महाराजांच्या प्रवचनांतील परमार्थ

परमार्थ म्हटलं की कानाडोळा करणं-दुर्लक्ष करणं अशात सध्याच्या माणसांचं आयुष्य निघून जातं. मनुष्याच्या आयुष्यातून परमार्थ काढून टाकला की त्याचा फक्त मनुष्यप्राणी होतो - आहारनिद्राभयमैथुन करणारा एके दिवशी इतरांप्रमाणे मरून जाणारा. प्रसंगवशात्‌ परमार्थाकडे वळलेली माणसं खरोखर परमार्थ समजून करतात का हा एक प्रश्नच असतो. वासनेच्या चिखलात डुकरासारखं लोळताना बघून महाराजांसारख्या संतांना आपली दया येते. "अरे तुझा जन्म या अज्ञानात जगून वाया घालवण्यासाठी नाही. तू मूळचा आनंदरूप आहेस, ज्या देहाला तू इतकं सजवतोस ते तुझं या जन्मात घालायला दिलेलं टरफल आहे. या देहात आत खरा तू आहेस. अज्ञानाच्या या भयाण अंधारातून बाहेर पडून एकदा स्वतःची ओळख करून घे. " असं ते सोप्या भाषेत, कळकळीनं सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करतात. त्यांची ही तळमळीची निरुपणं वाचून मी काही सार माझ्यासाठी लिहिलं होतं ते या इ-पुस्तकात दिलं आहे. प्रवचने वाचून परमार्थावषयीचे माझे सर्व गैरसमज दूर होऊन मनाचा अडलेला प्रवाह वाहता झाला. महाराजांवरच्या प्रेमापोटी त्याचे सार देण्याचा हा व्याप मी केला आहे.