तामस श्रध्दा

मी एक साधनी -
तमोगुणी माणसे कशी असतात?

माझ्या मनातील सद्‌गुरु -

तामस माणसे अज्ञानी श्रध्देमुळे प्रेत व भूतगणांची पूजा करतात..
तामसी माणसे अर्धकच्चा, रसहीन, दुर्गंध येणारा, शिळा, उष्टा, अपवित्र आहार घेतात.
तामस माणसे अशास्त्रीय, अन्नदानविरहित, मंत्र-विरहित, दक्षिणा-विरहित, श्रध्दाविरहित यज्ञ करतात.
तामस माणसांचे तप मूढतापूर्वक, हट्टाने, स्वतःला पीडा देऊन केलेले, दुसर्‍याचे अनिष्ट करण्यासाठी केलेले असते. (शरीर-मन-बुद्धी यांना शास्त्रविरुध्द घोर तपाने क्लेश देण्याने माणूस अंतर्यामी परमात्म्याला क्लेश देतो.).
सत्कार न करता केलेले, तिरस्कार करुन केलेले, अयोग्य स्थळी, अयोग्य काळी केलेले, कुपात्र व्यक्तीला (अभक्ष्यभक्षण व नीचकर्म करणार्‍याला) केलेले दान तामस असते.
नियत कर्मांचा मोहामुळे केलेला त्याग हा तामस त्याग असतो.
तामस ज्ञानामुळे माणूस शरीरासक्ती ठेवतो, हे ज्ञान मुक्तिशून्य असते, ते तात्विक अर्थाने रहित असते, ते अल्प असते.
आपले सामर्थ्य यांचा विचार न करता केलेले कर्म तामस असते. त्या कृत्याचे हानी, हिंसा हे परिणाम होतात.
अयुक्त,
असंस्कृत,
घमेंडी,
धूर्त,
इतरांच्या उपजिविकेचा नाश करणारा,
शोक करणारा,
आळशी,
टाळाटाळ करणारा

तो तामस कर्ता असतो.
जी अधर्माला धर्म मानते, जी सर्व पदार्थांना विपरीत मानते ती बुध्दी तामस असते.
जी दुष्ट बुध्दी असून निद्रा, भय, चिंता, दुःख, उन्मत्तपणा यांना सोडत नाही ती तामस धृती असते.
जे भोगकाळी व परिणामी मोहित करते व जे निद्रा, आळस, प्रमाद यांच्यापासून उत्पन्न होते ते सुख तामस असते.

॥श्रीराम समर्थ॥