नाशवंताचे समर्पण

नाशवंताचे समर्पण (ओव्या ३० ते ३५)

ओवी ३०
अध्यात्मजीवनात आत्मज्ञान होण्यासाठी त्याग आणि श्रद्धा यांची आवश्यकता असते.
सूक्ष्म व पवित्र ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी आपले अंत:करण तसेच सूक्ष्म व पवित्र झाले पाहिजे.
ज्याला ईश्वरदर्शन (आत्मज्ञान) झालेले आहे अशा सद्‌गुरुवर विश्वास ठेवायला पाहिजे.
खर्‍या तळमळीच्या शिष्याला मदत करण्यासाठी महात्मे सदैव तयार असतात.
प्रपंचातील सत्ता, संपत्ती व संतती यांत गुंतण्यापासून मागे फिरावे.

ओवी ३१
शिष्या, तुझे अढळपद (आपण मूळ ईश्वर स्वरूप आहोत हे सत्य) गेले.
तू मायेने भुललास.
तो गुंता सोडविण्याची प्रचंड शक्ती संतांपाशी किंवा सद्‌गुरुपाशी असते.
स्वस्वरूपाचे ज्ञान होण्यासाठी दृश्याचा (जड विश्वात गुंतण्याचा) त्याग ही किंमत सद्‌गुरु मागतात.

ओवी ३२
अंत:काळी हे जग सोडताना जे आपल्या बरोबर येणार ‘नसेल’ ते सर्व सद्‌गुरुला मनापासून द्यावे.
यामुळे शिष्य आत्म-अनात्म वस्तू वेगळ्या काढायला शिकतो.
अनात्म वस्तू सद्‌गुरुच्या ताब्यात देऊन आत्मवस्तूचे चिंतन करायला तो मोकळा होतो.
म्हणून ज्या अशाश्वत वस्तूंमध्ये मन अडकलेले असेल ते सर्व अर्पण करावे.

ओवी ३३
शिष्याने अशाश्वतात अडकणे थांबवले की गुरु त्याला आपल्याबरोबर ईश्वरपदापर्यंत घेऊन जातात.
बहिरंगातूनअंतरंगाकडे, स्थूलातूनसूक्ष्माकडे, देहबुद्धीतूनआत्मबुद्धीकडे सद्‌गुरु मार्गदर्शन करतात.
ते सांगतील ते साधन अगदी मनापासून करायला हवे.

कोणत्याही दृश्य व अनित्य वस्तूबद्दल यत्किंचित वासना नसणे हे निर्मल अंत:करणाचे प्रधान लक्षण आहे.
अंत:करण संपूर्ण शुद्ध व निर्मल झाले की आत्मसाक्षात्कार घडतो.
समर्थ सांगतात की थोडी जरी वासना राहिली तरी आत्मकल्याण होत नाही.


स्वामी निजपद प्राप्त झाले असे म्हणतात आणि सूचना करतात की यापुढे जगातील सर्व वस्तूंबद्दलचे ममत्त्व सोड (नवीन निर्माण करू नकोस)

ओवी ३७
शिष्य जर बहिर्मुख असेल तर सद्‌गुरुचा सहवास त्याला हवासा वाटतो.
शिष्य संपूर्ण आत्मसंमुख झाला की त्याला हृदयस्थ ईश्वरकडून (आतल्या आवाजाकडून) निश्चित व स्पष्ट मार्गदर्शन सुरू होते.
--------------------------------------------------
नाशवंताचे समर्पण - प्रमुख मुद्दे
मायेने भुलविल्यामुळे शिष्याचे अढळपद गेले.
ते परत मिळविण्यासाठी त्याचे स्वत:ची शक्ती अपुरी पडली.
सद्‌गुरुंचे साहाय्य झाले.
शिष्याकडून अनित्य वस्तूंविषयीचा संपूर्ण त्याग आणि सद्‌गुरुंविषयी संपूर्ण श्रद्धा, या दोन गोष्टींची अपेक्षा, आवश्यकता.
बाह्य वस्तूंविषयी आसक्ती असेल तर अंत:करण मलीन असते, म्हणून आत्मसाक्षात्कार घडत नाही.
सर्व अनित्य वस्तूंविषयी वाटणारे ममत्त्व सद्‌गुरुंना अर्पण केले की ते निजपद मिळवून देतात.
----------------------------
ओवी ३८
सद्‌गुरु ’"मी जातो" म्हणतात.
शिष्य त्यांना प्रेमाने थांबवून घेतो.
त्यांचा संवाद घडतो. (पुढील समासात)
तो संवाद परमानंद देणारा आहे.
आत्मारामाचा पहिला समास पूर्ण झाला यानंतर स्वामी पुढचे रहस्य सांगतील
हे अनुभवाचे वर्म सावध होऊन ऐकावे असे ते वाचकाला / श्रोत्याला सांगत आहेत.
सद्‌गुरुंचे ऐकून शिष्याने अनित्य वस्तूमधली आसक्ती / ममत्त्व सोडले -अर्पण केले.
सद्‌गुरु म्हणतात, “मागची आसक्ती सोडलीस, यापुढेही ती बाळगू नकोस.”
“तुला आता निजपद मिळेल’, असे सांगून सद्‌गुरु शिष्याला सोडून जाऊ लागतात.
शिष्याची सद्‌गुरुंमध्ये मनाने गुंतवणूक झाल्यामुळे तो त्यांना ‘थांबा’ असे प्रेमाने विनवतो आहे.
सद्‌गुरु व त्यांचा शिष्य यांच्यामध्ये अतिशय गूढ असा संवाद घडतो, त्याचे वर्णन पुढील समासात आहे. ते ऐकूनच श्रोत्यांना अतिशय आनंद होणार आहे. हा संवाद सावध चित्ताने ऐकावा.

॥श्रीराम समर्थ॥