जटायूकृत रामस्तुती

जटायूकृत रामस्तुती
परमात्मस्वरूप रामचंद्राला मी प्रणाम करतो, जो
अगणित गुणांनी युक्त आहे.
जो देशकालाची मर्यादा नसलेला आहे.
जो सर्वांचे आदिकारण आहे.
सकल जगाचे पालन, संहार यांचा जो मूळ हेतू आहे.
ज्याचे रूप शांतीने शोभणारे आहे.
ज्याच्यामुळे अनंत सुख लाभते.
ज्याच्यावर लक्ष्मी प्रेमपूर्ण नेत्रकटाक्ष टाकत असते.
ज्याने इंद्र, ब्रह्मदेव इ. ची दु:खे दूर केली आहेत.
जो आपल्या भक्तांना वर देण्यास देण्यास सदैव तत्पर असतो.
ज्याच्या हातात सर्वदा उत्तम धनुष्यबाण असतात.
ज्याचे रूप त्रैलोक्यात अत्यंत सुंदर आहे.
जो सर्वांकडून स्तुती केली जाण्यास योग्य आहे.
जो शेकडो सूर्यांप्रमाणे तेजस्वी आहे.
जो भक्तांचे अनोरथ पूर्ण करतो. जो निरंतर सर्वांचा आश्रयदाता आहे.
ज्या अंत:करणात प्रेम असेल तेथेच जो वास्तव्य करून राहातो.
ज्याचे नाव (नाम) संसाररूपी अरण्याला जाळून टाकणारा वणवा आहे.
जो शंकर वगैरे दैवतांचे दैवत आहे.
जो दयाळू आहे.
हजारो कोटी दैत्यांचा ज्याने नाश केला आहे.
ज्याची अंगकांती सूर्यकन्या - यमुना - हिच्याप्रमाणे (कृष्णवर्णाची) आहे.
संसारात नित्य आसक्त असणार्‍या लोकांपासून जो सर्वदा दूर असतो.
संसारपराङ्‌मुख मुनींना ज्याचे सदैव भेट होते.
ज्याचे चरण भवसागर तरून जाण्याची उत्तम नौका आहेत.
जो शंकर व गिरीकन्या पार्वती यांच्या अंत:करणात वास करतो.
जो पर्वतश्रेष्ठ सहजपणे धारण करतो.
ज्याची चरित्रे अत्यंत मनोहर आहेत.
मोठमोठे देव आणि दैत्य ज्याची चरणसेवा करीत असतात.
जो देवांच्या इच्छा पूर्ण करतो.
ज्याचे मुखकमल हसल्यामुळे सुंदर आणि विकसित झाले आहे.
ज्याची प्राप्ती अत्यंत सुलभ मार्गाने होते.
ज्याची कांती इंद्रनील मण्यांप्रमाणे आहे.
शुभ्र कमलाप्रमाणे सुंदर असलेल्या नेत्रांनी जो शोभून दिसत आःए.
जो शंकराच्या गुरुचाही (ब्रह्मदेवाचा) गुरु आहे.
तीन गुणांनी युक्त असल्याप्रमाणे जो भासतो.
ज्याची स्तुती देवेंद्रही करतो.
ज्याची अंगकांती कोट्यवधी मदनांहून सुंदर आहे.
शतपथ ब्राह्मणांत सांगितल्याप्रमाणे प्रेमभाव बाळगल्यानेच ज्याची प्राप्ती होते.
जो मोठमोठ्या योगीजनांच्या हृदयांत नित्य प्रकाशत अस्तो.
ज्याचे सेवा करणारे, परधन वर्ज्य करतात, परस्त्री वर्ज्य करतात, दुसर्‍यांचे गुण आणि ऐश्वर्य पाहून संतुष्ट होतात, दुसर्‍यांचे हित करण्याच्या कामात नेहमी तत्पर असतात.

॥श्रीराम समर्थ॥