अनुसंधान

अनुसंधान

- सकाळ उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत "महाराज" सोडून मला दुसरा ध्यासच नसतो.
- प्रत्येक गोष्ट त्यांना सांगून करायची सवय लागलीय
- काही मनाविरुध्द झालं तरी यात माझं काहीतरी कल्याणच महाराज करीत आहेत असं वाटतं. माझ्यातलं दोषदर्शन होतं - मीपणा, लौकिकाची सूक्ष्म आस लक्षात येते.
- देहाला काही त्रास होत असला तरी रामनाम ऐकणं चालू राहतं, मनात मी म्हणतेय की नाही याच्याकडे मी लक्ष देत असते.
- हे रामनाम रामाच्या/महाराजांच्या कृपेने माझ्या तोंडी येतं, किंबहुना रामच रामच त्याचं नाम घेतो हे महाराजांचं सांगणं संपूर्ण खरं आहे हे मी अनुभवते. मी जर काही ठरवून करायला गेले तर ते होत नाही.
- घडणारी प्रत्येक घटना ही त्यांच्या इच्छेने होते असं मला वाटतं
- आपल्याकडे येंणारा पैसा त्यांच्या कृपेने आला, आता ते सांगतील तसा तो खर्च करायचा आहे, असं मला वाटतं.
- आपल्या जीवाचं बरवाईट होईल का अशी भीती वाटायला लागली तर रामा तुला हवं तसं कर. आत्ता घेऊन जायचं असेल तर मी तयार आहे असाच भाव माझ्या मनात येतो.
- ही वेबसाईट स्वतंत्र अशी करणं हा त्यांचा आदेश समजते.
- जमा झालेल्या अनुभवांचा, ग्रंथ वाचून केलेल्या चिंतनाचा, केलेल्या तीर्थयात्रेतील अनुभवांचा डोक्य़ात साठा झाल्यावर आता याचं काय करायचं असा माझ्यापुढे प्रश्न होता.
- काही मोजक्या लोकांना प्रसंगानिमित्त काही मी सांगत होते पण माझं समाधान होईना.
- गेल्या काही दिडशे-दोनशे वर्षांच्या कालावधीत परकीय आक्रमणे भौगोलिक-सांस्कृतिक-शैक्षणिक स्तरांवर झाल्याने आपण खर्‍या सगुणोपासनेपासून, कुलधर्म-कुलाचारापासून, भगवंताच्या अस्तित्वाविषयीच्या श्रध्देपासून खूप लांब गेलो आहोत. पैसा-सेक्स-करमणुक याचा चाळा-लळा-ध्यास लागल्याने नको एवढे असमाधानी-अस्वस्थ-दुःखी-बेचैन-विकॄत विचारसरणीचे झालो आहोत. प्रवाहपतित झालो आहोत. आता खरे संत जन्म घेणे व देहात असून त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करणे शक्य नसणार आहे इतका कलिकाळ माजला आहे. त्यानं आपली बुध्दी भ्रष्ट केली आहे. आपण सगळेच विपरीत विचार करतो आहोत आणि स्वतःला फार शहाणे समजत आहोत.
- अशा भयंकर स्थितीत महाराज देहात नसताना सुध्दा सूक्ष्म रुपात आपल्याला परमार्थाला लावण्याचा प्रयत्न करीत आहेत, आपले कल्याण करीत आहेत.
आपल्या हातून त्यांना वाईट वाटेल असे काही घडता कामा नये, अशी एक वेगळीच जागरुकता आली आहे.
- तरी जर काही चुकीचं घडलं आणि ते लक्षात आलं तर त्यांची क्षमा मागून पुन्हा असं न घडण्याचा मी प्रयत्न करेन मात्र तुमची सत्ता माझ्यावर असू देत, अशी मी त्यांना विनंती करते.
- मी संपूर्ण अडाणी-अहंकारी आहे, पण तुम्हाला शरण आहे असे मी म्हणत असते.
- जे तुम्ही कराल ते मला मान्य आहे.
- माझ्या डोळ्यांनी महाराज बघतात, माझ्या कानांनी महाराज ऐकतात, माझ्या तोंडून महाराज बोलतात, हातून टाईप करवतात, त्यांच्या इच्छेने माझ्याकडे पेशंट येतात. त्यांना महाराजच मदत करतात, निमित्तमात्र मी आहे.
- महाराजांचा अनुग्रह घेतल्यावर मला वाटले मी आत्तापर्यंत अनाथ होते आता सनाथ झाले. तेच माझे माय-बाप-आजोबा-आजी-परमेश्वर आहेत.
- प्रत्येक ठिकाणी त्यांचीच स्मृती जागृत होते.
- एक वेगळ्याच प्रकारचं हे वेड आहे.
- त्यांच्या विषयी बोलताना मला अतिशय आनंद होतो, मी देहभान विसरते, काळाचा ओघ विसरते.
- मी महाराजमय झालेय असे विधान मी करु शकत नाही इतकी माझ्यातल्या निद्रिस्त अहंकाराची-मीपणाची जाणीव मला होते.
- माझ्या चित्तातला हा मल जाऊन मला कधी एकदा श्वासाबरोबर सतत नाम घेता येईल असा ध्यास लागून राहिलाय.

॥श्रीराम समर्थ॥