राजस श्रध्दा

मी एक साधनी -
महाराज, रजोगुणी माणसे कशी असतात?

माझ्या मनातील सद्‌गुरु -
राजस माणसे अज्ञानी श्रध्देमुळे यक्ष व राक्षसांची पूजा करतात.
राजस माणसे कडू, आंबट, खारट, अतिशय गरम, तिखट, कोरडा, दाह करणारा, दुःख-चिंता-रोग उत्पन्न करणारा आहार घेतात.
राजस माणसे दांभिक आचरणयुक्त, फळाचे ध्येय डोळ्यापुढे ठेऊन यज्ञ करतात.
राजस माणसांचे तप स्वतःचा सत्कार मानपूजा होण्यासाठी, स्वार्थासाठी, पाखंडीपणाने केलेले, क्षणिक फळ देणारे असते.
क्लेशपूर्वक केलेले, मोबदल्याच्या अपेक्षेने केलेले, मान-प्रशंसा-प्रतिष्ठा मिळवण्यासाठी केलेले, रोग-परिहार व्हावा म्हणून केलेले दान राजस असते.
सर्व कर्म दुःखरुप असे समजून शारीरिक क्लेशाच्या भयाने नियत कर्मांचा केलेला त्याग हा राजस त्याग असतो.
राजस ज्ञानामुळे मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भावांना अलगपणे जाणतो.
परिश्रमपूर्वक केलेले, भोगासक्तीसहित असलेले, अहंकारयुक्त असलेले कर्म हे राजस असते.
आसक्तीयुक्त, फळाची इच्छा करणारा, लोभी, इतरांना पीडा देणारा, अशुध्द आचरण करणारा, हर्ष-शोक यांनी लिप्त असणारा तो राजस कर्ता असतो.
जी धर्म-अधर्म, कर्तव्य-अकर्तव्य यथायोग्य रीतीने जाणत नाही, ती राजस बुद्धी असते.
जिच्यामुळे माणसाला फळाची इच्छा होते, जी आसक्तीने धर्म, अर्थ, काम यांना धारण करते ती राजस धृती असते.
जे विषय व इंद्रिय यांच्या संयोगामुळे उत्पन्न होते, जे भोगकाळी अमृतवत व परिणामी विषवत असते ते सुख राजस असते.

॥श्रीराम समर्थ॥