"मी-इतर-सर्व" जिज्ञासा

मी माझा-माझे-मला - हे ममत्व
हवं/नको - या इच्छा (संकल्प-विकल्प)
जन्म-मृत्यूच्या चक्राचे हे पहिये...हेच तर ते चक्र चालवतात.

चक्राला उर्जा देतात. तेच एक शरीर सोडतात व दुसरे धारण करतात. इच्छापूर्तीची अनावर ओढ जीवाला आशा-निराशेच्या खेळात फिरवत राहते.

पारमार्थिक प्रवासाच्या टप्प्यावर चालत असताना "न संपणार्‍या इच्छा" या महत्वाच्या विषयावर चिंतन करावेच लागते. इच्छांचा ऐहिक पातळीवर विचार करताना माझ्या भोवतालच्या जगाचा विचार अपरिहार्यपणे येतो.

सुरुवातीला मी भोवती माझे जग असते. समाजाचा विचार करताना जे प्रश्न त्या विचारांना-सखोल व विस्तृत परिक्षणाला जन्म देतात ते असे मला वाटले -

- मी अशी वेगळी आहे की माझ्यासारखं कुणी आहे?
- मी व इतर यांमध्ये काही साधर्म्य आहे का?
- सर्वांना लागू असे काही नियम आहेत का? असले तर ते कोणते?
- हे नियम कोणी घालून दिले?
- मृत्यूनंतर माणसं/जीव कुठे जातात?
- जन्माआधी बाकीचे कुठे होते?
- विशिष्ठ माणसं आपल्याला का भेटतात? आपले नातेवाईक/स्नेही होतात?
- कोणी खरं सुखी असतं का?
- सर्वांना आपल्यासारखे प्रश्न पडतात? ते कुठे त्यांची उत्तरे शोधतात? त्यांना समाधानकारक उत्तरे मिळतात का?
- हे जग असं का आहे?
- आदर्श असं काही असतं का?
- माणसे व इतर सजीव यांच्यामध्ये काही दुवा आहे का? त्यांना समाईक काही नियम आहेत का? असले तर ते कुठले?
- सजीव व निर्जीव यांत काही दुवा आहे का? त्यांना समाईक काही नियम आहेत का?
- हे सर्व समजून घेऊन मी त्याचं काय करणार आहे?
- असा विचार करणारी मी जरा विचित्र आहे का?

॥श्रीराम समर्थ॥ -