गोकर्ण महाबळेश्वर (भूकैलास)

गोकर्ण महाबळेश्वर तीर्थमाहात्म्य -

- त्रेतायुगाआधीपासून महत्व - या भागाचे नाव रुद्रयोनी असे आहे. भूमीच्या कर्णातून रुद्र बाहेर पडला म्हणून हे स्थान गोकर्ण. येथे आदिगोकर्ण नावाने अतिप्राचीन शिवलिंग आहे.
- जगत्‌प्रलयात हा भूभाग फक्त पाण्याच्या वर राहतो..इतके याचे महत्व आहे.
- रावणाला श्रीशंकराने त्याच्या आईला उपासनेसाठी दिलेल्या आत्मलिंगाचे दर्शन होते

(उत्तररामायणात ही कथा येते.)हे आत्मलिंग रावणाने आपल्या घोर तपस्येने श्रीशंकराकडून कैलास क्षेत्री मिळवलेले होते. तो ते लंकेला नेणार होता मात्र श्रीनारदऋषींच्या दुरदर्शी योजनेमुळे ते गोकर्ण क्षेत्री राहिले.
- रावणाने ते आत्मलिंग भूमीवर ठेवावे म्हणून बटूरुपात आलेल्या श्रीगणपतीचे मंदिर आहे.
- ताम्रगौरी नावाने प्रसिध्द असलेल्या जगन्माता श्रीपार्वतीचे मंदिर आहे.
- येथे श्रीरामाने, पांडवांनी व ताम्रगौरी पार्वतीने तप केले होते.
- ही श्रीअगस्त्य ऋषींची तपःस्थली आहे.
- इथे अनेक संतांनी चातुर्मास केले आहेत.
- श्रीशंकराचार्यांचा मठ येथे आहे.
- वैशाख, कार्तिक व माघात केलेल्या समुद्रस्नानाचे व कोटीतीर्थात केलेल्या स्नानाचे अतिमहत्व आहे.(संदर्भ - श्रीकलावती आईंचे चरित्र)

medium_kalbhairava.jpg

- येथील क्षेत्रपाल कालभैरव आहे.
- येथे निवासासाठी श्रीमहाबळेश्वराची आराधना करणारे श्रीलक्ष्मीवेंकटेश आहेत.
- पापमोचनी कोटीतीर्थ येथे आहे.
- सत्ययुगातील घडलेल्या कथेत वर्णिलेले श्रीनागेश्वराचे स्थान येथे आहे.
-------------------
- येथे श्रीमहाबळेश्वराचे स्पर्शदर्शन आहे.
- येथे पितरांचे श्राध्द करता येते.
- येथे सप्तधान्याने, पंचामृताने श्रीमहाबळेश्वराची पूजा करतात.
- येथे मंदिराजवळच श्री जोगळेकर हे क्षेत्रोपाध्याय रहातात..त्यांच्या कडे रहाण्याची, दर्शनाची, श्राध्दाची व लघुरुद्राची व्यवस्था होऊ शकते.

-----------------------------

माझे अनुभव -

बर्‍याच वर्षांपासून मी गोकर्ण महाबळेश्वराविषयी ऐकून होते.
शिवभक्त असलेल्या माझ्या आजोबांनी त्याचे दर्शन घेतलेले होते. श्रीकलावतीआईंच्या चरित्रात त्या स्थानाचा त्यांचे जन्मगाव व सुरुवातीच्या साधनेचे ठिकाण म्हणून महत्व दिलेले होते.
साधनाकालात रामायणाचे वाचन करताना सर्वच रामायणांत या स्थानाचा उल्लेख सापडला. शिवाय महर्षी व्यासरचित पुराणांमध्ये महत्वाचे तीर्थस्थान म्हणूनही संदर्भ सापडला. लाखो वर्षांचा इतिहास असलेली जागा पहाण्याची उत्सुकता मला लागून राहिली.

या यात्रेविषयी माहिती मी बरेच वर्षे काढत होते. बहुतेक ठिकाणी coastal Karnatak या अंतर्गत ती यात्रा करता येत होती. ती बर्‍याच दिवसांची म्हणजे १० दिवसांची होती व खिशाला सहज न परवडणारी होती. मी एकटी गेले तर हॉटेलच्या रुमचे भाडे दुप्पट भरावे लागेल असा दमही मिळाला होता. इतर पर्यटन मला करायचे नव्हते.

मला तर आतून सारखे महाबळेश्वराचे बोलावणे येत होते. काय करावे, कसे हे साधावे या विचारात मी होते.

एक दिवशी मी आमच्याकडे नेहेमी येणार्‍या साधकाला - राजूला सहज विचारले ,"येतोस का?" आणि काय आश्चर्य? तो लगेच तयार झाला. समन्वयला आमच्याबरोबर दर्शन घडवून आणायचे ठरले. राजूने त्याच्या ऑफिसमधून परवानगी मिळवली. समन्वयला तयार केले, कोकण रेल्वेची तिकिटे काढली. सामान पॅक करायला मदत केली, समन्वयला यात्रेभर आपल्या लेकरासारखे सांभाळले. देवानेच हे घडवून आणले यात काही शंका नाही.

शनिवारी रात्री पुणे-एर्नाकुलम ही रेल्वे ट्रेन आहे. ती रात्री ११ वा सुटते आणि गोकर्ण स्टेशनला दुसर्‍या दिवशी दुपारी ३ नंतर पोचते. तीच ट्रेन मंगळवारी दुपारी गोकर्ण स्टेशनला साधारण ११ वा येते व दुसर्‍या दिवशी पहाटे पुण्याला पोचते. त्यामुळे शनिवारचा व बुधवारचा दिवस पदरात पडतो, शिवाय सोमवारी श्रीमहाबळेश्वराचे दर्शन होते ही पर्वणी!

आम्हाला अडचणी दोन होत्या. गोकर्ण स्टेशनला ट्रेन दोनच मिनिटे थांबणार होती व आयत्यावेळी ठरवल्याने व उशीर झाल्याने एसी डब्याचे तिकिट न मिळता साधे स्लीपरचे कसेबसे मिळाले होते. गाडी फुल्ल होती.

गाडी प्रथम महाराष्ट्राचा दक्षिण भाग, नंतर कर्नाटकचा उत्तरपूर्व भाग, त्यानंतर पश्चिमेला वळून गोवा प्रदेश व नंतर दक्षिणेला वळून कर्नाटकचा पश्चिम किनारा असा प्रवास करते. त्यामुळे आधी कोरडी थंड हवा मग बाष्पयुक्त उष्मा जाताना आणि उलट हवामान येताना असा अनुभव येतो.

गाडी रात्री अगदी वेळेवर निघाली. आम्ही बेडिंग बरोबर घेतलेच होते. माघी महिना (८ मार्च २०१०) होता. हवेत चांगलीच थंडी होती. मी रात्रभर स्वेटर घालून ब्लॅंकेट घेऊन कुडकुडले.

रविवारी पहाटे बेळगाव स्टेशन आले. मी प्रथम गरम आल्याचा चहा घेतला आणि गरमगरम इडली चटणी खाल्ली तेव्हा जरा तकवा आला. नंतर गाडी रमतगमत कोकण ट्रॅकने चालली. निसर्गरम्य परिसर, अनंत बोगदे, प्रवाशांच्या आरोळ्या, अत्यंत संथ प्रवास, तोंडावर उन्हाचा मारा असे करतकरत गोकर्णच्या अलिकडचे स्टेशन आले. गाडी लेट होती. एव्हाना उन उतरायला लागलं होतं.

गोकर्ण स्टेशन

medium_IMGP0376.JPG

आम्ही लगबगीने सामान पॅक करुन दारापाशी आणून ठेवले. समन्वयला जलदीने उतरण्यासाठी तयार केले. स्टेशन आले, आम्ही पटापट उतरलो. आमच्या बरोबर डब्यात असणारे काही प्रवासीही उतरले.

हाहा म्हणता गाडी सुटली. आम्ही मुख्य फलाटावर आलो. सामान आटोपशीर होते. आता आम्ही फलाटाबाहेर पडलो. लगेच मारुति व्हॅनचे चालक आमच्यापाशी आले. आम्ही आणि एक जोडपे मिळून देवळापर्यंतचे भाडे ठरले. जवळजवळ ३०-४० मिनिटे एवढा प्रवास होता. वाटेत भाताची खाचरं, मीठागरं, तळी, कमळं, रानआळू अशी कोकणभूमी नजरेस पडली.

आता गोकर्ण गाव जवळ आलं. आम्हाला फक्त जोगळेकरगुरुजी एवढच माहित होतं. त्यांचा पत्ता, फोन नंबर आमच्याकडे नव्हता. त्यामुळे त्यांच्याशी आम्ही आधी संपर्क साधू शकलो नव्हतो.

आम्ही ऑफ सीझनला गेलो होतो. तेव्हा परीक्षांचा मोसम होता त्यामुळे गावात गर्दी कमी होती व गुरुजींकडे आमची व्यवस्था होण्यासारखी होती. तरीही आम्ही वाटेत हॉटेलचे दर विचारुन घेतले. अजूनही उजेड होता.

medium_IMGP0313.JPG

आता आम्ही देवळाच्या दिशेने निघालो. जोगळेकरगुरुजींचे नाव सांगताच लोकांनी आम्हाला त्यांच्या मुक्कामी जायला मदत केली.

medium_IMGP0315.JPG

बाहेरच एक गुरुजी होते. त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली त्यांनी आमची जुजबी चौकशी केली व बाहेर चपला काढून आत जायला सांगितले. दारात सुरेख रांगोळी होती.

आत गेल्यावर एक भले मोठे दुमजली घर पाहायला मिळाले. गेल्यागेल्या मोठा लांबलचक चौक आहे. तिथे बाहेरुन आलेले लोक बसतात. गुरुजीच्या घराचा भाग डाव्या बाजूला आहे व तिथे सोवळे आहे. मागच्या बाजूला जेवणासाठी लांबरुंद खोली आहे. परसात गोठा आहे व संडास-बाथरुमची सोय आहे. उजव्या बाजूला धुणी-भांडी करण्याची जागा आहे. सर्वच वास्तूत मला टापटीप दिसली.

घरात मांगल्य वाटले. आम्ही हातपाय धुतले. आम्हाला वरच्या माडीवरची एक खोली दिली गेली. वरचा मजला यात्रेकरूंसाठी असल्याचे मला दिसले.

आमचे आवरुन झाल्यावर चहा घ्यायला खाली बोलावले गेले. चहा झाल्यावर कोणाला कोणते धार्मिक विधी करायचे आहेत याची चौकशी गुरुजींनी केली. आमच्या बरोबर दोन जोडपी होती. त्यांनी श्राद्धे करण्याचे व लघुरुद्र करण्याचे
ठरवले. मी पंचामृती व सप्तधान्यपूजा, श्रीगणेशपूजन, श्रीपार्वतीमातेला कुंकुमार्चन, गोप्रदान व बटू-ब्राह्मण-कुमारिका भोजन असे करण्याचे ठरवले. मी माझ्याबरोबर अर्पणाचे सामान नेले होते.

दुसर्‍या दिवशी माझा तिथीने वाढदिवस होता त्याच दिवशी मला श्रीमहाबळेश्वराने दर्शनासाठी बोलावले होते केवढी भाग्याची गोष्ट होती!

आम्ही आमची आन्हिकं उरकली. थंड पाण्याने आंघोळी केल्या. कपडे बदलून श्रीमहाबळेश्वराच्या दर्शनासाठी बाहेर पडलो. देवळाभोवती चक्कर मारुन पाण्याच्या बाटल्या घेतल्या.

medium_IMGP0279.JPG

नंतर देवळापुढचे तुळशीवृंदावन पाहिले,

large_sidhhivinayak_0.jpg

श्रीगणपतीचे मंदिर पाहिले. हा गणपती बटुरुपातला उभा आहे. त्याच्या मस्तकावर रावणाने घातलेल्या घावाच्या खुणा आहेत. श्रीगणपतीने सोसलेल्या या घावाचे मला वाईट वाटले आणि कौतुकही वाटले. कित्येक लक्ष वर्षे उभी असलेली ही मूर्ती इतिहासाची साक्ष आहे हे पाहून आनंद वाटला.

नंतर आम्ही श्रीमहाबळेश्वराच्या मंदिरात गेलो. बाहेर तेलाचे दिवे लावायची सोय आहे. असे हजारो साचे सभामंडपात आहेत. तेथे महाबळेश्वराच्या डावीकडे श्रीगणपती व उजवीकडे देवीची मूर्ती आहे. या गर्भगृहाच्या बाहेर असलेल्या दाराच्या चौकटीला तेलाचे दिवे लावायची सोय आहे.

medium_scan0008.jpg

आम्ही आता श्रीमहाबळेश्वराच्या गर्भगृहात गेलो. तेथे पुरुषांना शर्ट, बनियन काढावा लागतो. स्त्रियांनी तोकडे कपडे व पॅंट घातलेली चालत नाही. चामड्याचे पट्टे पॅंटला लावलेले चालत नाहीत.

आत गेल्यावर दुरुन नमस्कार संध्याकाळी करवतात. प्रत्यक्षात तिथे एक शालिग्राम शिला सोडून काही दिसत नाही. शिवलिंग शालीग्राम शिलेच्या आत पाण्यात आहे. तेही पूर्ण हाताला लागत नाही. मूळ शिवलिंग मऊ दगडाचे आहे. ते रावणाने भूमीतून उपटून पिळून काढण्याचा प्रयत्न केल्याने पिळलेले आहे व त्याचे इतर ३-४ तुकडे इतरत्र विखुरलेले आहेत.

medium_scan0009_1.jpg

येथे दर १२ वर्षांनी एकदा शालिग्राम पीठ वर उचलून आत्मलिंगाला मंत्रविधीने आठ दिवस पूजा करुन पुन्हा शालिग्राम शिलेने झाकून ठेवतात. पुस्तकात १९८३ साली केलेल्या अशा उत्सवाची माहिती आहे.

त्यानंतर कदाचित १९९५ साली केला गेला असावा. २००७ साली झाला असावा. आता २०१९ मध्ये पुढचा होईल. या यात्रेला लाखो लोक जमतात.

रात्री येथे सर्व गर्भगृह पाण्याने पुजारी धुऊन काढतात. नंतर मुख्य पुजारी शालिग्रामासहित शिवलिंगाची पूजा करतात. फुलांनी मढवतात. गरम केशरी दुधाचा नैवेद्य दाखवतात. आरती करतात व मंदिर देवाच्या निद्रेकरीता बंद होते.

आम्ही मंदिरात रमलो होतो. मी पहात होते... गावातील लोक येऊन त्यांचे रोजचे दर्शन घेऊन जात होते.

महाबळेश्वराच्या मागे वीरभद्र, श्रीताम्रगौरी व वेंकटेशलक्ष्मीचे मंदिर आहे. आम्ही देवाला प्रदक्षिणा घातली.
आता उद्या येऊन सेवा करायची आहे याची खुणगाठ बांधली.

medium_IMGP0319.JPG

येताना आम्ही देवाचे वाहन असलेला शुभ्र वृषभ पाहिला, त्याचे दर्शन घेतले, त्याला चारा घातला. त्याला सांभाळणारे सेवक दोन वेळा देवळात आणवून त्याच्या स्वामीचे दर्शन घडवतात.

"उद्या आम्ही येतोच आहोत", असे मी देवाला सांगितले व जड पावलानी निघाले.

आम्ही मुक्कामी आलो. हातपाय धुऊन घेतले. आम्ही चौकात थांबलो. आम्हाला इतरांबरोबर भोजनासाठी जेवणघरात बोलावण्यात आले. तेथे केळीची पाने मांडलेली होती. त्यावर चटणी, रायते, लोणचे वाढलेले होते. येथे चवदार रंगेबिरंगी खडे मीठ होते. आम्ही पानावर बसल्यावर गरमगरम भात सांबार वाढण्यात आला. वाढणारी मंडळी घरातली होती व धोतरात होती. पहिले वाढप संपल्यावर भाजी आली, पुन्हा गरम भात व कढी आली. जेवण अतिशय चविष्ट होते. मन तृप्त झाले.

आंचवायला परसात गेलो. आम्हाला नंतर गुरुजींनी पहाटे उठून आधी समुद्रस्नान व कोटीतीर्थस्नान करुन परत यायला सांगितले. प्रत्येकाला संकल्पासाठी दिलेल्या वेळा वेगळ्या होत्या. मी समन्वयची परिस्थिती लक्षात घेऊन जरा उशीराची वेळ मागितली.

medium_IMGP0365.JPG

रात्री झोपताना मी गजर लावला. उठून प्रातर्विधी उरकून जरा उजाडल्यावर आम्ही समुद्रावर गेलो. समुद्र घराच्या मागे आहे. समुद्र शांत होता. पुळणीवर परदेशी पाहुणे त्यांच्या sleeping bag त झोपले होते.

मी तांब्याचा कलश नेला होता. प्रथम मी दोघा पुरुषांना स्नान करुन दिले. मग ते पुळणीवर उन खात असताना, मी स्नानासाठी पाण्याजवळ गेले. मी समुद्रात पाय ठेवण्यापूर्वी त्याला नमस्कार करुन त्याची स्नानासाठी अनुमति घेतली. मग स्नान करून सूर्याला अर्घ्य दिले व त्यालाही नमस्कार केला. म्हणला तर हा साधा अरबी समुद्राचा भाग होता, म्हणलं तर प्रलयात टिकून राहणार्‍या भुभागाजवळचा समुद्र होता.

medium_IMGP0303.JPG

मग आम्ही तसेच ओलेत्याने गावात जरा दूरवर असलेल्या कोटीतीर्थावर स्नानासाठी गेलो. एव्हांना पहाटेची गर्दी ओसरली होती. आम्ही गेलो तेव्हा कोणी नव्हते. मला बरेच वाटले. आम्ही स्नान केले. मला सतत श्रीकलावतीआईंची आठवण येत होती.

medium_IMGP0288.JPG

येताना नागेश्वराचे मंदिर लागले तेथे नाग देवतेची असंख्य शिल्पे होती.

आम्ही चालतचालत गुरुजींच्या घरी आलो. न्हाणीघरात जाऊन गोड पाण्याने स्नान केले. शिवपूजा म्हणून शुभ्र साडी बरोबर नेली होती. पूजेसाठी म्हणून मी ती साडी नेसले.

आम्ही चौकात थांबलो. आमचा चहा झाला. तेथील गुरुजींनी आमच्या कडून संकल्प करून घेतला.
माझ्या लक्षात आले की दोन मध्यम वयाचे वृध्दत्वाकडॆ झुकणारे गुरुजी बंधू होते. एका गुरुजींना पाच मुले होती. त्यातील काही अन्यत्र शिकायला गेली होती वा अन्य ठिकाणी उद्योगासाठी गेलेली होती. एका मुलाचे लग्न झालेले होते. सुनबाई गोव्याच्या होत्या. त्यांना एक मुलगी व एक बाळकृष्णासारखा मुलगा होता. दोन्ही सासवा सोवळ्यातील स्वयंपाकाचे काम पहात होत्या. दोघी नऊवारी नेसलेल्या होत्या. चिरण्याचे काम करायला आत मदतीला माणसे होती. माझा वाढदिवस होता, तसाच अजून एका सद्‌गृहस्थाचाही होता; त्यामुळे दोन गोड पदार्थ तयार होत होते.

इतर दोन जोड्यांचे धार्मिक कार्य केव्हाच चालू झालेले होते. त्यांचे कार्य करण्यासाठी गावातून बरेच गुरुजी आलेले दिसले. रुद्रमंत्राचे स्वर कानाला-मनाला पावन करीत होते.

श्रीगणपतीमंदिर

medium_IMGP0282.JPG

आम्हाला श्रीसिध्दीविनायक गणपतीमंदिरात गुरुजी घेऊन गेले. तेथे आम्ही मनोभावे पंचामृती पूजा केली. कोवळ्या दूर्वा व लाल कमळाची फुले वाहिली. मन फार प्रसन्न झाले. येथेही गणपतीला स्पर्श करून पूजा करता येते. त्याच्या मस्तकाला तूप चोळून त्याचा घाव भरावा अशी प्रार्थना करता येते. मला फारच बरे वाटले.

मग आम्ही दक्षिणा ठेऊन मुख्य देवळात गेलो. प्रथम वीरभद्र, कालभैरव यांचे दर्शन घेतले. मग गर्भगृहात गेलो. तेथे रुद्राभिषेक चालू होता. आमचाही अभिषेक गुरुजींनी करवून घेतला. आत्मलिंगाच्या त्या मऊ दगडाला स्पर्श करताना काय वाटले मला सांगता येणार नाही. असा स्पर्श असू शकतो यावर विश्वास बसणार नाही. याला दगड कसे म्हणायचे कारण तो इतका मुलायम आहे. तो जर इतका मऊ आहे तर तो विरघळायला हवा. पण नाही! गेले कित्येको लक्ष वर्षात त्याला काही झालेले नाही. कैलासाहून आलेल्या श्रीशिवशंकराच्या विभूतिला मी स्पर्श करू शकले, ही माझ्या दृष्टीने विलक्षण गोष्ट होती.

एका वेताच्या लांब पुडीसारख्या टोपलीतून गुरुजींनी अगदी कोवळी अछिद्र बेलपाने आणली होती. ती वाहताना माझी सर्व पापे जळून जात आहेत, असे मला वाटले.

नंतर मी नेलेल्या वस्तू त्या पावन करणार्‍या विभूतिला वाहल्या. श्रीमहाबळेश्वराला गंगाजल वाहताना, भस्म लावताना, अत्तर चोळताना, त्याला वस्त्र नेसवताना काय वाटले कसं सांगणार? त्याने माझी अर्चना स्वीकारली, हेच मला खूप वाटले. माझे हृदय भरुन आले. माझा भाव पाहून दुसर्‍या गुरुजींनी इतरांना गर्भगृहात येऊ दिले नाही. "निवांत पूजा करा, दर्शन घ्या, येथे थांबा, मन तृप्त झाले की जा", असे मला सांगण्यात आले. गुरुजी मला नंतर म्हणाले की, कित्येक वर्षात अशी निवांत पूजा घडलेली नाही. येथे सतत खूप गर्दी असते.

मग आम्ही समाधान घेऊन बाहेर आलो.

medium_IMGP0327.JPG

मागे जाऊन श्री पार्वतीमातेला (ताम्रगौरीला) श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केले. तिची खणानारळाने ओटी भरली. प्रसाद घेऊन आम्ही देवाला प्रदक्षिणा घातली.

आता आम्ही मंदिराबाहेर आलो. गुरुजींच्या घरी गेलो. वर जाऊन कपडे बदलून आलो. मग खाली येऊन चविष्ट उप्पीटाचा स्वाद घेतला. वर जाऊन थोडी विश्रांती घेतली. भोजनाला अजून अवधी होता हे पाहून आम्ही पुन्हा देवळात गेलो. तेथे सभामंडपात बसलो. मी एक कोपरा गाठून जप करायला सुरुवात केली. मन शांत स्वस्थ होत होते. कोणी एक शिवभक्ताची जोडी उत्तरेहून येऊन दाखल झालेली पाहिली. ते समुद्रावर होते, देवळात त्यांची अर्चना, जप इ. करीत होते.

मी विचार करताकरता मला वाटले- येथे श्रीमारुतिराय कसे नाहीत? ते महारुद्र असल्याने त्यांचे वास्तव्य येथे असायला हवे. तेवढ्यात मला, लोक एका खांबापाशी तेलाच्या पणत्या लावून ठेवताना दिसले; पहाते तर काय? ते मारुतिराय होते. मला महाराज भेटल्याचा आनंद झाला.

संध्याकाळी आपण येथे दीपदान करायचे(दिव्याची आरास)असे मी राजूला सांगितले. तो तयार झाला. मग त्याला मी गावात जाऊन पणत्या व तेल आणायला सांगितले. त्याने तशी व्यवस्था केली.

मग आम्ही भोजनासाठी गुरुजींच्या घरी गेलो. तेथे हातपाय धुऊन पानावर जाऊन बसलो. प्रथम गुरुजींनी काही मंत्र म्हणले, अन्न सूक्त म्हणले, काही प्रार्थना म्हणल्या. सर्व वाढप सोवळ्यात झाले. मी भोजन दक्षिणा गुरुजींपाशी दिली. आज खास बेत होता. तीन वेळा भात ही इथली खासियत तर होतीच - सांबार भात, रसमभात आणि कढी भात. शिवाय रव्याचे लाडू व गव्हाची खीर होती. अतिशय चविष्ट भाज्या व रायती व चटण्या होत्या. मी ते खडे मीठ चोखून खात होते. मन शांत व तृप्त झाले. असा वाढदिवस मागून मिळत नाही. श्रीमहाबळेश्वराच्या क्षेत्रात, त्याच्या प्रसादाचे भोजन शिवाय बरोबर एवढे यात्रेकरू...

मग आम्ही विश्रांती घेतली. दुपारी चहा झाला. मग आम्ही पुन्हा देवळात जाऊन बसलो. सतत स्थानिक लोक व यात्रेकरु दर्शनासाठी येतच होते. मी जप चालू ठेवला. यथावकाश संध्याकाळ झाली. आम्ही पणत्या तयार करायला सुरुवात केली. तेथील स्थानिक पुजार्‍यांची व व्यवस्थापकांची परवानगी घेतली. आम्ही पणत्या लावायला सुरुवात केली. बराच वेळ हे काम आम्ही करीत होतो. सर्व दारांच्या चौकटीत दिवे ठेवले. फार छान दिसत होती आरास.

सोमवारी रात्री शंकराच्या देवळात दीपदान होणं याला खूप महत्व आहे. श्रीशिवाला ते आवडतं. मलाही आवडतं, त्याची सेवा करायला.

आता आम्ही आरतीला थांबलो. आरती झाली. मग आम्ही देवाला बाहेरून प्रदक्षिणा घालायचे ठरविले. मी राजूला सांगितले - मुक्याने ११ प्रदक्षिणा घालायच्या आहेत, नमस्कार हाताने करीत आणि शिवमंत्र म्हणत. त्याने ते मान्य केले. मी पुढे आणि ते दोघे मागे, अश्या ११ प्रदक्षिणा घालून झाल्या. देवळाचा परिसर मोठा असल्याने त्याला वेळ लागला.

हे पुण्य मला स्वतःसाठी घ्यायचे नव्हते. ते मी, माझ्या वडिलांच्या शांत मृत्यूसाठी व त्यांच्या आत्म्याला शांति मिळावी यासाठी, त्यांना मिळावे अशी श्रीमहाबळेश्वराला प्रार्थना केली. जानेवारीत श्रीगंगासागरला जाताना मला भीती होती की मला यात्रा अर्धवट टाकून परत यावे लागते की काय? यात्रेला जावे की नाही हाही विचार मनात येत होता. गोकर्णला निघतानाही माझ्या वडिलांचा विचार मनात येत होता. ते कधीही प्राण सोडतील अशी परिस्थिती तेव्हा होती. त्यांचा प्राण जात नव्हता, शरीर पूर्ण झिजले होते, पण ते जागे होते. त्यांना काहीही सोसत नव्हते. मला त्यांचे हाल बघवत नव्हते. त्यांची आशा या जगातील गोष्टींमधून सुटावी व त्यांनी समाधानाने देह सोडावा असे मला वाटत होते. हे घडवून आणण्याची शक्ती फक्त परमेश्वरापाशी होती. श्रीमहाबळेश्वराला प्रार्थना केल्यावर माझे मन शांत झाले. मी माझे पितृछत्र जाण्याच्या मानसिक तयारीला लागले.

श्रीवेंकटरमणाची पालखी

medium_IMGP0350.JPG

मंदिराच्या परिसरात रात्री कसली तरी लगबग चालू होती. आम्ही चौकशी केली तेव्हा कळालं की येथील श्रीवेंकटरमणाची पालखी रात्री मंदिराभोवतालून फिरवून आणतात. त्या पालखीची सजावट चालू होती. दक्षिणी वाद्ये वाजवणारे सेवक व देवाचे भालदार चोपदार जमा झाले होते. गुरुजी पूजेच्या तयारीत होते.

मग आम्ही मुक्कामी आलो आणि जेवलो. काही वेळाने पाहिले की घरातील सुवासिनी दारापुढे रांगोळी काढत आहेत. मी गुरुजींकडे चौकशी केली. पालखी त्यांच्या दारावरुन जाणार होती. गुरुजी सोवळ्यात तयार होते. त्यांच्या हातात तबक होते. त्यात हार-फुले, धूप, पानसुपारी इ. साहित्य होते.यथावकाश पालखी दारापुढे आली, पालखीपुढे सडा टाकला गेला. गुरुजींनी देवाला फुले वाहिली, हार वाहिला, तुळस वाहिली. पानसुपारी-दक्षिणा ठेवली. सर्वांनी देवाचा जयजयकार केला व नमस्कार केला. पालखीतल्या प्रसन्न देवाचे दर्शन आम्ही सर्वांनी घेतले. मला अतिशय समाधान झाले..खरोखर न मागता इतके मिळणे हे भाग्यच!

ही पालखी दर सोमवारी, अमावस्या, पौर्णिमा, प्रदोष, महाशिवरात्र इ पर्वणी कालात निघते. परिसरातील लोक तिचे स्वागत करतात व पूजा करतात. आमचे भाग्य, आम्हाला हे पहायला मिळाले.

एव्हांना रात्रीचे ११ वाजले होते. आम्ही सामान पॅक करून ठेवले. समाधानाने रात्री झोपलो.

दुसर्‍या दिवशी आम्ही लवकर आवरून समुद्रावर गेलो. शांतपणे नावांकडे व लाटांकडे मी बघत होते. माझे इथले काम झाले होते. पुन्हा येथे यायला मिळेल की नाही माहीत नव्हते. मी डोळ्यांत त्याचे रुप साठवीत होते.

मग आम्ही नास्ता केला व देवळात गेलो. तेथे पोट भरून श्रीमहाबळेश्वराचे दर्शन घेतले. जड पावलाने मुक्कामी आलो. आम्ही सामान घेऊन खाली आलो.

जोगळेकर कुटुंबीय

medium_IMGP0372_0.JPG

आता आम्ही पाहिले की काही लहान बटू संथा घेत आहेत. अतिशय बरं वाटलं. ही परंपरा अशीच टिकावी अशी देवाला प्रार्थना केली.

गुरुजींना दक्षिणा दिली. आमचे दोन दिवसांच्या रहाण्या-भोजनाचे दिले. ते मागत नाहीत. सर्व गुरुजींना मनोभावे नमस्कार केला. तेथील सुवासिनींना व मुलांना काही रक्कम दिली. गुरुजींनी गाडीची वेळ बरोबर आहे ना, हे स्टेशनवर विचारले. आमचा नाव-पत्ता-फोन नंबर इ तपशील त्यांच्या रजिस्टरमध्ये लिहून घेतला. काढलेले फोटो इ मेलने पाठवते असे आश्वासन मी दिले.

रिक्षेने आम्ही स्टेशनवर आलो. गाडी वेळेवर होती. दोन मिनिटात सर्व सामान व समन्वय असे वर चढायचे होते. धक्काबुक्की झाली, समन्वय मागे राहतो की काय असे वाटले, मग मी दंगा केला व त्याला वर यायला मदत केली. गाडी सुटली. माझ्या जिवात जीव आला.

मजल दरमजल करीत, तोंडावर उन्हाचा मारा सहन करीत, आम्ही कोकण घाटाचा प्रवास केला. प्रवाशांमध्ये परदेशी मंडळी बरीच दिसत होती.

यथावकाश महाराष्ट्रात गाडीने प्रवेश केला. हवा कोरडी झालेली जाणवली. दुसर्‍या दिवशी पहाटे आम्ही सुखरुप पुण्याला परतलो.

१० दिवसातच माझ्या वडिलांना सुखाने मृत्यू आला.

आदल्याच दिवशी मला काय वाटले कोणास ठाऊक मी त्यांचे दर्शन घेऊन आले. चैत्र शुध्द तृतीया होती. आमच्या घरी गौरीची प्रतिष्ठापना झुल्यावर झाली होती. मी आईला साडीखणनारळाची ओटी घेऊन गेले होते. कदाचित, अजून सुवासिनी अशा माझ्या आईचा सत्कार मला अखेरचा असा करता येणार होता. "वडिल काही प्रतिसाद देत नाहीयेत," असं आई मला सांगत होती. मी वडिलांना भेटायला आतल्या खोलीत गेले.

मला कळून चुकले की आता त्यांनी निर्गमनाची तयारी केलेली आहे. त्यांचा चेहेरा मला शांत वाटला. मी आईला समजाऊन सांगितले की," ते मैदानावर आऊट झालेले आहेत. ते आता प्रदीर्घ खेळी संपवून पॅव्हेलियनच्या दिशेने जात आहेत. जाताना ते आत्मसंमुख झालेले आहेत, आपण या जीवनाचा खेळ कसा खेळलो, काय जमलं, काय नाही जमलं याची ते जमवाजमव करीत आहेत. त्यांना सारख्या हाका मारून जागं करू नकोस. त्यांना सुखाने सर्व पाश सोडू देत."

दुसर्‍या दिवशी चैत्र शुक्ल चतुर्थीला उत्तम नक्षत्रावर वडिलांना देवाघरचे बोलावणे आले. मी पंचागात पाहिले - उत्तरायण, शुक्ल पक्ष, दुपार, नक्षत्र शुभ - त्रिपाद-पंचक नाही. मला खूप बरं बाटलं.

मी माहेरी जाताना पिशवीत सामान नेले. वडिलांचा चेहेरा शांत होता. त्यांना ग्रंथात सांगितल्याप्रमाणे, माझ्या यजमान व मुलांकरवी चंदन लावले, हार घातला, गंगाजल मुखात घातले, तुळशीचे पान ठेवले, रामाचे गोड भजन केले. देवाची पुन्हा प्रार्थना केली व मी तिथून निघाले. यजमान पुढची कृत्ये करण्यासाठी भावांबरोबर थांबले.

घरी आल्यावर मी स्नान केले व मी महाबळेश्वराचे मनापासून आभार मानले व अश्रूंना वाट करुन दिली.

॥श्रीराम समर्थ॥

Comments

गोकर्ण महाबळेश्वर यात्रा

नमस्कार,
तुमच्या वरील यात्रेचं वर्णन वाचलं. खूप छान लिहिलं आहे तुम्ही. आपण प्रत्यक्षच ती सर्व स्थळं पुन्हां
पहातो आहोत असं वाटत होतं, कारण आम्ही ह्याच महिन्यांत तेथे जाऊन आलो.पण आम्ही Coastal
Karnataka च्या टूर बरोबर गेलो होतो त्यामुळें आम्हांला इतकं सर्व सविस्तर पहातां आलं नाही, तसंच,
पूजा, समुद्र-स्नान वगैरे करतां आलं नाही. तेवढा वेळ्च नव्हता. फक्त देवदर्शन झालं,हेंच समाधान !
तुमच्या वडिलांसाठी तुम्ही जे कांही केलंत, ते वाचून मन भरून आलं. खरंच पुण्यवान आहांत. परमेश्वरानें
तुम्हांला ही संधी आणि बुद्धी दिली, हे तुमचं केवढं भाग्य. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, हीच प्रार्थना .

धन्यवाद!

तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद! मला या यात्रेचे वर्णन लिहिताना आणि केव्हाही वाचून झाल्यावर डोळ्यांत पाणी येते. देवाची कृपा मनाला शांत करते.

यात्रेविषयी प्रतिसाद

तुम्ही प्रसिद्ध केलेला गोकर्णाच अनुभव वाचला, छान वाटला लेख, एक बर झाल कि तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या वडिलांना देवाज्ञा झाली, तुमच्या वडिलांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.......

निलेश

धन्यवाद!

आपल्या सदिच्छांबद्दल धन्यवाद!

तुमचे वय लहान असूनही तुम्ही माझा भाव समजू शकला व सदिच्छा व्यक्त करु शकलात हे विशेष!