महाराजांच्या प्रवचनांतील सद्‌गुरु

गुरु अनेक असतात. काहीही शिकायचे म्हणले तरी शिकवणारा, मार्गदर्शन करणारा लागतोच. अध्यात्मात गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. जो अध्यात्माकडे जायला प्रवृत्त करतो तो दीक्षा गुरु आणि जो सिध्दमंत्र देऊन आपल्या मोक्षाची हमी आपल्याला देतो तो आपला मोक्षगुरु. मोक्षगुरु हा माणसाचा देह धारण केलेला किंवा समाधीरुपाने जागृत असलेला परमात्माच असतो. आपली तयारी झाली की आपला मोक्षगुरु आपण होऊन आपल्याजवळ येतो व आपला स्वीकार करतो. आपण संपूर्ण शरण गेल्यावर आपल्या आध्यात्मिक प्रगतीची काळजी तो करतो. आपण फक्त संपूर्ण आज्ञापालन करणे बाकी राहते.
महाराजांनी फार लहान वयात आपल्या सद्‌गुरुंची जीवाभावाने सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेतले होते व आ्त्मज्ञान मिळवले होते.
सद्‌गुरुकृपेशिवाय साधनेमध्ये योग्य ती प्रगती होणे व आपल्यावरचा अज्ञानाचा अंमल जाणे कदापीही शक्य नाही. आत्मज्ञान हे पुस्तकी पांडित्य नसून ती केवळ सद्‌गुरुकृपेने प्राप्त होणारी अवस्था आहे. जुलै महिन्यातील आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून "प्रवचने" या पुस्तकात प.पू. गुरुबंधू श्री गोखले यांनी सद्‌गुरूविषयीचे महाराजांचे मार्गदर्शन ३१ पानांत संकलित केले आहे. माझ्या चिंतन-मनन व साधनेसाठी उपयुक्त सार मी काढून ठेवलेले होते. तेच एकत्र संकलित करून या इ-पुस्तिकेत देत आहे.