श्रीरामेश्वराची पालखी

पुन्हा २ किमी चालत आम्ही हौशी यात्रेकरू देवाची पालखी बघायला आमच्या उत्साही गुरुजींमागोमाग निघालो.
आता गर्दी नव्हती.
तिकिट काढण्याची भानगड नव्हती.
पार्वतीमातेच्या सभामंडपात आलो. गुरुजींनी आम्हाला गर्दी व्हायच्या आत मोक्याच्या जागी बसायला सांगितले. दाक्षिणात्य सनई व चौघड्याचे स्वर कानी पडत होते. पाय बोलत होते, थोडे सुजलेही होते. कंबर भरुन आली होती. डोळ्यांवर पेंग होती पण मन पालखी बघायला आतूर झाले होते.

medium_devottes 2.jpg

श्रीरामेश्वर फुलांनी सजवलेल्या पालखीत बसून छत्रचामरांनी हवा घेत समोरील सेवेकर्‍यांकडून गायनसेवेचा आनंद घेत रोज संध्याकाळी प्रदक्षिणा करून आपली भार्या पार्वती हिच्या शयनमंदिरात येतात.
जशी पालखी जवळ यायला लागली तशी रेटारेटी व्हायला लागली. प्रत्येकजण पालखीतील उत्सवमूर्तीचे दर्शन घ्यायला उत्सुक होता. आमचे गुरुजी सर्वात पुढे होते ते मिरवणूक नियंत्रित करीत होते. ती पालखी घेतलेल्या अन्य चार गुरुजींच्या चेहेर्‍यावर मला प्रचंड तेज दिसले.
ती उत्सवमूर्ती इतकी लोभसवाणी होती. तिच्यापुढे घातलेल्या गुलाबपाण्याच्या मंगलसड्याचे थेंब माझ्या अंगावर पडल्यावर मला इतकं बरं वाटलं.
अतिशय दिमाखात ती पालखी शयनमंदिरात गेली. तिथे गेल्यावर भरजरी पडदा ओढून घेण्यात आला. देवांना केशरी दूधाचा नैवेद्य दाखवला गेला व त्यांच्या सुखनिद्रेसाठी स्तवन केले गेले.
मी मनात म्हणाले हे खरे भारताचे प्राचीन वैभव आहे, याला तोड नाही. माझ्या भाग्याचे मला कौतुक वाटले. पायांच्या वेदना नाहीशा झाल्या. हृदयात परमेश्वराविषयीचे प्रेम दाटून आले. मी भारतात जन्माला आले व अशा तीर्थस्थानाला आले याचा मला अभिमान वाटला.

आम्ही देवाचा प्रसाद घेतला. कढत-गोड-सुकामेवा घालून नटवलेले अतिशय सुंदर चवीचे दूध मला आजही आठवते.
मनात अतिशय समाधान घेऊन आम्ही पुन्हा २ किमि. चालत मंदिराबाहेर आलो.
बाहेर थंड हवा होती.
हॉटेलवर परत येऊन आम्ही गुरुजींना दक्षिणा दिली, त्यांच्याकडून प्रसाद घेतला. त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांना भरभरून धन्यवाद दिले.

गेले कित्येक वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून येथे येऊन त्यांच्या पूर्वजांनी श्रीरामेश्वराची सेवा केली आहे. ते मोडकंतोडकं मराठी बोलतात. त्यांच्या बरोबर काही मराठी कुटुंबंही येथे आहेत.
रामेश्वर मूळ भारतखंडापासून वेगळे बेट असल्याने येथे एक वेगळेच वातावरण तयार झालेले आहे. येथे काशीप्रमाणेच वर्षभर यात्रेकरूंची गर्दी असते. गुरुनाथ ट्रॅव्हल्सचे लोक कित्येक वर्षे येथे यात्रेकरूंना घेऊन येत आहेत.
त्यांची मुले मात्र त्यांनी शिक्षणासाठी बाहेर ठेवली आहेत. ती त्यांचा व्यवसाय करू इच्छित नाहीत.
देवस्थानातील राजकारणाला गुरुजी कंटाळले आहेत.
तरीही आलेल्या यजमानांचे देवकार्य/पितृकार्य करताना ते आनंदी असतात.

॥श्रीराम समर्थ॥