीत नाहीत.
त्यामुळे प्रथम थंडीचा कडाका आणि नंतर असह्य उन यांचा सामना करावा लागतो.
सदार्वतात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पध्दतीने ती करावी लागते.
परस्त्रीला माई म्हणजे नर्मदेचे रूप समजून तिच्याशी आदरयुक्त व्यवहार करणे आवश्यक असते.

रोज त्रिकाल नर्मदेची पूजा, स्नान, संध्यावंदन, नित्यपाठ, सतत ॥ॐ नर्मदे हर॥ या मंत्राचा जप व नामस्मरण अनिवार्य आहे.
अनवाणी चालणे अनिवार्य आहे पण तसे फारच थोडेजण करतात.
नर्मदेच्या कृपेनेच ही यात्रा पूर्ण होते.
ही करताना चित्तशुध्दी होणं, परमेश्वर कर्ता-भर्ता-रक्षणकर्ता हा भाव येणं, देहबुध्दीचा पगडा कमी होणं, पैसा-प्रतिष्ठा याची अनावश्यकता कळणं व त्याची मस्ती कमी होणं, आध्यात्मिक अनुभव येणं ही फले मिळतात.
---------------
बाकीचे लोक बसने पर्यटन करतात. त्यांना त्यांच्या जोगते अनुभव येतात.
श्रीमार्कंडेय ऋषी हे या परिक्रमेचे प्रणेते.
नर्मदामाईच्या दोन्ही तीरांवर रामायण-महाभारत यातील प्रसंगांची साक्ष असलेली मंदिरे आहेत.
तीरावरील स्थानिक लोक माईचे भक्त आहेत. त्यांच्या सेवेमुळेच भाविकांची ही परिक्रमा पूर्ण होऊ शकते.

॥श्रीराम समर्थ॥