नामस्मरणाचा समास

नामस्मरणाचा समास (श्रीसमर्थ रामदास) -

नाम केव्हा घ्यावे?
स्मरण देवाचे करावे । अखंड नाम जपत जावे ।
नित्यनेम प्रातःकाळी । माध्यानकाळी सायंकाळी ।
नामस्मरण सर्वकाळी । करीत जावे ॥
सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंदरूप असता।
नामस्मरणेंविण सर्वथा । राहोंच नये ॥
हरुषकाळी विषमकाळी । पर्वकाळी प्रस्तावकाळी ।
विश्रांतिकाळी निद्राकाळी । नामस्मरण करावे ॥
कोडें साकडें संकट । नाना संसारखटपट ।
अवस्था लागता चटपट (चुटपुट लागल्यावर) । नामस्मरण करावे ॥
चालता बोलता धंदा करिता । खाता जेवता सुखी होता ।
नाना उपभोग भोगिता । नाम विसरो नये ॥
संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती ।
नामस्मरणाची स्थिती । सांडूच नये ॥
वैभव सामर्थ्य आणी सत्ता । नाना पदार्थ चालता ।
उत्कट भाग्यश्री भोगिता । नामस्मरण सांडू नये ।
आधी आवदसा (वाईट दशा) मग दसा । अथवा दसेउपरी आवदसा ।
प्रसंग असो भलतैसा (कसाही) । परंतु नाम सोडू नये ॥
बाळपणी तारुण्यकाळी । कठिणकाळी वृध्दाप्यकाळी ।
सर्वकाळी अंतकाळी । नामस्मरण असावे ॥

॥श्रीराम समर्थ॥