भगवंत कसा आहे?

भगवंत कसा आहे? -
(संदर्भ - पुस्तक - श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज -चरित्र आणि वाङमय -पान ४५६ ते ४६६)
-------------------
सत्य हे परमात्मस्वरूप असते. सत्य अखंड टिकणारे, शांत, सनातन, समाधानमय असते.
परमात्मा हा सच्चिदानंद – सत्‌ (असणे) + चित्‌ (जाणीव) + आनंद – रूप आहे, तरी त्याचे ते स्वरूप सगुणाच्या आधाराशिवाय आपल्याला पाहाता येत नाही.

भगवंताची दृष्टी अशी आहे की, त्याला आपले अंत:करण स्पष्ट दिसते. ते जसे असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ अथवा दूर करतो.
भगवंत आनंदमय आहे. ही सृष्टी भगवंतानेच उत्पन्न केली आहे. तिच्यामध्ये तो व्यापून राहिला आहे. त्यामुळे ही सृष्टीही आनंदमयच आहे. आपल्याला ती तशी दिसत नाही हा आपला भ्रम आहे.
भगवंताचा एक गुण त्याने निर्माण केलेल्या सृष्टीतही आहे - ‘जगण्याची हौस’.
खरा कर्ता भगवंत आहे.
भगवंत इतका अवीट आहे की, तो कितीही मिळाला तरी त्याचा वीट येत नाही.
परमात्मा सूर्यप्रकाशासारखा सर्व ठिकाणी भरलेला आहे.
भगवंत सर्वांचा आहे.
भगवंत सगुणात आला की, जे नियम आपल्याला लागू असतात (जन्म, व्याधी, जरा, मृत्यू) तेच नियम त्यालाही लागू होतात.
भगवंत काल होता, आज आहे, तो उद्याही असणार आहे.
सूर्य आणि त्याचे किरण जसे निराळे नाहीत त्याप्रमाणे आपण आणि भगवंत हे वेगळे नाहीत.
जो दु:ख देतो तोच सुखही देतो. ज्याला शिक्षा देता येते त्यालाच ती कमीही करता येते - असा हा भगवंत आहे.
भगवंत अत्यंत दयाळू आहे. तो तारल्याशिवाय कोणाला सोडत नाही.
भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे, तसाच तो सर्वव्यापी आहे, म्हणून तो आपल्याला दिसत नाही.
जगामध्ये असे कोणतेही दु:ख नाही की, जे भगवंताच्या आनंदाला विरजण घालील.
सर्वांना शांती मिळावी हाच भगवंताचा हेतू आहे.
भगवंत अगदी सूक्ष्म आहे, हे एवढे मोठे जग ही त्याची उपाधी आहे.
आपण एक दाणा पेरावा आणि त्याच्याबदली हजार दाणे घ्यावे, ही भगवंताची लीला आहे.
भगवंत ही प्रेममूर्ती आहे.
भगवंताला उपासना प्रिय आहे.
भगवंत हा सहजसाध्य आहे पण सुलभसाध्य नाही.
आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हातामध्ये आहे तर जीवनातल्या सर्व घडामोडीही त्याच्याच हातात आहेत.
सृष्टी म्हणजे भगवंताच्या आनंदाचे व्यक्त स्वरूप आहे.
भगवंताने निरनिराळे खेळ केले तरी भगवंत हा एकच आहे.
भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे.
एकच मनुष्य ज्याप्रमाणे निरनिराळे पोषाख घालतो त्याचप्रमाणे एकाच भगवंताचे निरनिराळे अवतार होत असतात.
भगवंताला चार हात का बरे? - दोन हात दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि दोन हात भक्ताला आलिंगन देण्यासाठी !
भगवंताची देणगी सूक्ष्म असते.
सर्व अवतार एका भगवंताचेच आहेत. नारायण हा लहानपणचा अवतार आहे, कारण तो सर्वांचा आदी आहे. राम हा तरुणपणचा अवतार होय आणि कृष्ण हा म्हातारपणचा अवतार समजावा.
भगवंत हीनाहून हीन आणि श्रीमंताहून श्रीमंत आहे.
स्वर्ग, मृत्यू आणि नरक या अवस्था निर्माण करणारा परमात्मा स्वत: या तीन अवस्थांच्या पलिकडे असतो.
एका त्या परमात्म्यावाचून संपूर्ण निर्दोष असे दुसरे स्थान नाही.
आकाशाचे छत्र जसे सर्वांवर आहे तसे भगवंताचे छत्र सर्वांवर आहे.
भगवंताचा जो जो अवतार झाला तो तो त्या त्या वेळी पूर्णच होता.
प्रत्येक अवतारात जेवढ्या शक्तीची जरूर होती तेवढीच भगवंताने दाखवली.
कलियुगात नामावतार आहे.
परमात्म्याचे स्वरूप संतांनी जाणले आणि त्याला सगुणरूपात आणले.
भगवंत सगळ्या ठिकाणी राहून हृदयात राहू शकतो.
तो एका ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्तारूपाने राहातो.
भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो.

॥श्रीराम समर्थ॥