संन्यासधर्म - सांख्ययोग (अध्याय २)

संन्यासधर्म - सांख्ययोग: (अध्याय २)
---------------------------------
मी-एक साधनी:
महाराज, दुसर्‍या अध्यायापासून ते शेवटच्या अध्यायापर्यंत भगवंताने विविध प्रकारची साधना कशी करावी, त्या प्रकारची साधना करणारे योगी कसे असतात, त्यांना परमात्मा कोणते फल देतो याविषयी खुलासेवार सांगितलं आहे. सर्वप्रथम आपण, दुसर्‍या अध्यायात भगवंताने वर्णन केलेला जो सांख्ययोग आहे त्याविषयी अधिक सांगावं.
माझ्या मनातील सद्गुरु:
या सांख्ययोगात आरंभाचा नाश होत नाही, त्यात फळरूप दोष नाही तसेच, या योगात व्यवसायात्मिका बुध्दी एकच असते.
------------------------
मी-एक साधनी:
हा सांख्ययोग साधकाने कसा आचरावा?
माझ्या मनातील सद्गुरु:
वेदांत सांगितल्याप्रमाणे त्रिगुणांची कार्ये, त्यांचे भोग, त्यांची साधने यामध्ये साधकाने आसक्ती ठेवू नये,
सुख-दुःख इ. द्वंद्वापासून मुक्त व्हावं,
नित्य अशा परमात्म्यामध्ये स्थित व्हावं,
अंतःकरणाला ताब्यात ठेवावं.(आत्मवान भव।)
प्रत्येकाला कर्म करण्याचा अधिकार आहे, मात्र कोणालाही फलाचा अधिकार नाही, त्यामुळे साधकाने कर्माच्या फळांची इच्छा धरु नये.
कर्म न करण्याचाही आग्रह धरु नये,
साधकाने आसक्ती सोडावी.
सिध्दी आणि असिध्दी याकडे समान भावाने पहावं,
योगात स्थिर होऊन कर्म करावं, समत्व म्हणजेच योग.
बु्द्धीयोगापेक्षा सकाम कर्म खालच्या श्रेणीचे आहे,
समबुध्दीतच रक्षणाचा उपाय शोधावा.
साधकाने सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून, चित्त स्थिर करुन, मनाला परमात्म्याचाच आधार देऊन बसावं.
-------------------------
मी-एक साधनी:
महाराज,या सांख्ययोग्यांची आंतरिक स्थिती कशी असते?
माझ्या मनातील सद्गुरु:
ज्यांचे प्राण गेले आहेत तसेच ज्यांचे प्राण गेले नाहीत, अशा दोघांसाठीही सांख्ययोगी शोक करीत नाहीत.
मोह (संभ्रम-गोंधळ) या धीरपुरुषांना होत नाही.
इंद्रियांचे विषय-संयोग या धीरपुरुषांना व्याकुळ करीत नाहीत.
असत्‌ वस्तूला अस्तित्त्व नाही आणि सत्‌ वस्तूचा अभाव नसतो; या दोहोंचे सत्य स्वरूप हे तत्त्वज्ञानी पुरुष पाहातात.
हे तत्त्वज्ञानी पुरुष आत्म्याला आश्चर्याने पाहातात, आत्म्याचे आश्चर्याने वर्णन करतात, आत्म्याविषयी आश्चर्याने ऐकतात.
सर्व बाजूंनी भरलेला जलाशय मिळाल्यावर छोट्याश्या जलाशयाचे जेवढे महत्त्व उरते, तेवढेच महत्त्व, या ब्रह्मज्ञान्यांना ब्रह्म जाणल्यावर वेदांचे उरते.
हे समबुद्धीचे पुरुष, पुण्य व पाप या दोन्हींचा याच जगात ते त्याग करतात; त्यांच्यापासून मुक्त होतात.
समत्त्वरूप योगाला चिकटले की त्यांची कर्मबंधनातून सुटका होते.
हे स्थितप्रज्ञ पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतात आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहातात.
या स्थिरबुद्धी मुनींना दु:खदायक प्रसंगी मनाला खेद वाटत नाही;
सुखांच्या प्राप्तीविषयी त्यांना इच्छा नसते;
त्यांच्या मनातून प्रीती-भय-क्रोध नाहीसे झालेले असतात.
हे स्थितप्रज्ञ पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य होतात;
शुभ गोष्टींनी प्रसन्न होत नाहीत;
अशुभ गोष्टींचा द्वेष करीत नाहीत.
कासव सर्व बाजूंनी जसे आपले अवयव आत ओढून घेते, तसे हे स्थिरबुद्धी पुरुषसुद्धा आपल्या इंद्रियांना विषयांपासून सर्व प्रकारे आवरून घेतात.
या स्थितप्रज्ञ पुरुषांची विषयांबाबतची आवड (मनातल्या इच्छा) परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते.
या स्थिरबुद्धी पुरुषांनी त्याची इंद्रिये विषयांपासून सर्व प्रकारे आवरून घेतलेली असतात.
रात्री जेव्हा सर्व प्राणी झोपतात तेव्हा हे संयमी मुनी जागे असतात व त्यावेळी ते परमानंदाचा अनुभव घेत असतात; तर दिवसा सर्व प्राणी जेव्हा जागे असतात व लौकिक सुखोपभोग घेत असतात तेव्हा हे संयमी मुनी रात्र असल्याप्रमाणे (लौकिक सुखोपभोग अस्तित्वातच नसल्याप्रमाणे) वागतात.
सर्व प्रकारचे पाणी, समुद्राला विचलित न करता, त्यात सामावून जाते, तशा सर्व इच्छा (कामा:) या स्थितप्रज्ञ पुरुषांमध्ये प्रवेश करतात.
-----------------------------
मी-एक साधनी:
महाराज, या सांख्ययोग्यांना भगवंत कोणते फल देतो?
माझ्या मनातील सद्गुरु:
साधक कर्मयोगाच्या बुद्धीने युक्त झाल्यावर त्याचे कर्माचे बंधन तुटते.
कर्मभोगरूप धर्माचे छोटेसे साधन जन्ममृत्यूरूप मोठ्या भयापासून त्याचे रक्षण करते.
असे समबुद्धीयुक्त ज्ञानी, कर्मातून निर्माण झालेल्या फळाचा त्याग करून जन्मबंधनातून मुक्त होऊन अनामय पदाला जातात.
जेव्हा बुद्धी मोहाच्या चिखलाला पार करते तेव्हा ऐकलेल्या आणि ऐकण्याजोग्या इह-परलोकांतील सर्व भोगांपासून योगी विरक्त होतो.
तर्‍ह्तर्‍हेची वचने ऐकून विचलित झालेली बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर होते तेव्हा योगी मुक्त होतो म्हणजेच परमात्म्याशी त्याचा नित्यसंयोग होतो.
-------------------------------
आता मी तुला ब्राह्मी स्थितीतील स्थितप्रज्ञ योग्याविषयी सांगतो.
इंद्रिये ज्या योग्याच्या ताब्यात असतात त्याची प्रज्ञा स्थिर होते.
अंत:करण ताब्यात (विधेयात्मा) ठेवलेला योगी आपली इंद्रिये स्वत: राग-द्वेषरहित होऊन ताब्यात ठेवतो.
तो विषयांचा उपभोग घेत असूनही अंत:करणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. अंत:करण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व सुख-दु:खे नाहीशी होतात.
त्याची बुद्धी तात्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते.
जो योगी सर्व कामनांचा त्याग करून ममता, अहंकार आणि इच्छा टाकून देतो, त्यालाच शांती मिळते.
ही स्थिती प्राप्त झाल्यावर योगी कधी मोहित (गोंधळत नाही) होत नाही.
अंतकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन योगी ब्रह्मनिर्वाणाला जातो.
(संदर्भ - श्रीमद्भगवद्गीता - अध्याय - २ सांख्ययोग )
 

॥श्रीराम समर्थ॥