स्फटिकलिंग दर्शन

पहाटे ३ ला उठून आवरून स्नान न करता आम्हाला हॉटेलच्या लॉबीत जमायला गुरुजींनी सांगितलं होतं.
त्याप्रमाणे सर्व यथावकाश जमले. सर्वांना बरोबर घेऊन गुरुजी निघाले. हॉटेल देवळाच्या मार्गावर देवळापासून अगदी जवळ असल्याने बरं झालं. सर्वजण चालत प्रवेशद्वाराशी आलो. ते भव्य प्रवेशद्वार मनाला सुखावणारे, त्याची प्राचीनता, विशालता व पावित्र्य दर्शवणारे होते.

medium_temple music.jpg

सनई-चौघड्याचे (दाक्षिणात्य) सुंदर स्वर कानावर पडत होते. गुरुजींनी सांगितले की या स्वरांनी काल पार्वतीमातेच्या मंदिरात शयन करणार्‍या श्रीरामेश्वराला उठवण्यात येते. त्याची पालखी पुन्हा त्याच्या मूळ मंदिरात येते. मंदिरात मुख्य पुरोहित सोडून कोणालाही प्रवेश नसतो. उंबर्‍याबाहेरून काही सेकंदात दर्शन घ्यावे लागते. या वेळी फक्त स्फटिकलिंगाचे दर्शन घ्यायचे आहे असे गुरुजींनी सांगितले. ते पारदर्शी असल्याने नीट दिसत नाही तेव्हा गुरुजी मूळ श्रीरामेश्वराच्या लिंगासमोर उभे राहतील व बोट दाखवतील तिथे स्फटिकलिंग पहायचे. दोन रांगा होत्या..एक बिनतिकिटाची रांग आणि एक तिकिटाची रांग - ५०रु. १००रु. लवकर दर्शन व्हावे म्हणून सर्वांनी तिकिट काढले त्याची व्यवस्था श्रीगुरुनाथने केली. काही यात्रेकरु नाराज झाले. पण वेळेचे गणित बसवण्यासाठॊ हे सर्व करावे लागते.

medium_ceilings 2.jpg

२ किमि. चालत आम्ही मुख्य गर्भगृहाच्या दिशेने वाटचाल करीत होतो. संपूर्ण परिक्रमा कमानींयुक्त आहे व अतिशय सुशोभित आहे. दोन्ही बाजूंनी सुंदर नक्षीकाम व रंगकाम आहे. शिल्पांमध्ये वैविध्य आहे. उंच छतावर शब्दांनी वर्णन न करता येण्याजोगी चित्रे आहेत. आमचे गुरुजी हौशीने आम्हाला हे सर्व दाखवत होते.
ते पन्नाशीच्या आतील असतील. पण शुचिर्भूत व प्रसन्न होते. मी रामनाम चालू ठेवले होतेच. गर्भगृह जवळ आल्यावर श्रीरामायणात वर्णन केलेल्या प्रसंगानुसार अतिशय प्रसन्न चित्रे आम्हाला भिंतींवर दिसली.

medium_paintings.jpg

medium_paintings2.jpg

ती चित्रे पहातपहात आम्ही सभामंडपात आलो. खूप पोलिस, देवळाचे कर्मचारी व्यवस्था पहात होते. क्षेत्रोपाध्यायांची लगबग चालू होती. आता गर्भगृहाच्या प्रवेशद्वारापाशी आम्ही आलो. आमचे गुरुजी पटकन्‌ गर्भगृहात गेले. ते मुख्य लिंगाच्या समोर उभे राहिले व त्यांनी स्फटिकलिंगाकडे अंगुलीनिर्देश केला. सर्वांनी पटापट दर्शन घ्यावे म्हणून त्यांनी सूचना केली. मंदिराच्या द्वारपालांनी मोजून माणसे उंबर्‍यापाशी काही सेकंद उभी केली त्यांनी पटापट दर्शन घेतले की त्यांना पुढे सारण्यात आले..करताकरता सर्व यात्रेकरुंचे दर्शन झाले. काहींना कोठे पहायचे ते न उमगल्यामुळे दर्शन हुकले. त्यांनी नाराजी बघवत नव्हती. मागे फिरणे शक्य नव्हते.

आता सर्वांची वरात समुद्रस्नानाला निघाली.

॥श्रीराम समर्थ॥