भगवंत भक्तांचा भक्त होतो

भगवंत भक्तांचा भक्त होतो-
(संदर्भ- श्रीमत्‌भागवत्पुराण)

जो विभक्त नाही तो भक्त.
कोणापासून विभक्त नाही - भगवंतापासून.
जो सदैव झोपेत, स्वप्नात सुध्दा भगवंतापासून एक क्षणभर सुध्दा दुरावू इच्छित नाही तो भक्त.

भगवंत आनंदस्वरुप असल्याने तोही आनंदमय होतो.
भगवंत सर्वगामी आहे, भक्त सगळीकडे भगवंतालाच पाहतो.
दिसायला/ऐकायला/वाचायला दोन वेगळे वाटतात...हे द्वंद्व भक्त भगवंतावर प्रेम करण्याकरीता ठेवतो.
भगवंताचे कितीही सेवन केले तरी समाधान होत नाही.
भगवंत ज्यात नाही, जिथे नाही तिथे भक्त जात नाही.
जे भगवंताला मानीत नाहीत,त्यांच्याशी भक्त संभाषण करु इच्छित नाही.
भगवंताला जे प्रिय ते भक्त करतो.
भगवंताला जे अप्रिय ते भक्त करीत नाही.
भगवंताची कृपा झाल्याशिवाय अशी भक्ती भक्त करु शकत नाही.
"मी भगवंताचा, भगवंतासाठी जगतो, त्याची सेवा-सन्निध्य हेच माझे काम" असे भक्त मानतो.
असा ध्यास भगवंताला आवडतो.
तो भक्ताच्या निष्ठेची कसून परीक्षा घेतो.
त्यात भक्त पास झाला की भगवंत भक्ताचा होतो
मग भगवंताला भक्ताची गोडी लागते.
भक्ताची सोबत भगवंत करतो.
भक्ताची सगळी कामे भगवंत करतो.
भक्ताचे रक्षण तो करतो.
त्याच्या हाकेला तो धावून जातो.
दोघंही एक होतात.
इतके सन्निध्य अनुभवल्यानंतर भक्ताची मोक्षाची इच्छाही जाते.
कुठेही असले तरी भगवंताची सोबत असेल तर मोक्ष तरी मिळवून काय करायचय असं त्याला वाटतं.
तो भगवंताला एकच मागतो - तू मला हवा. तुझी माया आड येऊ देऊ नको. तुझी पाऊले सोडून मला काही नको?.

॥श्रीराम समर्थ॥