त्रिपिंडी, नारायणबली, नागबली

काम्य श्राद्ध -
त्रिपिंडी श्राद्ध
सलग तीन वर्षे पितरांचे श्राद्ध झाले नाही तर पितरांना प्रेतत्त्व येते. ते दूर होण्याकरता त्रिपिंडी श्राद्ध करावे.

----------------
नारायण बली -
नारायण-नाग बली असे व्यवहारात म्हटले जात असले तरी हे दोन स्वतंत्र विधी आहेत. हे दोन्ही विधी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होतात.
गोदावरी नदीकाठी जेथे कुशावर्त तीर्थ आहे, तेथे त्रिसंध्या क्षेत्रात नारायण बली करतात. राजा स्वेत, हरिश्चंद्र, धर्मराज वगैरे अनेकांनी येथे काम्य श्राद्धे केली आहेत.
जो पीडा देणारा आत्मा आहे त्याचे गोत्र व नाव माहीत नसते, म्हणून त्याचा उल्लेख काश्यप गोत्र व नारायण नावाने करतात. म्हणून या विधीचे नाव नारायण बली असे आहे.
-------------------
नाग बली -
हा विधी शौनक ऋषींनी सांगितला आहे. ज्यांना जन्मकुंडलीप्रमाणे सर्पशाप आहे त्यांनी नाग बली विधी करावा.
-------------------------
सविस्तर माहिती-सूचना-तयारी -
ही श्राध्दे करणारे गुरुजी क्षेत्रातच रहाणारे असतात.
त्यांच्याकडे निवासाची, भोजनाची सोय असते.
येथे किमान ३ रात्र निवास करावा लागतो.
आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत जाऊन आपल्या क्षेत्रोपाध्यायांना वर्दी द्यावी.
कितीजण आपल्याबरोबर आहेत याची कल्पना द्यावी.
आपल्या निवासाचे स्थान त्यांना कळवावे.
आदल्या दिवशी श्रीत्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन त्याचे आशीर्वाद घ्यावेत, म्हणजे सर्व विधी निर्विघ्नपणे पार पडतात.
------------------------
विधीच्या पहिल्या दिवशी पुरुषांना क्षौर करावे लागते, त्याचे न्हाव्याला वेगळे पैसे द्यावे लागतात.
या दिवशी व दुसर्‍या दिवशी कुशावर्तावर दोघांना विधीपूर्वक ५ प्रकारची स्नाने करावी लागतात.
यासाठी एका पिशवीत बदलायची कोरी वस्त्रे व पंचा/टॉवेल न्यावे.
स्त्रियांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र सोय आहे.
कुशावर्ताहून स्मशानभूमीत जायच्या-यायच्या रस्त्यावर चालण्याकरीता साध्या रबरी स्लीपर घ्याव्यात व वापराव्यात म्हणजे उन्हाचे चटके बसणार नाहीत.
ओली वस्त्रे धुवायला द्यावीत.
दोन्ही दिवशी विधी करताना वापरलेली सर्व कोरी वस्त्रे (आंतरवस्त्रांसह) गुरुजींना विचारून दान करावीत.
विधी सुरु झाल्यावर सुतक लागल्याने या काळात (दुसर्‍या व तिसर्‍या दिवशी) व्रतस्थ राहावे.

  • पतीपत्नीने कामसेवन, दारू-मटन-मच्छी इ चे सेवन करू नये.
  • टीव्ही, रेडिओ इ, करमणुकीचे साधन वापरु नये.
  • उगीच वायफळ गप्पा मारू नयेत.
  • गावात फिरायला, बाहेरचं खायला जाऊ नये,
  • कोणाला स्पर्श करु नये.
  • गावातल्या देवांचं दर्शन घेऊ नये.
  • निवासाच्या जागी अनावश्यक चर्चा, भांडणे, वाद घालू नये.
  • मनात सतत रामनाम असावे.

-----------------------------------------------------------
आपल्या बरोबर नेण्याचे सामान
- पुरुष - २ कोरी धोतरे, २ कोरी उपरणे, २ आतली वस्त्रे - हे दान द्यायचे असते.
चवथ्या दिवशी सकाळी पुण्याहवाचनासाठी नेसण्यासाठी सोवळे, उपरणे, जानवे
- स्त्रिया - २ कोर्‍या पांढर्‍या साड्या, २ कोरे ब्लाऊज, २ सेट आंतरवस्त्रे - याचे दान करायचे असते.
चवथ्या दिवशी सकाळी पुण्याहवाचनासाठी नेसण्यासाठी जरीकाठी रेशमी साडी, ब्लाऊज, परकर इ.
दानासाठी
पुरुष पितरासाठी - धोतर-उपरणे, जानवे, नारळ, गोड खाऊ, १०१ रु
सुवासिनी स्त्री पितरासाठी - साडी, ब्लाऊजपीस, सौभाग्यवायन - मणीमंगळसूत्र, जोडवी, आरसा, कंगवा, हिरव्या बांगड्या, हळद-कुंकू, नारळ, तांदूळ, सुपारी, हळकुंड, खारीक, अख्खा बदाम, १०१ रु, शक्य असल्यास अत्तर/गजरा
येथे किमान १ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नाग दान करावा लागतो.
याशिवाय भोजनाचे वेगळे, निवासाचे वेगळे
विधीची दक्षिणा वेगळी.
या सर्वाची आर्थिक-मानसिक तयारी करुनच हे सर्व विधी श्रध्दापूर्वक, मनापासून करावेत.
गुरुजींशी घासाघीस करु नये.
पुण्याहवाचन झाल्यावर श्रीत्र्यंबकेश्वराला जोडीने ११ प्रदक्षिणा शिवमंत्र म्हणत मुक्याने न थांबता घालाव्यात. त्याचे पुण्य आपल्या पितरांना द्यावे.
गाय व नंदीबैलाला चारा घालावा.
क्षेत्रातील भिकार्‍यांना यथाशक्ती दान करावे.
हे सर्व करुन झाल्यावर दुपारचे मिष्टान्नाचे भोजन करुन कोठेही न थांबता थेट आपल्या घरी जावे.
------------------------------------
या विधीने दोन पितरांना सद्गती मिळू शकते.
दरवर्षी आईवडिलांचे व पितृपक्षातील अशी तीन श्राध्दे नियमाने करावीत.
पितृदोष मोठा असेल तर पुन्हा तीन वर्षांनी असाच विधी करावा.

॥श्रीराम समर्थ॥